क्रिकेट आता 'जेंटलमेन्स गेम' राहीला नाही : कपिल देव

    दिनांक  14-Feb-2020 12:19:16

kapil dev_1  Hमुंबई
: भारताचे माजी कर्णधार आणि मार्गदर्शक, समालोचक कपिल देव यांनी बांगलादेश आणि भारतीय खेळाडूंमध्ये झालेल्या वादावर खंत व्यक्त केली आहे. '' एकेकाळी क्रिकेट हा खेळ जेंटलमेन्स गेम म्हणून ओळखला जात होता. मात्र, आता हा खेळ सभ्य गृहस्थांचा खेळ राहिलेला नाही." अशा शब्दांमध्ये त्यांनी टीका केली. तसेच युवा खेळाडूंना योग्य तो धडा मिळावा, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
 
 
"आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा भारत-बांगलादेश यांच्यातील अंतिम सामन्यामध्ये खेळाडूंमध्ये झालेला वाद हा खेळाला काळिमा फासणारा आहे. त्यामुळे क्रिकेटला आता सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणता येणार नाही. कोण म्हणतो क्रिकेट हा आता सभ्य गृहस्थांचा खेळ आहे? तो एके काळी होता, परंतु आता नाही" अशी खंत त्यांनी व्यक्त केली तर युवा क्रिकेटपटूंवर क्रिकेट मंडळांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.