लखनौ न्यायालयात बॉम्ब हल्ला ; सहसचिवांसह काही वकील जखमी

13 Feb 2020 13:53:30

luknow_1  H x W
 
लखनौ : लखनौच्या एका न्यायालयामध्ये बॉम्ब हल्ला झाला आहे. यामध्ये सहसचिवांसह काही वकील जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. लखनौ बार असोसिएशनच्या सहसचिवांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यात सहसचिव संजीव लोधी जखमी झाले आहेत. तसेच, न्यायालयामध्ये दोन जिवंत बॉम्बही सापडले आहेत.
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वकील संजीव लोधी यांच्या दिशेने हा देशी बॉम्ब फेकण्यात आला होता. मात्र, सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले आहेत. दोन गटांमधील संघर्षाचा हा परिणाम असल्याचे पोलिसांनी सांगितले. अचानक स्फोटाचा आवाज झाल्यानंतर न्यायालयात सगळीकडे खळबळ माजली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
 
 
संजीव लोधी हे लखनौ बार असोसिएशनचे सहाय्यक सचिव आहेत, अशी माहिती सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष आदेश सिंह यांनी दिली आहे. त्यांच्याच चेंबरसमोर तीन बॉम्ब फेकण्यात आले. या तीन बॉम्बपैकी एक बॉम्ब फुटला. तर दोन जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात आले. या हल्ल्यावेळी हल्लेखोरांनी पिस्तुले देखील दाखवली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0