अंधेरीतील एमआयडीसीमध्ये भीषण आग

    दिनांक  13-Feb-2020 14:16:54

andheri MIDC_1  
 
 
मुंबई : अंधेरीतील एमआयडीसी परिसरात गुरुवारी रोल्टा कंपनीच्या चार मजली इमारतीच्या दुस-या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत दोन मजले जळून खाक झाले. दुपारी पावणेदोन वाजता लागलेली ही आग क्षणात पसरून आगडोंब उसळला. संपूर्ण काचेची असलेली ही इमारत रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अडीच तासात आगीवर नियंत्रण मिळवले. इमारतीच्या सर्व्हररुमध्ये स्पार्क होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
 
 
दुस-या मजल्यावर दुपारच्या वेळेस अचानक लागलेल्या या आगीने रौद्ररुप धारण केले. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानाणी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले. संपूर्ण इमारत काचेची असल्याने धूर कोंडला. त्यामुळे आग विझवण्यास अडथळे आले. दुस-या मजल्यावर लागलेली आग शेवटच्या चौथ्या मजल्यापर्यंत पोहचली. धुराचे लोट पसल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात होते. त्यामुळे दलाच्या जवानांना इमारतीच्या काचा फोडून पाण्याचे फवारे मारावे लागले. ही आग परिसरातील बाजूच्या इमारती पर्यंत पोहचू नये यासाठी दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले. सुमारे अडीच तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने इमारत रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला. सर्व्हर रुममध्ये स्पार्क झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून अधिक तपास सुरु आहे.