लोकमान्य टिळक : पडद्यामागचे विवेकी क्रांतिकारक! (भाग ३)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2020
Total Views |


lokmanya tilak _1 &n



लोकमान्य टिळकांनी चिरोलवर जो खटला भरला त्यावेळी त्यांची
  उलटतपासणी चिरोलचा वकील कार्सनने घेतली ती अतिशय वाचनीय आहे. लोकमान्य टिळकांचा क्रांतिकारकांशी किती घनिष्ठ संबंध होता याची खात्री त्यावरून पटते. या उलटतपासणीत टिळकांना सर्वाधिक प्रश्न हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल विचारण्यात आलेले आहेत. बाबा सावरकर आणि टिळकांचे संबंध, त्यांचा पत्रव्यवहार, चापेकर आणि टिळक संबंध यावरही त्यांना विचारलेले प्रश्न आणि टिळकांनी दिलेली उत्तरे फार मार्मिक आहेत. टिळकांचे क्रांतिकारकांशी जवळचे, फार फार जवळचे संबंध आहेत याची खात्री ब्रिटिशांना होती हेच यातून दिसते, पण टिळकांना अडकवण्याचे ठोस पुरावे ब्रिटीशांच्या हाती कधीही लागले नाहीत, हेच टिळकांमधल्या विवेकी आणि धोरणी क्रांतिकारकाचे यश!


क्रांतिकारकांना पाठिंबा देण्यासाठी लोकमान्य टिळक निरनिराळे मार्ग शोधत असत. चापेकर प्रकरणात वधानंतर त्यांनी चापेकर बंधूंना लपण्यासाठी काही महत्वाच्या जागा सुचवल्या होत्या. त्यांच्याशी बोलणीही करून ठेवली होती, असे दिसते. क्रांतिकारांना आश्रय मिळावा, यासाठी टिळकांनी सर्कशीसोबत संधान बांधले होते, हे सांगितले तर आजही अनेकांचा विश्वास बसणार नाही. भारतातली पहिली सर्कस विष्णुपंत छत्रे या मराठी माणसाने सुरू केली. महाराष्ट्रातल्या सांगली आणि मिरज भागात ही सर्कस सर्वप्रथम सुरू झाली, असे म्हणतात. क्रांतिकारकांना वेषांतर करून या भागातून त्या भागात बेमालूमपणे फिरता यावे यासाठी टिळकांनी विष्णुपंत छत्रे यांच्याग्रेट इंडियन सर्कस’सोबत संधान बांधले. टिळकांनी न. चिं. केळकर यांना एका पत्रात लिहिले आहे, या संबंधांबद्दल फारसा पत्रव्यवहार उपलब्ध नाही. मात्र, एके ठिकाणी टिळक सांगतात छत्रे यांच्याबरोबर मी रंगूनला २० तारखेच्या सुमारास पोहोचेन म्हणून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मी पुण्यास येऊ शकत नाही.


कोलकात्याला असताना लोकमान्य टिळक आणि वासुकाका जोशी यांनी एका मुलींच्या शाळेला भेट दिली होती
. तेथील व्यवस्था एक माताजी पाहत. त्यांच्या पूर्वायुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे त्यांचे नेपाळच्या राजाशी संबंध होते. त्यावेळी नेपाळची सत्ता महाराजांच्या हाती नसून पंतप्रधानांच्या हाती जरी असली तरी त्या पंतप्रधानांचे भाऊ कर्नल कुमार नरसिंहराणा यांच्याशी महाराणी यांचा चांगला परिचय होता. त्यांच्या मदतीने पुढे बंदुकी बनवण्याच्या कारखान्याची तयारी करावी, अशी योजना टिळकांनी आखली आणि मग इकडे आल्यावर खाडिलकरांना ही कल्पना सांगून मग त्यांना नेपाळला पाठवले. कृष्णाजी प्रभाकर म्हणजे नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर हे १९०२ ते १९०४ या काळात नेपाळला वास्तव्य करत होते. लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून ते तिकडे बंदुका बनवण्याचा कारखाना सुरू करण्याच्या खटपटी करत होते, अशा नोंदी ब्रिटिश गुप्तचर अहवालात सापडतात. क्रांतिकारकांना वेषांतर करून परदेशात पाठवण्याची धाडसी योजना टिळकांच्या मनात होती. टिळकांनी विष्णुपंत छत्रे यांच्या सर्कशीला भेट दिली होती, तीही याच कारणामुळे! अनेक क्रांतिकारक या सर्कशीच्या आड लपून परदेशात गेले. आपली ओळख लपवण्यासाठी छत्रेंची सर्कस हे अतिशय हुकमी आणि प्रभावी माध्यम होते. १९०९ साली टिळक आणि वासुकाका जोशी हे विष्णुपंत छत्रे यांच्या सर्कशीबरोबर ब्रह्मदेशात गेल्याचे उल्लेख सापडतात. या सर्कशीतून अनेक क्रांतिकारक लपवण्याची व्यवस्था टिळकांनी करून ठेवली होती.


बीडचे बंड


मराठवाड्यात १८९९ च्या सुमारास बीडला क्रांतिकारकांचे बंड झाले होते
. त्या बंडाचे नेतृत्व करणारे सदाशिव जोशी हे त्यानंतर वेषांतर करून भारतभर फिरत होते. वेगवेगळी नावे घेऊन क्रांतिकार्यासाठी पैसे जमवत ते भारतभर भ्रमंती करत. मुंबईत ते नारायण साठेंच्या घरी राहिले. साठे लोकमान्य टिळकांचे घनिष्ठ स्नेही होते. बडोद्याला जाऊन ते शिपायांच्या एका गटाला भेटले होते. बडोद्यात तेव्हा टिळकांचे अत्यंत जवळचे स्नेही शंकर मोरो रानडे यांच्याशी त्यांनी चर्चा केल्याचे पुरावे सापडतात. चापेकरांचे सहकारी दामुअण्णा भिडे यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात या सदाशिव जोशींचा उल्लेख रावसाहेब पेशवे असा केलेला आहे. पुढे बनारस काँग्रेसच्या वेळी टिळक आणि त्यांची भेट घडवून आणण्याबद्दल काहींनी टिळकांना सुचवले होते. त्यावेळी हे रावसाहेब पेशवे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून सदाशिव जोशी आहेत इत्यादी माहिती टिळकांनी स्वतःच सांगितली, अशी आठवण वीर वामनराव जोशींनी लिहिलेली आहे. काशीला जेव्हा टिळक गेले तेव्हा त्यांची आणि या सदाशिव जोशींची ओळख झाली असावी. टिळक त्यांना चांगले ओळखत असावेत, अशी कबुली य. दि. फडके देतात.


बंगाली क्रांतिकारक आणि टिळक


गोपाळराव देऊस्कर हे टिळकांचे अनुयायी हे अरविंद घोष आणि बरिन्द्र घोष यांचे शाळेतले शिक्षक होते
. टिळकांच्या प्रेरणेतून बंगालमध्ये त्यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला होता. घोषांना क्रांतिकार्याची प्रेरणा देणारे देऊस्कर हे टिळकांचे पक्के अनुयायी! श्री अरविंद हे अतिजहाल क्रांतिकारकांच्या गटातले! अहमदाबाद इथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात टिळक आणि श्रीअरविंद यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली होती आणि ती मुख्यत्वे क्रांतिकारकांचा या पुढचा मार्ग कसा असावा, या संबंधात होती असे म्हणतात. क्रांतिकारक पक्षाचे नेतृत्व केवळ टिळक करू शकतील, या कल्पनेने आपण टिळकांची भेट घेतली आणि एकांतात मोकळेपणाने बोलता यावे म्हणून त्यांना काँग्रेसच्या मंडपातून बाहेर घेऊन गेलो, अशी कबुली खुद्द श्रीअरविंदांनी दिलेली आहे. दरम्यान, स्वदेशी आंदोलनाच्या काळात विख्यात इंग्रजी पत्रकार नेव्हिन्सन हे भारताच्या दौर्‍यावर आले होते. त्यांनी आपल्या पुस्तकात लोकमान्य टिळक आणि श्रीअरविंद यांच्याबद्दल विशेषत्वाने लिहिले आहे. अरविंदांचे महत्व आणि लोकमान्यांचा प्रभाव आणि औदार्य या दोन्हीचे सुंदर चित्रण त्यांच्या लेखनात दिसून येते. खुद्द अरविंद यांनीही टिळकांवर विस्तृत लेखन केले आहे, श्रीअरविंद लिहितात, Mr. Tilak by his past career, his splendid courage and self sacrifice, his services to the cause and the disinterestedness and devotion with which he used his influence, is naturally the most prominent of the Nationalist Leaders, and our party looks up to his experience, skill, cool acuteness and moral strength for guidance on great occasions like the congress session when it has to act as a single body (५th November १९०७ - Bande Mataram)सुरतेच्या काँग्रेसमध्ये टिळक आणि श्रीअरविंद सोबतच होते, तत्कालीन बहुतांश वर्तमानपत्रांच्या बातम्या बघितल्या तर टिळकांच्या सोबतीने श्रीअरविंदांचे नाव झळकलेले दिसते. नंतरच्या काळातही श्री अरविंदांनी लोकमान्य टिळकांवर विस्तृत लेखन केले आहे, लोकमान्यांवर आजवर इतर क्रांतिकारकांनी जे लेख लिहिले आहेत त्यापैकी सर्वश्रेष्ठ श्रेणीतले लेख श्रीअरविंद यांच्याकडून लिहिले गेले आहेत, हे मात्र नक्की!


एक धाडसी योजना


१९०२ साली व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी सातवे एडवर्ड बादशहा यांच्या राज्यारोहणाच्या निमित्ताने दिल्लीला मोठा थाटमाट करून मोठा समारंभ केला
, ज्यात हजारो रुपयांचा चुराडा झाला होता. हा कार्यक्रम होण्याआधीच त्यांना ठार मारावे, अशी योजना मुंबई महानगरपालिकेचे कारकून पांडुरंग शास्त्री कौजलगिकर यांनी रचली होती. भाऊ गोखले-पुणे यांनी त्यासाठी आवश्यक ती मदत केली होती. कर्झनला ठार मारावे, अशी टिळक आणि परांजपे यांचीही इच्छा आहे, असेही भाऊसाहेब गोखले यांच्या आठवणीवरून समजते. दिल्लीच्या मिरवणुकीत कर्झनला मारण्याच्या अनुषंगाने काही लोक गेलेही मात्र, तिथे कर्झनला गोळ्या घालणे त्यांना जमले नाही, असे म्हणतात. या प्रकरणाचा सुगावा इंग्रजांना १९०९ पर्यंत अजिबात लागला नाही. यावरून दिसते ती टिळकांची योजक आणि विवेकी वृत्ती!


बॉम्बचे प्रयोग


पुण्याचे दिनकरशास्त्री कानडे यांच्या आठवणीत एक महत्वाचा उल्लेख सापडतो
. गायकवाड वाड्यात एक दिवस रात्री बॉम्ब बनवण्याची पद्धत लिहिलेला एक कागद टिळकांनी त्यांना वाचायला दिला. ते लिहितात, “रात्र इतकी झाली होती की मी तो वाचीपर्यंत ते स्वस्थ बसले होते. नंतर ते मला म्हणाले, पुनः हा कागद तुम्हास पाहावयास मिळणार नाही. तुम्ही बेळगावास जा व गंगाधर पंतांस हे सर्व सांगून लवकर घेऊन या!” (हे गंगाधरपंत म्हणजे टिळकांचे घनिष्ठ स्नेही कोल्हापूरचे क्रांतिकारक गंगाधरपंत देशपांडे) देश अजूनही पारतंत्र्यात असल्यामुळे ही आठवण खरंतर बापटांच्या समग्र आठवणींच्या खंडात त्या काळात समाविष्ट केली नाही. जेव्हा तात्यासाहेब केळकरांना ही आठवण वाचून दाखवली तेव्हा केळकर म्हणाले होते, “बळवंतरावांना पूर्णपणे ओळखणे जरा कठीणच जाईल! टिळकांच्या क्रांतिकारक रूपावर शिक्कामोर्तब करतो.”


. दि. फडक्यांनी ‘लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक’ या पुस्तकात एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. फडके लिहितात, “गोविंदराव बापटांनी तयार केलेला, पत्र्याचे कवच असलेला एक बॉम्ब लोकमान्य टिळकांच्या घरीही होता. १६ मे रोजी गोविंदराव बापटांच्या घराची झडती घेण्यात आल्यानंतर टिळकांच्या घरात तो बॉम्ब ठेवणे धोक्याचे होते. तसे दामू जोशी यांनी वासुकाकांना सांगताच तो लोकमान्य टिळकांच्या घरातून आपण आधीच हलवला असल्याचे वासुकाकांनी दामू जोशींना सांगितले. बॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न करणार्‍या होतीलाल वर्मा, सेनापती बापट, गोविंदराव बापट, दामू जोशी वगैरेंशी टिळकांचे असलेले संबंध लक्षात घेता महाराष्ट्रात तेव्हा कोणते तरुण असे ‘आततायी’ उपाय योजण्याच्या मन:स्थितीत आहेत हे टिळक ओळखून होते, असे आता पुराव्यानिशी म्हणता येते.”


पुण्यात तीन बॉम्बस्फोट झाले तेव्हा हे उपाय टिकाऊ नाहीत हा लेख टिळकांनी लिहिला होता
. या बॉम्ब प्रकरणात सेनापती बापटांचा फार जवळून संबंध होता, म्हणूनच टिळकांना अटक होऊन मंडालेला पाठवल्यानंतर सेनापती बापट हे साडेचार वर्षांच्या अज्ञातवासात होते, हे विसरून चालणार नाही. लोकमान्य मंडालेहून आल्यानंतर त्यांनी चिरोलवर खटला भरला हे सर्वज्ञात आहे. टिळकांची यावेळी जी उलटतपासणी चिरोलचा वकील कार्सन याच्यामार्फत घेण्यात आली ती अतिशय वाचनीय आहे. लोकमान्य टिळकांचा भारतातल्या क्रांतिकारकांशी किती घनिष्ठ संबंध होता, त्याची खात्री त्यावरून पटते. या उलटतपासणीत टिळकांना सर्वाधिक प्रश्न हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल विचारण्यात आलेले आहेत. बाबा सावरकर आणि टिळकांचे संबंध, त्यांचा पत्रव्यवहार, चापेकर आणि टिळक संबंध यावरही टिळकांनी दिलेली उत्तरे फार मार्मिक आहेत.


देशाला स्वतंत्र करण्यासाठी
, भारतात ठिकठिकाणी क्रांतिकारकांच्यावतीने बॉम्ब फोडले जायचे, ब्रिटिश सरकार हादरायचे आणि दडपशाही सुरू व्हायची तुम्ही आम्हाला आमचे हक्क देणार नाही तर हे असेच होणार, असा इशारा टिळक सरकारला सातत्याने देत असत. मुजफ्फरपूरच्या बॉम्ब प्रकरणानंतर टिळकांनी असेच लिहिले होते, इकडून सशस्त्र क्रांती करून क्रांतिकारक ब्रिटिशांना हादरे देत होते तर दुसरीकडे तुम्ही आमचे हक्क देत नाही तोवर हे असेच होणार, असा इशारा टिळक देत आणि दोन्ही बाजूने सरकारला खिंडीत गाठत! ही जादू विलक्षण होती, एकीकडून समोरच्याला मारायचे आणि दुसरीकडे लगेचच, ‘अरे बाप रे लागले का तुला?’ असे विचारायचे, काळजी केल्यासारखे दाखवायचे! सोबतच आता मार खायचा नसेल तर इथून पुढे निमूटपणे चांगले वाग असा सज्जड दमही द्यायचा! टिळकांच्या बुद्धिकौशल्याची ही सगळी कमाल!


(क्रमश:)

- पार्थ बावस्कर

@@AUTHORINFO_V1@@