निर्भयाच्या दोषींना ३ मार्च रोजी फाशी ; नवा डेथ वॉरंट जारी

17 Feb 2020 18:09:02

nirbhaya case_1 &nbs
 
 
नवी दिल्ली : निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणाती दोषींना आता ३ मार्च रोजी फासावर चढविण्यात येणार आहे. पटियाला हाऊस न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने नवा डेथ वॉरंट जारी केला आहे. त्यानुसार सकाळी सहा वाजता दोषींना फासावर चढविण्यात येणार आहे. दरम्यान, नवा डेथ वॉरंट जारी झाल्याचे समाधान आहे. मात्र, आता जारी करण्यात आलेल्या डेथ वॉरंटनुसार ३ मार्च रोजी दोषी फासावर लटकायला हवे, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या मातेने व्यक्त केली.
 
निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी सोमवारी पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणी झाली. सुमारे तासभर चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने चारही दोषींना फासावर चढविण्यासाठी नवा डेथ वॉरंट जारी केला आहे. नव्या डेथ वॉरंटनुसार ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता दोषींना फासावर चढविण्यात येणार आहे. सुनावणी दरम्यान तिन्ही दोषींच्या दया याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. तर एका दोषीची दया याचिका आणि क्युरेटिव्ह पिटीशन दाखल होणे बाकी आहे. सर्वोच्च न्यायालयातर्फे देण्यात आलेली एका आठवड्याची मुदतदेथील ११ फेब्रुलवारी रोजी संपुष्टात आली आहे.
 
सध्या कोणत्याही दोषीची कोणत्याही प्रकारची याचिका न्यायालयात प्रलंबित नाही, त्यामुळे नवा डेथ वॉरंट जारी केला जाऊ शकतो. असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दरम्यान, दोषींची बाजू मांडणारे वकील ए पी सिंग यांनी दोषी अक्षयसाठी नव्याने दया याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. अक्षयच्या माता - पित्यांमार्फत केलेली दया याचिका ही अर्धवट होती, त्यामुळे न्यायालयाने परवानगी दिल्यास आम्ही पुन्हा दया याचिका दाखल करू. त्याचप्रमाणे अन्य एक दोषी पवनकडे दया याचिका आणि क्युरेटिव्ह पिटीशन करण्याचा मार्ग शिल्लक असल्याचेही त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0