शरद पवार साहेब या १२ प्रश्नांची उत्तरे द्या !

    दिनांक  18-Feb-2020 21:35:06

sharad pawar_1
 
 
एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रश्नी तपासावर भूमिका घेणाऱ्या शरद पवार यांना थेट प्रश्न
 
१) ज्या सुधीर ढवळे यांनी सत्य बोललं म्हणून भाजप सरकारने त्यांना अटक केली असं पवार साहेब म्हणतात त्या सुधीर ढवळे यांनी "भांडवल शाहीचा सरंजामी देव 'बाळ ठाकरे' या पुस्तकात बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांना लाखो दलितांचे खुनी व दलितांच्या माय बहिणीवर बलात्कार करणारे म्हटलं आहे ते देखील सत्य आहे काय ?
 
२) भीमा कोरेगाव येथील दंगलीत छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले शर्ट घातले म्हणून राहुल फटांगळे या तरुणाचा खून झाला असे त्याच्या आईने पोलीस फिर्यादीत म्हटले आहे त्या दुर्दैवी तरुणाचे खुनी नेमके कोण हे त्या आईला मराठा नेता म्हणवणारे पवार साहेब सांगतील काय ?
 
 
३) छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या पवार साहेबांना 'शिवाजीचे उदात्तीकरण' नामक अत्यंत अश्लाघ्य पुस्तक मोफत वाटणारी एल्गार परिषद आक्षेपार्ह वाटत नाही काय ?
 
४) माजी गृहमंत्री स्वर्गीय आबा पाटलांच्या किंवा मनमोहन सिंग प्रणित आघाडी सरकारच्या काळात एल्गार परिषदेत आरोपी असलेल्या लोकांनाच तुरुंगवास घडला, शिक्षा झाल्या त्या सगळ्या शिक्षा अथवा तुरुंगावास तत्कालीन सरकारचे म्हणजेच पवार साहेबांचे षडयंत्र होते काय ?
 
५) पवार साहेबांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे या विषयावरील मत वाचून दाखवले परंतु इतर दोन सर्वोच्च न्यायाधीश असोत किंवा सत्र न्यायालय, उच्च न्यायालाय यांनी वेळोवेळी या आरोपींना जामीन नाकारताना या केस मध्ये प्रथम दर्शनी ठोस पुरावे समोर आल्याचे मत मांडले आहे हे मोठ्या चतुराईने का लपवले ?
 
६) संबंधित प्रकरणात राष्ट्रवादी पक्षाकडून भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत परंतु भिडे गुरुजी यांची पाठराखण सध्याचे ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी का केली होती ?
 
७)तसेच मिलिंद एकबोटे हे न्यायालयात रीतसर अर्ज करून जामिनावर बाहेर आले असताना जामीनाचा निर्णय देणाऱ्या न्यायालयापेक्षा पवार साहेबांना कायद्याचे अधिक अधिकार आहेत काय ?
 
८) कुठल्या तरी व्हिडीओ वर बनावट नावाने कमेंट करणाऱ्या सामाजकंटकाचा आधार घेऊन एका वृद्ध पत्रकाराला हातपाय तोडण्याची धमकी देणारे राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी सत्य बोलतात परंतु पंतप्रधानांना जीवाचा धोका आहे हे न्यायालयात पुराव्यानिशी मांडणाऱ्या विविध तपास संस्था मात्र असत्य बोलतात हे पवार साहेबांच्या बुद्धीला तरी पटते काय ?
 
९) सदर दंगली मध्ये भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते परंतु यांच्या बरोबरीने मुख्य आरोपी असलेले आरोपी क्रमांक ३ व आरोपी क्रमांक ४ हे कुठल्या पक्षाचे आघाडीचे कार्यकर्ते आहेत हे पवार साहेब सांगतील काय ? (अर्थात ते दोन आरोपी देखील विशिष्ट समूहाकडून आलेल्या दबावापोटीच गोवले गेले आहेत याची नोंद घ्यावी )
 
१० ) पवार साहेबांच्या म्हणण्यानुसार एल्गार परिषदेत १०० संघटना सहभागी झाल्या होत्या व तेथे राजकीय शपथा घेतल्या गेल्या हे सगळे खरेच आहे पण मग इतर माननीय उपस्थित व राजकीय संघटनांना सोडून हे बिगर राजकीय परंतु अत्यंत संशयास्पद व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकच प्रत्येक सरकारच्या वेळी का पकडले जातात याचे उत्तर पवार साहेब देतील काय ?
 
११) तोंडाने सतत शाहू फुले आंबेडकर जप करणाऱ्या पवार साहेबांनी एल्गार प्रकरणातील एक आरोपी असलेला आनंद तेलतुंबडे याने 'बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगावची लढाई हे एक मिथक तयार केले आहे' असे लिहिले आहे म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर खोटे बोलतात असे पवार साहेबांना म्हणायचे आहे काय ?
 
१२) बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे स्वतः 'कोरेगाव भीमाच्या जयस्तंभाला फुटीरतावाद्यांचा गराडा पडला आहे' असे लिहीतात ते देखील खोटारडे आहेत असे पवार साहेबांना म्हणायचे आहे काय ?