‘लोकनाट्याच्या राजा’ची एक्झिट

15 Feb 2020 15:05:12
raja mayekar_1  



ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे निधन



मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९०व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांत त्यांनी काम केले. दशावतारी नाटकापासून राजा मयेकर यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. 'लोकनाटय़ा'द्वारे व्यावसायिक रंगभूमी त्यांनी जवळून पाहिली. संगीत नाटके आणि बालगंधर्वाच्या नाटकांचे प्रयोगही त्यांनी केले. विनोदाची पातळी कधीही घसरू न देता त्यांनी केलेल्या अभिनयाची आठवण आजही काढली जाते.

‘लोकनाटयाचा राजा’असा किताब मिळवणाऱ्या राजा मयेकर यांनी तब्बल ६० वर्षे अभिनयक्षेत्र गाजवले. वयाच्या १५ व्या वर्षापासून त्यांनी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती. दूरदर्शनवरील 'गप्पागोष्टी' ही त्यांची मालिका गाजली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
Powered By Sangraha 9.0