वा पैलवान : कथा लाल मातीतल्या कुस्तीची!

    दिनांक  14-Feb-2020 15:57:59   
vaa pailwan_1  


मुंबई :
अलीकडच्या काळात कुस्ती किंवा ग्रामीण, अस्सल तांबड्या मातीतल्या खेळांवर बरेच मराठी चित्रपट येऊन गेले. त्यातलाच एक कुस्तीचे महत्त्व आणि कुस्तीची शान सांगणारा चित्रपट म्हणजे वा पैलवान! या कुस्तीसाठी आणि गावाचा मान परत मिळावा म्हणून लढणारा चित्रपटाचा नायक ‘किसना’. त्याचे सवंगडी, गावकरी मिळून कसा या कुस्तीचा सामना लढतात आणि गावचा मान परत मिळवतात त्याची ही कथा!


अस्सल मराठी मातीतला हा चित्रपट, ‘मस्ती नाही कुस्ती… नावासाठी नाहीतर गावासाठी…’ अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण दुर्गम अशा आदिवासी आणि ग्रामीण भागात झालेले आहे. चित्रपटात ‘किसना’ म्हणजेच नायक साकारलाय अभिनेता अभिजित श्वेतचंद्र याने, तर नायकाच्या कुस्तीसाठी शक्य ते सगळे प्रयत्न पणाला लावणारी त्याची नायिका ‘राधा’ अभिनेत्री पल्लवी कदम हिने साकारली आहे. या दोघांसह सुरेश विश्वकर्मा, रामचंद्र धुमाळ, मिलिंद जाधव, राधिका मुठे, माऊली पुराणे, रमेश कदम, विशाल कुलथे, महेंद्र बुऱ्हाडे, उदय खळे, विजयकुमार गायकवाड, पूनम कुडाळकर आदी कलावंतांनी यात भूमिका साकारल्या आहेत.


एकीकडे गावासाठी मानाची कुस्ती कोण लढणार यावरून गावांत राजकारण सुरु असते, तर दुसरीकडे नायकाच्या लग्नाची तयारी. गावचा पाटील सगळ्या पैलवानांकडून कुस्ती जिंकवून देण्याची शपथ घेतो. नायकाचा मित्रच त्याचा प्रतीस्पर्धी असल्याने, नायकाने कुस्ती लढू नये म्हणून तो प्रयत्न करत असतो. नायकाच्या लग्नाची गोष्ट पाटलाला कळते, आणि काही अटींवर पाटील त्याला लग्नाची परवानगी देतो... नायकाच्या लग्नानंतर कथेची खरी सुरुवात होते... या चित्रपटाची कथा अनेक ठिकाणी अनपेक्षित वळणं घेते, त्यामुळे पुढे काय होणार याकडे प्रेक्षकाचे लक्ष लागते. ‘शेवट गोड’ याच धोरणाचा वापर या चित्रपटातही दिसतो. वास्तवाचे चित्रण आणि आदिवासी समाजाचे हुबेहूब चित्रीकरण हे या चित्रपटाच्या जमेची बाजू ठरतं.


पैलवान या चित्रपटाची कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन व निर्मिती देखील कुंडलिक केदारी यांची आहे. या चित्रपटातील गीते घनश्याम धेंडे आणि मदन धायरे यांनी लिहिली आहेत. तर अशोक काळे यांनी संगीत दिले आहे. संगीता कुलकर्णी, दयानंद कोटकर, प्रियांका बर्वे व संदीप उबाळे यांनी पार्श्वगायन केले आहे. पार्श्वसंगीत सत्यजित केळकर यांचे आहे. नृत्ये योगेश देशमुख यांचे तर, निखिल मोहिते यांनी छायाचित्रण केले आहे. वल्लभ मोरे यांनी सह दिग्दर्शक व संकलनाचे काम सांभाळले आहे.