कवीमनाचा उद्योजक

    दिनांक  20-Feb-2020 21:52:16   


Chandrahas Gopinath Rahat


चंदूने जिद्द सोडली नाही. त्याने पाच स्वप्नं पाहिली. मोबाईल, लॅपटॉप, कार, स्वत:चा फ्लॅट आणि 'मिलीयन डॉलर राऊंड टेबल' अर्थात 'एमडीआरटी' हा विमा क्षेत्रातील मानाचा किताब.


जगभरातील विमा क्षेत्रातील फक्त तीन टक्के लोकांना 'सीओटी' अर्थात 'कोर्ट ऑफ दी टेबल' हा सन्मान मिळतो. तो सन्मान स्वीकारताना त्याला त्याचं चाळीतलं ऑफिस आठवलं. ऑफिस कसलं म्हणा, नावालाच टेबल अन् खुर्ची, पण त्या काळात त्याने एमटीएनएलची भली मोठी वायर टाकून फोनची लाईन घेतली होती. फोन खणखणला की काय अप्रूप होतं त्याचं. त्या ऑफिसात बसून त्याने पाच स्वप्नं पाहिली होती. ती स्वप्नं त्याने पुढील पाच वर्षांमध्ये पूर्ण केली. वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलेला 'चंदू' ते दीड हजारांहून अधिक कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणारा 'चंद्रहास' व्हाया कवितेचा नाट्याविष्कार करण्याचा मराठी रंगभूमीवर पहिलाच यशस्वी प्रयोग करणारा 'कवी चंद्रहास' हा प्रवास चित्तरंजक आणि रोमांचक असा आहे. विमा उद्योगक्षेत्रातील कवीमनाचा हा उद्योजक म्हणजे 'सीजीआर कन्सल्टंट'चे संचालक चंद्रहास गोपीनाथ रहाटे.

 

'बॉम्बे पोर्ट ट्रस्ट'मध्ये कार्यरत असणारे गोपीनाथ महादेव रहाटे मूळचे रत्नागिरीतील आंबेशेतचे. स्मिता रहाटेंसोबत त्यांचा विवाह झाला. त्यांना एकूण तीन अपत्ये. सारं काही सुरळीत सुरू चाललंय असं वाटत असतानाच गोपीनाथांचा मृत्यू झाला. त्यावेळेस चंद्रहास सात वर्षांचा, सतीश चार वर्षांचा, तर महानंदा अवघी सहा महिन्यांची होती. रहाटे कुटुंबासाठी हा फारच मोठा आघात होता. किंबहुना स्मिता रहाटेंसाठी अग्निपरीक्षाच होती जणू. अनुकंपा तत्त्वावर त्यांना 'बॉम्बे पोर्ट ट्रस्ट'मध्ये नोकरी मिळाली. चंद्रहास आणि सतीश आपल्या काकांकडे बोरिवलीला गेले. महानंदाला घेऊन सातरस्ता येथील एका चाळीत स्मिता रहाटे राहू लागल्या. चंद्रहासला सगळे प्रेमाने 'चंदू' म्हणत. चंदूचं प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झालं. माध्यमिक शिक्षण मात्र बिमानगरच्या एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झालं. महाविद्यालयीन शिक्षण दादरच्या कीर्ती महाविद्यालयातून झाले. १९९० साली वाणिज्य शाखेची पदवी चंदूने प्राप्त केली. दरम्यान, १९८८ साली चंदूला शेजारी राहणारे दीपक सुर्वे ट्रेनमध्ये भेटले. ते आयुर्विमा महामंडळात विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. चंदूची मेहनत पाहून ते भारावले. "माझ्यासोबत काम करतोस का? शिकायला मिळेल. स्टायपेंड म्हणून २०० रुपये देईन, बोल येतोस का चंदू...?" नवीन काहीतरी शिकण्याची चंदूला आवड होतीच. आईची परवानगी घेऊन चंदू मदतनीस म्हणून दीपक सुर्वेंकडे जाऊ लागला. तिथे त्याला विम्यासंबंधी सर्व काही बारकावे शिकायला मिळाले. "तू दुसरी नोकरी करायची नाहीस. केलंस तर स्वत:चंच काहीतरी करायचं," दीपक सुर्वेंनी चंदूला सांगितले होते. आपल्या गुरुचा आदेश शिरसावंद्य मानून चंदूने लगेचच्याच वर्षी' भारतीय आयुर्विमा महामंडळा'ची स्वत:ची एजन्सी घेतली.

 

अरुण सातपुते हा चंदूचा वर्गमित्र त्याचा पहिला क्लायंट ठरला. चंदू आईसोबत सातरस्त्याच्या चाळीत राहायचा. तिथेच पडवीत त्याने छोटंसं टेबल आणि खुर्ची टाकून आपलं ऑफिस सुरू केलं. ओळखीच्या- अनोळखी व्यक्तींना तो विम्याचे फायदे सांगू लागला. अनेकवेळा लोकांकडून प्रतिसाद म्हणून नकारघंटा यायची. चंदूने जिद्द सोडली नाही. त्याने पाच स्वप्नं पाहिली. मोबाईल, लॅपटॉप, कार, स्वत:चा फ्लॅट आणि 'मिलीयन डॉलर राऊंड टेबल' अर्थात 'एमडीआरटी' हा विमा क्षेत्रातील मानाचा किताब. पाचच वर्षांमध्ये त्याने पहिला मोबाईल घेतला. १६ रुपये इनकमिंग कॉलसाठी त्यावेळेस आकारले जायचे. त्यानंतर लॅपटॉप, कार, फ्लॅट आणि 'एमडीआरटी'हा किताबसुद्धा. एक वर्ष वगळता गेली २० वर्षे चंद्रहास रहाटे हे 'एमडीआरटी' मिळवत आहेत. 'एमडीआरटी' पेक्षा मोठा समजला जाणारा आणि जगभरात विमा क्षेत्रात फक्त तीन टक्के लोकांना मिळणारा 'कोर्ट ऑफ दी टेबल' अर्थात 'सीओटी' हा सन्मान त्यांनी दोन वेळा पटकावला आहे. आतापर्यंत दीड हजारांहून अधिक कुटुंबांना त्यांनी विम्याची सेवा दिलेली आहे. यामध्ये मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीतील नामवंत कलावंत, उद्योजक, खेळाडू आदींचा समावेश आहे. १९९८ साली चंद्रहास यांचा सविता या सुविद्य तरुणीसोबत विवाह झाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीची संधी आलेली असतानाही त्यांनी आपल्या पतीसोबत त्यांच्या व्यवसायास हातभार लावण्यास पसंती दिली. 'सीजीआर कन्सल्टंट'च्या प्रशासनाची पूर्ण जबाबदारी त्या पाहतात. या दाम्पत्यास दोन मुले आहेत. सर्वेश बी.कॉमच्या शेवटच्या वर्गात शिकत आहे, तर सिद्धी सातवीत शिकत आहे.

 

चंद्रहास रहाटे हे कवीदेखील आहेत. अकरावीमध्ये असताना त्यांनी पहिली कविता रचली होती. अनेक दिवाळी अंकात त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. सन २००० मध्ये 'कविता तुझी माझी' हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला होता. काव्यरसिकांनी त्यास उदंड प्रतिसाद दिला होता. 'महाराष्ट्रीयन माणसा जागा...' ही कविता त्यांची मराठी उद्योगविश्वात प्रचंड गाजली. 'सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट' या महाराष्ट्रीय उद्योजकीय संस्थेतील मित्रांनी चंद्रहासला कवितांचे कार्यक्रम करण्यास सुचविले. त्यावेळेसच त्यांची भेट संकेत शिर्के, पराग भोई, इमॅन्युअल बर्लिन या संगीतकारांसोबत झाली. त्यातूनच 'आठवणींच्या फुला' हा काव्यात्मक कार्यक्रम सुरू झाला. हा कार्यक्रम नाट्यगृहात करण्याचे स्वप्न चंद्रहास रहाटे यांनी पाहिले. दिग्दर्शक सुनील देशपांडे व निवेदक किरण खोत यांची त्यास साथ लाभली आणि पहिल्यांदा मराठी रंगभूमीवर कवितांचा गाणी-नृत्य-अभिनयाद्वारे नाट्याविष्कार झाला. आतापर्यंत कवी म्हणजे 'टिपिकल कविता सादर करणारा' या संकल्पनेस छेद देत कवी चंद्रहास रहाटे यांनी व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचं धाडस केले. १४ फेब्रुवारी अर्थात 'व्हॅलेन्टाईन डे'ला पहिला प्रयोग ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर येथे रंगला. या अभिनव प्रयोगास उपस्थितांनी भरभरून दाद दिली. महाराष्ट्रभर हा कार्यक्रम नेण्याचा आणि कवींना व्यावसायिक मूल्य मिळवून देण्याचा चंद्रहास रहाटे यांचा मानस आहे. याच कार्यक्रमात 'समबडी कुणीतरी प्रेम करावं' या काव्यसंग्रहाचंदेखील प्रकाशन झालं. एखाद्या व्यक्तीस कठोरपणे बचत करावयास लावून त्याच्या वाईट आर्थिक परिस्थितीत हात देण्याचे काम 'एलआयसी' अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळ गेली अनेक वर्षे करत आहे. हे सामाजिक कार्य समजून कधीच नोकरी न करता पूर्ण वेळ देऊन हजारो कुटुंबं जोडून 'चंदू'ने घेतलेला वसा 'चंद्रहास गोपीनाथ रहाटे' हा कवीमनाचा जोपासत आहेत. अकाली वैधव्य अनुभवलेल्या त्या माऊलीला खर्‍या अर्थाने 'श्रीमंत' झाल्याचा साक्षात्कार होतो.