तापमानवाढीचा इंडिकेटर अंटार्क्टिका

16 Feb 2020 21:03:50


antartica_1  H


जागतिक तापमानवाढीचा फटका आता अंटार्क्टिका खंडाला बसण्यास सुरुवात झाली आहे, हेच या तापमान वृद्धीवरून दिसून येते. जागतिक तापमानवाढ ही एक वैश्विक समस्या असून त्यावर तोडगा हा जगातील सर्वच राष्ट्रांनी मिळून काढणे अभिप्रेत आहे.


जागतिक तापमानवाढीचा फटका अंटार्क्टिका खंडालादेखील बसला असून तेथील तापमानात वाढ होत असल्याचे वृत्त येत आहे
. अंटार्क्टिकावर पहिल्यांदाच २० अंशांहून अधिक तापमानाची नोंद घेण्यात आली. वसुंधरेच्या अस्तित्वासाठी ही मोठी चिंताजनक बाब निश्चितच आहे. जागतिक तापमानवाढीच्या कक्षेत अंटार्क्टिका येऊ नये, तसेच अंटार्क्टिकावरील तापमानात वाढ झाल्यास जगात कोणत्या प्रकारची परिस्थिती उद्भवेल, मानवाला कोणत्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? अशा व यासारख्या अनेक बाबतींत विविध व्यासपीठांवर कायमच चर्चा झडल्या आहेत. तरीही आज ही परिस्थिती आपल्यासमोर आली आहे. जागतिक तापमानवाढीचा फटका आता अंटार्क्टिका खंडाला बसण्यास सुरुवात झाली आहे, हेच या तापमान वृद्धीवरून दिसून येते. जागतिक तापमानवाढ ही एक वैश्विक समस्या असून त्यावर तोडगा हा जगातील सर्वच राष्ट्रांनी मिळून काढणे अभिप्रेत आहे. त्यासाठी पॅरिस करार साकारण्यात आले आहे. मात्र, आपले सर्वांचे दुर्दैव असे की, या करारावर अद्याप जगातील सहभागी राष्ट्रांचे एकमत होऊ शकलेले नाही.



परिणामस्वरूप अंटार्क्टिकाच्या आता समोर आलेल्या भीषण वास्तवाचा सामना आपणा सर्वांना करावा लागत आहे
. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे आता कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रत्येक देशाने आपापले उद्दिष्ट ठरवून घेण्यास सुरुवात केली आहे. अंटाक्टिकावरील सेमूर द्विपावर उभारण्यात आलेल्या संशोधन स्थानकावर दि. ९ फेब्रुवारी रोजी २०.७५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. यापूर्वी अंटार्क्टिका च्या साईन बेटावर १९८२ मध्ये आजवरच्या सर्वाधिक तापमानाची म्हणजे १९.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. तत्कालीन सामाजिक आणि औद्योगिक स्थिती लक्षात घेता १९.८ चे आव्हान जरी आव्हान असले तरी, त्यावर मात करण्याचा मार्ग सापडणे शक्य होते किंवा आटोक्यात तरी होते. मात्र, २०२० मध्ये नोंदविले गेलेले २०.७५ अंश सेल्सिअस तापमान हे सध्याचा सर्वच बाबतीत असणारा प्रगतीचा वेग पाहता, उपभोगवादाकडे मानवाचे सरकणारा धावता आलेख पाहाता हे एक भीष्म आव्हान म्हणून समोर उभे ठाकले आहे. म्हणून अंटार्क्टिकाचे वृद्धिंगत होणारे तापमान आता खर्‍या अर्थाने चिंतेची बाब बनली आहे. ब्राझीलचे संशोधक कार्लोस शिफर यांनी विविध वृत्तसंस्थांशी बोलताना सांगितले की, “वसुंधरा ही तापत आहे याचा इशारा म्हणून अंटार्क्टिकावरील तापमानवाढ लक्षात घेणे आपल्याला आवश्यक आहे.”



ब्रिटनमधील
’द गार्डियन’ मध्ये आलेल्या बातमीनुसार अंटार्क्टिकामधील एस्परांज बेटावर अर्जेंटिनाच्या संशोधन केंद्रावर यावर्षी ६ फेब्रुवारी रोजी १८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर दि. ९ फेब्रुवारीला २० अंशांच्या घरात हा पारा गेला आहे. दि. ६ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी म्हणजे अवघ्या तीन दिवसांत १८ ते २० अशी मजल तापमानवाढीने मारली आहे. परिस्थिती नेमकी कशी आहे, हे सांगण्यासाठी या संख्याच बोलक्या आहेत, असे वाटते. दरम्यान, या तापमानवाढीची ’वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन’ द्वारा अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र, एकंदरीत परिस्थिती पाहता मुद्दा दुर्लक्षित करूनदेखील चालणार नाही, हेही तितकेच खरे आहे. तसेच अंटार्क्टिकाचे महत्त्व लक्षात घेता अंटार्क्टिकावरील अत्यंत दूरच्या विविध भागात असणार्या संशोधन केंद्रांच्या माधमातून प्रती तीन दिवसांनी तेथील तापमानाचे मोजमाप घेण्यात येत असते. अंटार्क्टिकावर तापमान वाढल्यास तेथील बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. याबाबत संयुक्त राष्ट्र संघटनेने आपल्या अहवालात यापूर्वीच चिंता व्यक्त केली आहे. हरितवायूचे होणारे उत्सर्जन रोखणे, कमी करणे आणि कार्बनचे उत्सर्जन रोखणे हाच जागतिक तापमानवाढ रोखण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी विकसित देशांनी निश्चित धोरण आखत त्याप्रमाणे वागणे हेच जगाला अभिप्रेत आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी एका विशिष्ट महत्त्वाकांक्षेपोटी विकासाच्या भस्मासुरास जन्म देणे किंवा त्याचे पालनपोषण करणे, हे केव्हाही संयुक्तिक नाहीच. जगच टिकले नाही तर केलेला विकास काय कामाचा, याचा विचार या राष्ट्रांनी करण्याचे इंडिकेटर म्हणून अंटार्क्टिकाच्या वाढलेल्या तापमानाकडे पाहण्याची हीच ती वेळ आहे.

Powered By Sangraha 9.0