वारिस पठाण विरोधात अंधेरीत तक्रार

21 Feb 2020 15:28:04
Waris-Pathan_1  


 
 

मुंबई : एमआयएम नेते वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आता तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. अंधेरी पोलीस ठाण्यात वारिस पठाण यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. संघर्ष संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज म्हस्के यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या तक्रारीची प्रत पोलीसांकडे सुपूर्द केली आहे. याबद्दल आता पोलीस काय कारवाई करतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
 
 
कर्नाटकतील गुलबर्गा येथे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्यावेळी १५ फेब्रुवारीला, " लक्षात ठेवा, १५ कोटी आहोत पण १०० कोटींवर भारी आहोत" असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. "सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत. पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल?", असा इशाराही त्यांनी व्यासपीठावरून दिला होता. याच वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी संघर्ष संघटनेने केली आहे.
 
 
दरम्यान, हे वक्तव्य गुलबर्गा येथील सभेतील असल्याने याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करता येऊ शकतो का याची कायदेशीर चाचपणी अंधेरी पोलीस करत आहेत. मात्र, हे चितावणीखोर वक्तव्य आम्ही प्रसिद्धीमाध्यमांतून पाहिले आहे. त्यामुळे कारवाई व्हायलाच हवी, असा आग्रह या संघटनेचे अध्यक्ष म्हस्के यांनी केला आहे.
 
 













 
 
Powered By Sangraha 9.0