इंदुरीकर महाराजांचे किर्तन म्हणजे सामाजिक प्रबोधनच : चंद्रकांतदादा

17 Feb 2020 12:57:24
Chandrakant-Patil-Indurik

मुंबई : सुप्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्यावर वादंग उठला असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. इंदुरीकर यांनी केलेले 'ते' वक्तव्य करायला नकोच होते. मात्र, एका वाक्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणे हे कितपत योग्य आहे. खासकरून प्रसिद्धी माध्यमांनी याची काळजी घ्यायला हवी, असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.
 
 
इंदुरीकर महाराजांना होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्यात त्यांनी या प्रकरणावरून त्यांना लक्ष्य करणे हे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. चंद्रकांतदादा म्हणाले, "मार्मिक टीपण्णीतून समाजप्रबोधन हे इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या किर्तनामुळे कित्येकजणांचे समाजप्रबोधन झाले आहे. तसेच मीही त्यांच्या किर्तनाला बऱ्याचदा गेलो आहे. समोरच्याला खिळवून ठेवण्याचे कसब इंदुरीकर महाराजांमध्ये आहे. आजघडीला सोशल मीडियाच्या माध्यमांतून अनेकजण त्यांच्या किर्तनाचा लाभ घेतात. अशा व्यक्तीला एका वक्तव्यामुळे धारेवर धरणे हे चुकीचे आहे." भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेनिमित्त ते बोलत होते.
 

निवडणूका घेऊन दाखवा : ठाकरे सरकारला आव्हान

 
जनादेश धुडकावून सत्ता स्थापन करणारे आता सरकार पाडून दाखवा, असे आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा निवडणूका घेऊन दाखवा, असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी सरकारला केले आहे. "सरकार पाडण्यात आम्हाला कोणताही रस नाही, आम्ही प्रखर विरोधी पक्ष म्हणूनच यापुढे काम करणार आहोत. जर महाविकास आघाडीतील धुसफूस याला कारणीभूत ठरली तर निवडणूका घेऊन दाखवा", असे आवाहन ठाकरे सरकारला चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे.
 

आमच्या सगळ्या योजना बंद करून टाका

 
केंद्र सरकारच्या महत्वकांशी प्रकल्पांसोबत ठाकरे सरकार फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील प्रकल्पांना बगल देत आहे, त्यांनी ते खुशाल करावेत. मात्र, आम्ही केलेल्या योजनांना पर्यायी योजना उभ्या करून पुढील कार्यवाही करावी, राजकीय विरोधापोटी जनतेला वेठीस धरू नका, असा टोला त्यांनी सरकारला लगावला. विरोधीपक्ष म्हणून सरकारला धारेवर धरण्याची सर्व रणनिती तयार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Powered By Sangraha 9.0