‘प्रतापी’ युवा संशोधक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

NM pratap _1  Hई-कचऱ्यातून  तब्बल ६०० ड्रोन बनवत जगभरात ‘भारताचा युवा वैज्ञानिक’अशी ख्याती कमवणार्याय केरळमधील २३ वर्षीय एन. एम. प्रताप याच्याविषयी...आजच्या तंत्रज्ञान युगात अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. नैसर्गिक आपत्तीच्या काळात असो, सीमा सुरक्षा असो किंवा शेतकऱ्यांच्या शेती संलग्न मदतीसाठी आज निरनिराळ्या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. त्यापैकीच एक ‘ड्रोन टेक्नॉलॉजी’ ही अशी एक नावीन्यपूर्ण गोष्ट आहे जी अलीकडच्या काही वर्षांमध्ये एक अत्यंत मूल्यवान आणि अत्यावश्यक तंत्रज्ञान म्हणून उदयास आली आहे. नुकत्याच उत्तर कर्नाटकात झालेल्या पुरात हजारो लोक अडकले असताना, २३ वर्षीय एन. एम. प्रताप या तरुणाने पूरबाधित क्षेत्रात अन्न आणि इतर मदतसामग्री पोहोचविण्यासाठी आपल्या स्वदेशी ड्रोनचा वापर केला. कर्नाटकमधील एन. एम. प्रतापचे शिक्षण म्हैसूरच्या ‘जे. एस. एस. कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स’मध्ये झाले. बी.एस्सी झालेल्या प्रतापची ओळख ‘ड्रोन सायंटिस्ट’ म्हणून आहे. प्रतापला वयाच्या १४ व्या वर्षी पहिल्यांदाच ड्रोनची ओळख झाली. त्याने ड्रोन चालवण्यापासून ते उघडून दुरुस्त करण्यास सुरुवात केली. अवघ्या दोन वर्षांमध्ये म्हणजे वयाच्या १६ वर्षी प्रतापने असे ड्रोन विकसित केले जे हवेत उडवता येईल आणि त्यातून फोटोही काढता येतील. विशेष म्हणजे, हे ड्रोन त्याने ई-कचऱ्यापासून बनवले होते.वयाच्या १६ व्या वर्षी आकाशातील गरुडझेपेने प्रेरित झालेल्या या मुलाचे प्रेरणास्थान भारताचे अव्वल वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आहेत. प्रतापसारख्या तरुण मुलाने प्राप्त केलेले हे यश कमी नव्हते. पुढील काही वर्षे सतत प्रयत्न आणि अभ्यास करत या ध्येयवेड्या तरुणाने स्वतःहून तब्बल ६०० ड्रोन्स तयार केले. त्याने आतापर्यंत सहा मोठे प्रकल्प पूर्ण केले आहेत, ज्यात सीमा सुरक्षेसाठी टेलिग्राफी, वाहतूक नियंत्रणासाठी ड्रोन, मानवी आपत्ती बचावसाठी युएव्ही आणि ड्रोन नेटवर्किंगमधील ‘ऑटो पायलट ड्रोन’ आणि मानवविरहीत ड्रोन, तसेच ‘क्रिप्टोग्राफी’चा समावेश आहे. प्रताप याने विकसित केलेले ड्रोन आफ्रिकेतील आदिवासी पाड्यांवर अल्पावधीत वैद्यकीय सेवा पुरवत त्या लोकांचे जीव वाचवत आहेत, ही भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे.


प्रतापने हॅकिंगच्या बचावासाठी ‘क्रिप्टोग्राफी’चेही काम केले आहे. प्रतापला आतापर्यंत ८७ देशांमधून निमंत्रण आले आहे. २०१७ मध्ये जपान येथे पार पडलेल्या ‘इंटरनॅशनल रोबोटिक्स प्रदर्शना’त त्याला सुवर्ण आणि रौप्यपदक देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर दहा हजार डॉलर्स इतकी रक्कमही देण्यात आली. जर्मनीच्या हॅनोवर येथे झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय ड्रोन एक्स्पो २०१८’मध्ये प्रतापला ‘अल्बर्ट आईन्स्टाईन इनोव्हेशन गोल्डमेडल’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्याला जर्मनीमधीलच आणखी एका आंतरराष्ट्रीय ड्रोन एक्स्पोचे सुवर्णपदक मिळालेले आहे. नुकतेच त्याला ‘आपत्कालीन परिस्थितीत ड्रोन अनुप्रयोग’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आयआयटी मुंबईने आमंत्रित केले होते. त्याचप्रमाणे आयआयसी येथेही त्याने व्याख्यान दिलेले आहे.manasa_1  H x W


आपल्या कामगिरीविषयी सांगताना प्रताप म्हणतो की, “मी हे ड्रोन तयार करण्यासाठी खूप कमी पैसे खर्च करतो आणि ई-कचरा वापरतो. मी जेव्हा जेव्हा स्पर्धा जिंकतो तेव्हा मला पैशाच्या स्वरुपात पुरस्कार दिले जातात जे मी भविष्यासाठी वाचवितो आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर ई-कचरा तयार होतो आहे. हा ई-कचरा मला म्हैसूर, विशाखापट्टणम, मुंबई आणि इतर काही शहरांमधील इलेक्ट्रॉनिक दुकानांतून मिळतो. उदाहरणार्थ, जर एखादा मिक्सर-ग्राईंडर खराब टाकावू असेल, तर मी मोटर काढू शकतो आणि ती माझ्या ड्रोनमध्ये वापरू शकतो. त्याचप्रमाणे मी माझे ड्रोन तयार करण्यासाठी तुटलेल्या टीव्हीवरील चीप आणि रेझिस्टर्सचा वापर करतो. आपण तयार केलेला नमुना कसा दिसतो याने काही फरक पडत नाही. ड्रोनचे तांत्रिक मुद्दे सिद्ध करणे महत्त्वाचे आहे.


२०१७मध्ये प्रथम प्रतापला त्याच्या कार्यासाठी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. मी ‘स्किल इंडिया’ प्रदर्शनामध्ये पहिल्यांदा माझ्या एका ड्रोनचे प्रात्यक्षिक दिले. या ठिकाणी मी ‘ड्रोन्स इन क्रिप्टोग्राफी’ नावाचा स्वयंनिर्मित प्रकल्पाचे प्रात्यक्षिक केले. हे तंत्रज्ञान जर्मनीत पहिल्यांदा वापरात आले. विशेषत: हुकूमशहा अडॉल्फ हिटलरच्या काळात ‘क्रिप्टोग्राफी’चा वापर केला. सामान्यत: रडार सिग्नल ड्रोन शोधू शकतात. परंतु, आपण ‘क्रिप्टोग्राफी’द्वारे संदेश किंवा संकेत पाठविल्यास, आपण त्यांना शोधू शकत नाही किंवा इनक्रिप्टेड संदेश डीकोड करू शकत नाही.


हे सर्व पुरस्कार व ओळख मिळवण्यापूर्वी प्रतापला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. प्रताप हा एका गरीब कुटुंबातला आहे. शेतकर्यावचा मुलगा असल्याने त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. तो स्वत:साठी चांगले कपडे विकत घेऊ शकत नव्हता. त्यावेळचा एक प्रसंग सांगताना तो म्हणतो, “जेव्हा मी पहिल्यांदा फ्रान्सला गेलो तेव्हा लोकांना धक्का बसला. मी बिझनेस क्लासमधून प्रवास करताना लोकांनी माझ्याकडे कुत्सित नजरेने पहिले. तथापि, मला काही फरक पडला नाही. फ्रान्समधील एका कंपनीने मला त्यांच्या संशोधन प्रकल्पात काम करण्याची संधी दिली. मी तेथे काही पैसे कमावले आणि माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास हातभार लावला. त्यानंतर मी जे ड्रोन तयार केले ते फ्रान्समध्ये मिळवलेल्या पैशांतून केले.”manasa_1  H x W


सध्या, प्रताप स्वतःचे स्टार्ट-अप सुरू करण्यासाठी काम करत आहे, ज्यामध्ये तरुणांना ड्रोन किंवा इतर कोणतेही डिव्हाईस तयार करण्यास भाग पाडण्यात येईल. त्याच्या मते, “बरेच तरुण आहेत, ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे. परंतु, त्यांच्याकडे पदवी नाही. मी अशा प्रकारच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करेन. आपत्ती व युद्धप्रसंगी संरक्षणात उपयोगी देशाला मदत करू शकतील, अशी अनेक नावीन्यपूर्ण उपकरणे विकसित करेन. या तंत्रज्ञानाचा वापर केवळ आपल्या राष्ट्रहितासाठी करणे आहे. ड्रोन तंत्रज्ञानातील जगत्जेत्या तरुण भारतीय वैज्ञानिकाला ज्याने आपल्या प्रयोगांनी देशाचे नाव जगाच्या नकाशावर झळकावले अशा प्रतापला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीस शुभेच्छा...!
@@AUTHORINFO_V1@@