महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपचे धरणे आंदोलन

17 Feb 2020 16:31:30
chandrakant patil_1 




महाविकास आघाडीने समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली : चंद्रकांत पाटील

मुंबई: महाआघाडी सरकारच्या कारभाराविरोधात जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सांगितले.


भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. याच्या विरोधात धरणे आंदोलनाद्वारे राज्यभरात जनजागृती केली जाणार आहे. महाआघाडी सरकार विसंवादाने कोसळेल, हे सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार नाही. हे सरकार कोसळले तर भाजप सरकार स्थापण्याचा प्रयत्न करणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.


चंद्रकांत पाटील यांनी या वेळी राज्य परिषदेच्या अधिवेशनातील कामकाजाची माहिती दिली. या परिषदेत राज्य सरकारच्या विरोधात २२ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र २२ फेब्रुवारी रोजी चौथा शनिवार असल्याने आंदोलन कार्यक्रम २५ रोजी करण्याचे ठरविण्यात आल्याचे चंद्रकांत यांनी नमूद केले.


प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, सह मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते गणेश हाके, विश्वास पाठक आदी या प्रसंगी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0