गड-किल्ल्यांना गवसणी घालणारा गिरीवीर

21 Feb 2020 19:05:39


rahul meshram _1 &nb



दर्या-खोर्यांत, गड-किल्ल्यांवर भटकंती करणारा आणि याच माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणार्या राहुल मेश्राम या स्वछंदी गिर्यारोहकाच्या आयुष्याचा वेध घेणारा हा लेख.


गड-किल्ल्यांवर भ्रमंती करणार्‍यांचा आनंद काय वर्णावा? सुट्टी किंवा पावसाळ्यात बॅग भरून गड-किल्ल्यांच्या भ्रमंतीला निघणार्‍यांचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा असतो. ऊन-पाऊस-वारा याची तमा न बाळगता गिर्यारोहणाच्या छंदाने झपाटलेल्या अशाच एका विलक्षण गिर्यारोहकाविषयी जाणून घेऊया.

 

मुंबईतील मुलुंडच्या राहुलला लहानपणापासूनच डोंगर भटकंतीची प्रचंड आवड. पण, घरातून गिर्यारोहणासाठी परवानगी नसल्याने राहुलला आपला हा छंद अनेक वर्षे जोपासताच आला नाही. घरी आईवडिलांना अनेकदा सांगून, समजावून प्रसंगी भांडूनसुद्धा गिर्यारोहणाबाबत नकारच त्याच्या वाटेला आला. पण, राहुलने आपला छंद बंद केला नाही तर उलट त्याचे गिर्यारोहणाचे प्रेम वृद्धिंगतच होत गेले.

 

अखेरीस महाविद्यालयामध्ये राहुल ‘ट्रेक क्षितिज’ संस्थेच्या सहवासात आला आणि मग त्याने अनेक वर्षांपासूनचे आपले स्वप्न सत्यात उतरविले. राहुल ‘ट्रेक क्षितिज’ संस्थेचा सभासदही झाला. या संस्थेमुळे राहुलला अक्षरश: गिर्यारोहणाचे व्यसनच लागले. दर शनिवार-रविवार कुठल्या ना कुठल्या किल्ल्यावर याची भ्रमंती सुरूच... कशाचीच तमा न बाळगता त्याने आजपर्यंत अडीचशेपेक्षा जास्त गड-किल्ले पालथे घातले. त्याने गिर्यारोहणाचा सपाटाच लावला. यातूनच तो गिर्यारोहनाचे नवीन तंत्र आत्मसाद केले.

 

यात धबधब्यावर दोरखंड बांधून उतरणे असो (रॅपलिंग)किंवा गडकिल्ले सर करताना आधुनिक सुरक्षा पद्धतीचा वापर असो, यामुळे गिर्यारोहणात नवनवीन आव्हानांना राहुल आनंदाने सामोरा गेला. पुढे अनेक तरुण-तरुणींनी गिर्यारोहणाच्या या आव्हानात्मक भटकंतीत सहभागही घेतला. यामुळे संस्था महाराष्ट्रभर प्रसिद्धीस पावली. पण, काही वर्षांपूर्वी राहुलचा अपघात झाला. तो गंभीर जखमी झाल्याने त्याला गिर्यारोहणापासून जवळजवळ एक वर्षे लांब राहावे लागले होते.

पण, त्यानंतर राहुलने तडक हिमालयाचे सारपास,स्ट्रोक कांग्री पादाक्रांत केले. त्यामुळे अपघातही राहुलला गिर्यारोहणाच्या जिद्दीपासून, आवडीपासून विभक्त करू शकला नाही. उलट अधिक जोमाने राहुल गड-किल्ल्यांना कवेत घेण्यासाठी सज्ज झाला. काहीजणांना गिर्यारोहण म्हणजे केवळ गड-किल्ल्यांचा फेरफटकाच वाटतो. पण, हे किल्ले नुसता फेरफटका मारण्यासाठीचे ‘पिकनिक स्पॉट’ नव्हे तर ते आपल्या ज्वलंत इतिहासाचे साक्षीदार आहेत. अशा या गड-किल्ल्यांवरील अस्वच्छता पाहता, राहुल यांनी विविध किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली.

 

विशेषत: सुधागड किल्ल्यावर गड संवर्धनाचे काम संस्थेमार्फत 2004 पासून राहूल करीत आहे. या ऐतिहासिक वारशाच्या संरक्षण व संवर्धनासाठी अनेक गिर्यारोहक एकटवले. याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीचे उपक्रमदेखील राहुलने वेळोवेळी आयोजित केले. तसेच आजच्या तरुणाईला गिर्यारोहणाची आवड निर्माण व्हावी म्हणून ‘ट्रेक क्षितिज’ संस्थेतर्फे गड-किल्ल्यांवरील ऐतिहासिक मोहिमांची माहिती देणारे प्रदर्शनही ठिकठिकाणी आयोजित केले जाते. या संस्थेचा गेल्या सात वर्षांपासून राहुल अध्यक्ष असून त्याने या कार्यात अक्षरश: स्वत:ला झोकून दिले आहे. मात्र, आजही गिर्यारोहणापेक्षा जोखीम पत्करून जीवावर बेतणारे ’सेल्फी’ घेण्यातच बरेच तरुण धन्यता मानताना दिसतात. त्यामुळे गड-किल्ल्यांवर असे ‘स्टंट’ न करण्याचा सल्ला राहुल तरुण गिर्यारोहकांना देतात.

 

आज अनेक संस्थांमध्ये गिर्यारोहण हे फक्त व्यवसाय किंवा करमणूक म्हणून केले जाते. पण, त्याची आवड आणि महत्त्व पटवून दिले जात नाही, अशी खंतही राहुल व्यक्त करतो. गिर्यारोहण करताना दर्‍या-खोर्‍यांमध्ये कोणी अडकल्यास, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासही राहुल मदत करतात. काही वर्षांपूर्वी माळशेज घाटाच्या दरीत कोसळलेल्या बसमधील मृतदेह खूप खोलवर अडकले होते. यावेळी राहुल यांच्या एमएमाआरसीसी संपर्कातून गिर्यारोहण संस्थांच्या मदतीने हे मृतदेह काढण्यात आले. या प्रसंगानंतर ‘रेस्क्यू टीम’ आणि राहूल एकत्र काम करतात. बनविण्यात आली. यात पोलीस आणि गिर्यारोहकांचाही सहभाग असून राहुल यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

 

आज राहुल त्याची रेल्वेमधील इंजिनिअरची नोकरी सांभाळून गिर्यारोहणाशी निगडित मोहिमा राबवित असून याकामी त्याला त्याच्या पत्नी नेहाची उत्तम साथ लाभली आहे. राहुलची पत्नीही गिर्यारोहक असल्याने हे दाम्पत्य आता तर चक्क आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीसोबत गिर्यारोहणाचा आनंद लुटते. आपल्या मुलीलाही गिर्यारोहणाची आवड निर्माण व्हावी, अशी राहुलची इच्छा आहे. आज संपूर्ण देशात अनेक गिर्यारोहण संस्था कार्यरत आहेत. मात्र, सरकारकडून या संस्थांना विशेष सहकार्य मिळत नाही. महाराष्ट्र सरकारने काही वर्षांपूर्वी काढलेल्या ‘जीआर’ची अजूनही अंमलबजावणी न केल्याने अनेक बेकायदेशीर गिर्यारोहण संस्थांचे पेव फुटले आहे. त्यामुळे डोंगरातील अपघातांची संख्या वाढली आहे. राहुलला त्याच्या या कार्यकर्तृत्वासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. राहुलने गिर्यारोहणाच्या या ‘पॅशन’मधूनही सामाजिक जाणिवेचा बुरुज अधिक भक्कम केला आहे. त्याच्या या भ्रमंतीला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेक शुभेच्छा!

 



-कविता भोसले  
Powered By Sangraha 9.0