'छत्रपतींचा वंशज म्हणून मध्यप्रदेश सरकारचे कृत्य कदापि सहन होणारे नाही'

    दिनांक  13-Feb-2020 13:53:44

sambhaji maharaj_1 &
 
 
 
 
कोल्हापूर : मध्यप्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जेसीबी लावून हटवल्याने मध्यप्रदेशातील जनता रस्त्यावर उतरलेली असतानाच भाजप नेते, खासदार छत्रपती संभाजी राजेही काँग्रेस सरकारवर प्रचंड संतापले आहेत. छत्रपती शिवरायांची मूर्ती हटवल्याने जनआक्रोश वाढला आहे. त्याची झळ सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या प्रकारावर खुलासा करावा, अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे.
 
 
खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती जेसीबी लावून पाडत असल्याचा व्हिडिओ पाहून मन हेलावून गेले. मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारने आणि काँग्रेस अध्यक्षांनी त्याबाबत खुलासा करावा. या घटनेनंतरचा जनआक्रोश एवढा आहे की, त्याची झळ काँग्रेसला बसल्याशिवाय राहणार नाही, असे संभाजी राजे यांनी म्हंटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना टॅग करून छत्रपती संभाजी राजे यांनी हे ट्विट केले आहे.