वन्यजीव संशोधक रोव्हीन तोडणकर यांना पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2020
Total Views |
rovhin_1  H x W

मुंबई : ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’चे (डब्ल्यूसीटी) वन्यजीव संशोधक रोव्हीन तोडणकर यांना ‘नॅशनल अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड फॉर रिसर्च इन वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ’इमेज वेल्फेअर अचिएव्हर्स फोरम’ या संस्थेकडून तोडणकरांसह ’डब्ल्यूसीटी’ संस्थेला येत्या १६ मार्च रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तोडणकर यांनी मध्य भारतात व्याघ्र संशोधनाचे काम केले असून सध्या ते सह्याद्रीत संशोधनकार्य करत आहेत.


ठाण्याच्या ‘इमेज वेल्फेअर अचिव्हर्स फोरम’कडून दरवर्षी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या तरुणांना पुरस्कार दिले जातात. यंदा संस्थेने पर्यावरण क्षेत्रातील पुरस्कारासाठी ‘डब्ल्यूसीटी’चे संशोधक रोव्हीन तोडणकर यांची निवड केली आहे. येत्या १६ मार्च रोजी ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये संस्थेकडून राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत रोव्हीन यांच्यासह ’डब्ल्यूसीटी’ संस्थेला गौरविण्यात येईल. रोव्हीन यांनी मुंबईच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधून ‘प्राणिशास्त्र’ विषयामधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. महाविद्यालयीन काळातच ते ’संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’च्या निसर्ग भ्रमंतीसाठी मार्गदर्शक म्हणून काम करत होते.


त्यानंतरच्या काळात ‘इको पर्सोना’ या सामाजिक संस्थेसाठी पर्यावरण शिक्षणासंदर्भात त्यांनी काम केले. २०१५ पासून त्यांनी ‘डब्ल्यूसीटी’ संस्थेसोबत काम करण्यास सुरुवात केली. या संस्थेंतर्गत रोव्हीन यांनी मध्य भारतातील व्याघ्र संवर्धनासाठी काम केले आहे. या भागातील पेंच, सातपुडा, नवेगावबांध, कान्हा-पेंच कॉरिडोर, मेळघाट आणि ओंकारेश्वर व्याघ्र प्रकल्पांमध्ये त्यांनी वाघांवर संशोधनाचे काम केले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ते सह्याद्रीतील शोधकार्याच्या मोहिमेत कार्यरत आहेत. महाराष्ट्रामधील पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडील ‘राधानगरी ते तिलारी’ या वन्यजीवांच्या भ्रमणमार्गांसंदर्भात त्यांचे शोधकार्य सुरू आहे.
@@AUTHORINFO_V1@@