रस्त्यावर उतरले पाहिजे !

    दिनांक  02-Feb-2020 20:34:17   
|

support CAA_1  आज खरी आवश्यकता आहे ती, रस्त्यावर उतरण्याची. ‘नागरिकत्व कायद्या’च्या समर्थनार्थ सगळा महाराष्ट्र ढवळून काढण्याची. मोठमोठ्या शहरात लाखा-दीड लाखांचे मोर्चे काढण्याची. राष्ट्रभक्त नागरिकांच्या अफाट शक्तीचे प्रदर्शन करण्याची. काट्याने काटा काढायचा असतो, अशी म्हण आहे. आंदोलनाला प्रतिआंदोलनाने उत्तर द्यायचे असते.


नागरिकत्व कायदा’ झाल्यापासून समाजातील एका गटाने त्याचा विरोध सुरू केला आहे. ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ असे दोन्ही विषय एकत्र करून मुसलमानांच्या मनात भीतीची भावना निर्माण करण्याचे काम चालू आहे. हे काम काँग्रेस पक्ष, सर्व डावे पक्ष, प्रकाश आंबेडकर, मायावती असे सर्व मिळून करीत आहेत. चित्रपट क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात जी डावी मंडळी बसलेली आहेत, ती पत्रक काढून ‘नागरिकत्व कायद्या’ला विरोध करीत आहेत आणि सरकारलाही विरोध करीत आहेत. पहिले आंदोलन जामिया मिलिया इस्लामिया, दिल्ली येथे सुरू झाले. तेथे हिंसाचार झाला. पोलिसांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिरून आंदोलकांना मारले. त्याच्या प्रतिक्रिया पुन्हा सर्व देशभर उमटल्या. अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे ठरविले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी ज्या विद्यापीठात डाव्या संघटना आहेत, तेथील विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. आंदोलनाचे लोण ‘जेनयु’मध्येसुद्धा पोहोचले. विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी दीपिका पादुकोन तेथे पोहोचली. जुन्या दिल्लीत महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, राम प्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद यांचे पोस्टर्स घेऊन आंदोलन करण्यात आले. मुंबई, औरंगाबाद, बंगळुरू, जयपूर, चेन्नई या ठिकाणीदेखील आंदोलने झाली.

यामध्ये दिलेल्या घोषणादेखील वाचण्यासारख्या आहेत, ‘जब हिंदू-मुस्लीम राजी, तो क्या करेगा नाझी!’ मुस्लीम कवी फैज अहमद फैज याच्या कविता मुस्लीम विद्यार्थी गातात. आम्ही येथे आहोत, अशी वाक्ये रस्त्यावर लिहिली जातात. ‘हिंदू, मुस्लीम, शीख आपस में हैं, भाई-भाई’ ही पुढची घोषणा आहे. ‘फॅसिझमपासून आझादी’, ‘हम कागज नहीं दिखायेंगे, हम संविधान बचायेंगे’ दिल्लीच्या शाहीनबागेत आणि पुण्याला धरणे आंदोलन चालू आहे. बहुतेक ठिकाणी मुसलमानांना रस्त्यावर उतरविण्याचे काम चालू आहे.महाराष्ट्राचा विचार केला तर ठिकठिकाणी जी आंदोलने चालू आहेत, धरणे चालू आहेत आणि मध्ये ‘बंद’चा एक कार्यक्रम झाला, त्याला राजकीय उत्तर कुणी दिले का? राजकीय उत्तर दिले नाही तर जे आंदोलन करतात, त्यांचा पक्ष खरा आहे, असा लोकांचा समज होईल. हा समज करण्यासाठी बहुतेक सर्व मीडिया न चुकता खतपाणी घालण्याचे काम करीत असतो. लोकशाहीत धरणे धरणे, आपला निषेध व्यक्त करणे, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे, हा लोकांचा राजकीय हक्क आहे. तो कोणत्याही सरकारला रोखता येणार नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्यांवर पोलिसांना घालणे लोकशाही मूल्यात बसत नाही.


हे सर्व जरी असले तरी ज्या कारणांसाठी हे आंदोलन चालू आहे, धरणे चालू आहे, ती कारणे योग्य आहेत का? याचा विचार केला पाहिजे. विदेशातून धार्मिक छळाला कंटाळून जे हिंदू, शीख, बौद्ध, जैन भारतात येतात, त्यांना भारताने नागरिकत्व द्यायचे नाही, तर कुणी द्यायचे? या धर्मीयांना भारत सोडून जगात कुठला देश आहे का? १९४७ साली मुसलमानांनी आंदोलन करुन पाकिस्तान मिळविले. तेथे त्यांनी आपल्या धर्माप्रमाणे राज्य चालविण्यास सुरुवात केली. इस्लामी देशात मुसलमानांचा छळ होत असेल, तर तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. अशांना आपल्या देशात आश्रय देण्याचे कारण काय? त्यांना आश्रय देण्यात यावा म्हणून जे आंदोलन चालू आहे, ते धार्मिक आधारावर चालू आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देणे, घातक आहे. हा असा पाठिंबा खिलाफती चळवळींना पाठिंबा देण्यासारखे आहे. खलिफा आपल्या देशाचा नव्हता. त्याला १९२४ साली पाठिंबा देऊन काँग्रेसने देशाच्या फाळणीची बीजे रोवली. बाहेरच्या देशातील मुसलमानांना पाठिंबा देण्यास भारतीय मुसलमानांना शिकविणे हे फार घातक आहे. असा पाठिंबा देऊन आपण देशाला १९४६-४७च्या कालखंडात घेऊन जात आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे.


ज्याप्रमाणे शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा इतरांना अधिकार आहे, त्याप्रमाणे ज्यांच्या हितासाठी हा कायदा झालेला आहे, त्यांनाही शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी लक्षात येते की, ज्यांच्या हितासाठी हे सर्व चालले आहे, ते हिंदू, जैन, बौद्ध, शीख झोपून राहिले आहेत. शिरोमणी अकाली दलाने सर्वपक्षीय बैठकीमध्ये मुसलमानांचादेखील कायद्यात समावेश करावा, अशी मागणी केली. स्वतःच्या हाताने आपल्या पायावर कुर्हाड चालविण्याचा हा प्रकार आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्रातील भाजपचे सरकार गेले आणि आज भाजपचे सर्व नेते सरकार गेले, म्हणून रडत बसले आहेत. ते खूप आशावादी आहेत की, आज ना उद्या शिवसेना आपल्या बरोबर येईल आणि आपण सरकार बनवू. रोज कोण ना कोण नेता असे वक्तव्ये देत असतो. ती वाचून विचाराला बांधील असलेला माझ्यासारखा कार्यकर्ता भयंकर अस्वस्थ होतो. ज्या शिवसेनेच्या पाठिंब्याकडे आशाळभूतपणे भाजपचे नेते डोळे लावून बसले आहेत, त्यांचे प्रवक्ते संजय राऊत ते इतक्या घाणेरड्या आणि हलक्या भाषेत भाजपला सुनावत असतात, ते वाचणेदेखील कठीण असते. कोणताही स्वाभिमानी माणूस ही गोष्ट अजिबात सहन करणार नाही. सत्तेची आशाळभूत लाचारी उद्विग्न करणारी आहे.


देशात काय चालले आहे, महाराष्ट्रात काय चालले आहे, जे आंदोलन चालू आहे, त्याचे परिणाम काय काय होतील, केंद्र सरकारला घेरण्याचा राजकीय कुटील डाव काँग्रेस आणि त्यांचे डावे साथीदार मुसलमान समाजाला बरोबर घेऊन कसा खेळत आहेत, हे महाराष्ट्रातील नेते लक्षात घेतात की नाही? ते आपले एकच तुणतुणे वाजवत बसलेले आहेत, उद्धव ठाकरेंचे शासन टिकणार नाही आणि आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ. आज खरी आवश्यकता आहे ती, रस्त्यावर उतरण्याची. ‘नागरिकत्व कायद्या’च्या समर्थनार्थ सगळा महाराष्ट्र ढवळून काढण्याची. मोठमोठ्या शहरात लाखा-दीड लाखांचे मोर्चे काढण्याची. राष्ट्रभक्त नागरिकांच्या अफाट शक्तीचे प्रदर्शन करण्याची. काट्याने काटा काढायचा असतो, अशी म्हण आहे. आंदोलनाला प्रतिआंदोलनाने उत्तर द्यायचे असते. शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय प्रश्न मार्गी लागत नाहीत आणि असा जर विचार केला तर केंद्र सरकारने केलेल्या कायद्याच्या समर्थनार्थ समाजातील ८० टक्क्यांहून अधिक लोक आहेत. हे ८० टक्के लोक आज आमचे नेतृत्त्व कोण करणार, आमच्या आवाजाचा प्रतिध्वनी कोण काढणार, आमचे समर्थनाचे प्रदर्शन कोण करणार, याची वाट बघत आहेत. ज्यांनी हे करायला पाहिजे आणि या कामासाठी ज्यांचा जन्म झाला आहे, ते मात्र, ‘आमचे सरकार गेले, आम्ही पुन्हा सत्तेवर येणार, आम्ही पुन्हा सत्तेवर येणार’ असे तुणतुणे वाजवत बसले आहेत.


शेवटी विचार करावा लागतो की, सत्ता कशासाठी हवी? चार मंत्र्यांना लाल दिव्याची गाडी मिळावी यासाठी की सरकारी बंगले राहण्यास मिळावे यासाठी, आशाळभूतांचे दरबार भरविण्यासाठी की, आपले राजकीय नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी? विचारधारेला समर्पित असलेला माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता या सर्व गोष्टींना कस्पटासमान मानतो. सत्ता याच्यासाठी हवी, ज्यामुळे आपली अस्मिता टिकून राहील, आपली संस्कृती टिकून राहील, आपली जीवनमूल्ये टिकून राहतील, आपला वारसा टिकून राहील, सत्तेचा वापर त्यासाठी करायचा. आज जे ‘नागरिकत्व कायद्या’वरून धुमाकूळ घालीत आहेत, ती सर्व मंडळी वरील सर्व विषय धोक्यात आणणारी आहेत. त्यापैकी कोणी आपले शत्रू नाही. पण चुकीच्या मार्गाने जाणारे आपले बांधव आहेत. त्यांना समोपचाराची भाषा लगेच समजणार नाही. त्यांना सामर्थ्याची भाषा समजते. लोकशाहीत हे सामर्थ्य बंदुकांमध्ये नसते, तलवारीत नसते, ते शांततामय मार्गाने आपला आशय प्रकट करण्यात असते, गांधीजींनी ज्या सत्याग्रहाचे शस्त्र दिले, ते असेच अहिंसक आहे. याच मार्गाने आपल्याला जावे लागेल आणि प्रचंड शक्तिप्रदर्शन करावे लागेल.


राष्ट्रवादी जनतेची शक्ती अफाट आहे. जी शक्ती सर्व विरोधाला ठोकरून बाबरी ढाँचा उद्ध्वस्त करू शकते, ती शक्ती काहीही करू शकते. तिला योग्य राजकीय नेतृत्वाची गरज आहे. आमच्या सर्व नेत्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की, काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. असे नेतृत्व करण्यास जर आजचे आमचे नेते कमी पडले तर ती ती पोकळी तशी राहणार नाही. हिंदू समाजात नवनेतृत्व निर्माण करण्याचे सामर्थ्यदेखील अफाट आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.