डोंबिवलीतील आगीत दीड लाख लीटर पाण्याचा वापर

20 Feb 2020 18:02:48
Dombivali_1  H
 


डोंबिवली (रोशनी खोत ) : डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसीत ‘मेट्रोपोलिटीन’ कंपनीला मंगळवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही आग आटोक्यात आणण्यासाठी दीड लाख लीटर पाणी वापरण्यात गेले.
 
 
एमआयडीसी फेज-२ येथील मे. ‘मेट्रोपॉलिटीन एक्सिम’ नावाची कंपनी आहे. स्पेशालिटी असलेले केमिकल तयार करण्याचे काम प्रामुख्याने या कंपनीत केले जाते. कंपनी आणि गोडाऊन एकाच ठिकाणी असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. गेले २४तास धुमसत असणारी ही आग विझविण्यासाठी कडोंमपाच्या अग्निशमन दलाच्या सुमारे आठ गाड्या, तर याव्यतिरिक्त इतर ठिकाणांहून आणखी आठ गाड्या मागविण्यात आल्या होत्या. सुमारे १२ टँकर या ठिकाणी वापरण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली. याचबरोबर दोन टन ‘फोम एक्स्िंटग्विशर’ देखील वापरण्यात आले आहेत.
 
 
या आगीत भस्म झालेल्या ‘मेट्रोपोलिटीन’ कंपनीला पुन्हा नव्याने उभे राहण्यास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असून या महिन्याचा पगार कामगारांना देण्यात येणार आहे. शासनाने कंपनीच्या स्थलांतराचा निर्णय घेतल्यास कंपनी याबाबत सकारात्मक विचार करणार असल्याचे समजते. 
 
 
कामगारांची नोकरी कायम राहणार!
मंगळवारी दुपारी एमआयडीसी फेज-२ परिसरातील मेट्रोपोलिटीन एक्सिम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भीषण आग लागली होती. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी बुधवारची दुपार उजाडली. या कंपनीतील ४५० कामगारांना आपल्या नोकरीचा प्रश्न सतावू लागला होता. त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच काही कामगार कंपनीबाहेर मालकांच्या आदेशाची वाट पाहात बसले होते. याबाबत कंपनीचे व्यवस्थापक दत्तात्रय मनसुख यांनी कामगारांना घाबरण्याचे काहीही कारण नसून या कामगारांची नोकरी कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0