‘बोर्डी : चिकू महोत्सव २०२०’

22 Feb 2020 21:50:13


bordie chickoo_1 &nb



बोर्डीमध्ये दि. १ आणि २ फेब्रुवारी रोजी ‘चिकू महोत्सव’ होता. हा महोत्सव म्हणजे लोकांचा, लोकांसाठी भरवला जाणारा उत्सव! चिकू महोत्सवाने खर्‍या अर्थाने बोर्डी परिसराला कृषी, पर्यटन, प्रक्रिया व रोजगाराच्या संधी या सर्वच क्षेत्रांमध्ये नवसंजीवनी दिली आहे.


सकाळी ७
.१५ ला गाडी ‘स्टार्ट’ केली. रविवार आणि सकाळ यामुळे ट्रॅफिक विशेष नव्हते. डहाणू क्रॉस केल्यावर रस्ते अधिक छोटे होऊ लागले, पण आजूबाजूला चिकूची झाडे डोकावू लागली. घोलवड गेल्यावर तर चिकूच्या मोठ्या बागा दिसू लागल्या आणि चक्क आंबे काढावे तसे झेल्याने चिकू काढणे बघायला मिळाले. रंगांचे रिकामे झालेले डबे चिकू भरण्यासाठी वापरत होते. पूर्वी हे काम बांबूच्या टोपल्या करायच्या आता प्लास्टिक जिंदाबाद! मजल दरमजल करत शेवटी ‘गुगलच्या बाई’चे बोल कानावर आले... ‘पोहोचलो एकदाचे!’ पार्किंगमधील गाड्यांची रांग बघून वाटले की, महोत्सवाचे स्वरूप मोठे दिसते आहे. गाडी ‘पार्क’ करून मुख्य प्रवेशद्वाराशी आलो आणि खात्रीच पटली. कारण, प्रायोजकांमध्ये ‘एल अ‍ॅण्ड टीफायनान्स’, ‘वीणा वर्ल्ड’ यांचे बोर्ड दिसत होते. मी कॅमेरा बाहेर काढला आणि अगदी प्रवेशद्वारापासून फोटोग्राफी सुरू केली. स्मिताताईंना फोन करून स्टॉल क्रमांक विचारला आणि लक्षात आले की, त्यांचा फूड स्टॉल क्र. १५ आहे. एकूण ‘इव्हेंट लेआऊट’ बघता लक्षात आले की, पोटपूजेचे स्टॉल एकदम शेवटी आहेत. ‘वेस्टर्न पॉईंट’ला ब्रंच झालेला असल्यामुळे मी स्मिताताईंना कळवले की, सगळे बघत जेवणासाठीच तुमच्या स्टॉलवर येतो.



सुरुवातीचे काही स्टॉल प्रदर्शनातील नेहमीसारखे टिपिकल पर्स
, वारली पेंटिंग, ज्वेलरी असे होते. पण मला रस होता ते चिकूची उत्पादने बघण्यात! कारण, मी गेल्या वर्षी ‘चिकू चिप्स’ बनवण्याचा केलेला प्रयत्न केला होता फसला होता. पुण्यातील ज्या शेतकर्‍यांचे चिकू जमिनीवर पडून फुकट जातात, त्यांना सुचवायला काही गोष्टी मिळतील याच्या मी शोधात होतो. १०/१२ स्टॉल्सनंतर मात्र पहिला स्टॉल बघायला मिळाला तो ‘अमृत माधुरी.’ ‘अमृत माधुरी घोलवड महिला सेवा संघ’ ही चिकू प्रक्रियेतील एक ‘पायोनियर’ संस्था मानली जाते. मी तेथे पहिल्यांदा ‘चिकू चिप्स’ व चिकूच्या लोणच्याची टेस्ट घेतली. त्यांनीच सुचवले की, ‘एकदम खरेदी करू नका. पुढील सर्व स्टॉल्सला भेटी द्या. सगळ्यांची चव चाखा, पण तुम्ही नक्की आमच्याकडेच येऊन खरेदी कराल इतकी आमची क्वॉलिटी आहे.’ पडत्या फळाची आज्ञा. आम्ही पुढील स्टॉल्सकडे गेलो, अर्थात तेथेही चिप्स आणि लोणचेच होते. त्यानंतर मात्र स्टॉल्सची विविधता वाढू लागली. ‘चिकू पार्लर’च्या स्टॉलवर चिकू मिल्क शेक, चिकू कुल्फी, चिकू आईस्क्रीम, चिकू पावडर असे प्रकार दिसले तर पुढील स्टॉलवर चिकू हलवा, चिकू मोहनथाळ, चिकू बर्फी असे मिठाईजन्य पदार्थ दिसू लागले. थोडे पुढे गेल्यावर ‘चिकू फज’ आणि ‘चिकू केक’ आकर्षकपणे मांडलेले दिसले. ‘चोकोडेस्क’ या कंपनीचे अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पॅकिंग असलेला चॉकलेट आणि चिक्कू अशा थीमचा स्टॉल बघायला मिळाला. ‘चोकोडेस्क’ ही वापी येथील कंपनी. आपण वाढदिवसाला काही सुचले नाही तर कॅडबरी अगदी सहज भेट देतो. त्याला ‘चोकोडेस्क’चा चॉकलेट हा पर्याय मिळू शकतो, आवश्यकता वाटते ती जाहिरातीची आणि उपलब्धतेची? वातावरण अगदी चिकूमयच झाले होते.



थोडे पुढे गेल्यावर नॉनव्हेज खाद्यपदार्थांचे स्टॉल दिसू लागले
. अर्थात, प्रदर्शनाचा शेवट वाटत नव्हता म्हणून सहज एका स्टॉलधारकांना विचारले असता लक्षात आले, नॉनव्हेज आणि व्हेज स्टॉल भिन्न ठिकाणी ठेवले आहेत. त्या फूड स्टॉलनंतर चिकू उत्पादने सोडून अन्य वस्तूंचे स्टॉल होते, जसे कागदांची फुले, लाकडी किचेन, ड्रेस मटेरिअल, अन्य खाद्यपदार्थ. आम्हाला कागदी फुलांचा स्टॉल आवडला. अर्थात खरेदी येताना करायची ठरलेले असल्यामुळे स्टॉल बघून पुढे सरकलो. पुढच्या सेक्शनमधील स्टॉल थोडे नावीन्यपूर्ण होते, जसे पेपरपल्पपासून बनवलेल्या विविध वस्तू, बांबूपासून बनवलेल्या घरगुती वस्तू जसे सूप (पाखडायचे! प्यायचे नाही.) टोपली, करंड्या, हारे (कदाचित आजच्या पिढीला हे शब्दही माहीत नसतील) आणि हो या सेक्शनमधील स्टॉलवर प्रत्यक्ष चिकू हे फळ ही विक्रीस होते. करिअर काऊंसिलिंग, कॅलिग्राफी, कॅनव्हास पेंटिंग असे अ‍ॅक्टिव्हीटी बेस्ड स्टॉल्सही या सेक्शनमध्ये होते. आत शिरल्यापासून जवळपास दीड तास लोटला होता.



व्हेज फूड प्लाझा’ म्हणजे एक खाद्यजत्राच होती. सुरुवातीलाच ‘पोटॅटो ट्विस्टर’ हा एक नवीन प्रकार बघायला मिळाला. एकाच मोठ्या बटाट्यामधून एका स्टिक वर सलग बटाटा चिप्स डीप फ्राय करून वरती चीज लायनर! पुढे अनेक चाटचे स्टॉल्स, सँडविच, पिझ्झा काही नाही असे नव्हते. मराठमोळ्या रसिकांसाठी वडापाव, मिसळपाव आणि स्मिताताईंच्या (उर्फ बबडी) भाऊ व वहिनी सतेज व वैशाली सावे यांच्या स्टॉलवर स्पेशल ऊकडहंडी होती. स्टॉलची पाटी एकदम भारी होती. ‘१९४२ चुलीची कमाल.’ सहज स्मिताताईंना विचारले, हा काय प्रकार आहे? तर त्या अगदी उत्स्फूर्तपणे बोलू लागल्या, “१९४२ ला ‘चले जाव’ चळवळ सुरू झाली अगदी तसेच आमची चळवळ आहे. नवीन रेडिमेडवाल्या अन्न प्रक्रियांविरुद्ध. पुन्हा स्वातंत्र्य हवे आहे भेसळयुक्त अन्नापासून. निसर्ग संकल्पना आधारित भोजन संकृती राबवणे हेच आमचे ध्येय!” जेवणाच्या स्टॉलच्या बाजूलाच सुंदर स्टेज होते. योगायोगाने आम्ही जेवत असताना तेथे वनवासी बांधवांचे तारपावरील नृत्य चालू होते. सुंदर वेशभूषा आणि नृत्य बघून डोळ्याचे पारणे फिटले. आज पूर्ण ‘चिकू डे’ असल्यामुळे सुचिताने ‘डीझर्ट’ म्हणून ‘चिकू मिल्कशेक’ घेतला, तर मी व शिवराजने ‘चिकू कुल्फी!’



पोटपूजा झाल्यावर स्टेजच्या मागच्या बाजूला चौपाटी बघायला गेलो
. थोडी निराशाच झाली. कारण, बोर्डीचा समुद्रकिनारा खूप आत गेलेला दिसला. बहुधा ओहोटी असावी. अर्थात, काही चालती बोलती प्रेक्षणीय स्थळे होती, तेवढाच काय तो दिलासा. अर्थातच तेथे जास्त वेळ न काढता परतलो. स्मिताताईंची भेट घेऊन महोत्सवाची माहिती दिल्याबद्दल मनोमन धन्यवाद दिले व त्यांचा निरोप घेतला. आता पुन्हा प्रवेशद्वार गाठायचे, पण उलट क्रमाने जाऊन ठरलेल्या स्टॉलवर खरेदी करणे हा महत्त्वाचा ‘इव्हेंट’ बाकी होता. मला पुण्याच्या शेतकर्‍यांनाही चिकूचे प्रक्रिया केलेले पदार्थ दाखवायचे असल्यामुळे लोणचे, चिप्स, चिकू पावडर असे एक-एक ‘आयटम’ खरेदी केले. आणलेल्या कापडी पिशव्या अगदी गळ्यापर्यंत भरल्या होत्या आणि वजनदारही लागत होत्या. खरेदी थांबवली आणि ‘एक्झिट’च्या दिशेने वाटचाल सुरू केली. वाटेत एका एनजीओने ग्रामीण जीवनाच्या अनुभवासाठी गमतीशीर अ‍ॅक्टिव्हिटी ठेवल्या होत्या - कोंबडी पकडणे, तारपा वाजवणे, कांडण काढणे. मी आणि शिवराजने तारपा वाजवणे ‘ट्राय’ केले, माझ्या फोटोग्राफीसाठीही ती पर्वणीच!



चिकू महोत्सव अगदी मनसोक्त अनुभवला आणि बाहेर पडलो
, ते पुढील वर्षी नक्कीच भेट देण्याच्या संकल्पाने - अमोल पाटील व योगेश राऊत यांचा संपर्क झाला. या द्वयींशी बोलल्यावर चिकू महोत्सवाची इत्थंभूत माहिती मिळाली. हा महोत्सव २०१३ फेब्रुवारीला पहिल्यांदा झाला. ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’च्या तत्कालीन अधिकारी किशोरी गद्रे यांनी ही संकल्पना मांडली. सुरुवातीची तीन वर्षे ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’च्या आर्थिक पाठबळावर हा महोत्सव पार पडला, पण पुढीलच्या काळात ‘एमटीडीसी’चा हातभार मिळाला नाही, हा महोत्सव बंद पडतो का काय अशी स्थिती असताना बोर्डीमधील काही स्थानिकांनी २५ हजार रुपये काढून उत्सव सुरू ठेवला. आजचे त्याचे रूप म्हणजे कायापालटच आहे. या वर्षी या महोत्सवात कुठल्याही सरकारी योजनेवर अवलंबून न राहता स्टॉलधारकांकडून शुल्क घेऊन तसेच ‘एल अ‍ॅण्ड टी फायनान्स’, ‘वीणा वर्ल्ड’ अशा अनेक प्रायोजकांच्या साहाय्याने अगदी दिमाखात पार पडला. अंदाजे दोन दिवसात १.५ लाख लोकांनी या महोत्सवाला भेट दिली. या महोत्सवाच्या माध्यमातून येथील ग्रामीण शेतकरी, वनवासी बंधू, चिकू प्रक्रिया उद्योजक या सगळ्यांनाच आर्थिक हातभार लागतो! या महोत्सवाच्या काळात बोर्डी परिसरात शेती व पर्यटन व प्रक्रिया उद्योगातून जवळपास ३ कोटींची उलाढाल होते. एका छोट्या स्टॉल्समधून सुद्धा आठ-नऊ जणांसाठी रोजगार निर्मिती होते. चिकू महोत्सव म्हणजे बोर्डी परिसराच्या अर्थकारणातील एक मोठी आनंदाची झालर!




-अजित वर्तक
(लेखक संगणक सल्लागार व ऑरगॅनिक सप्लायर आहेत.)

८०९७७९६०७०

Powered By Sangraha 9.0