प्राणीमात्रांची संरक्षणकर्ती...

    दिनांक  13-Feb-2020 22:26:16
nisha kunju_1  

‘भूतदया जोपासा’ असे सांगणारे आणि ती दैनंदिन जीवनात पदोपदी जगणारे यांमध्ये तसे बरेच अंतर. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईच्या भांडुप उपनगरातील प्राणीमात्रांची संरक्षणकर्ती निशा कुंजू...


वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ।
पक्षीही सुस्वरे आळविती ॥

संत तुकाराम महाराजांनी वनस्पती, प्राणी, पक्ष्यांचा सहवास किती महत्त्वाचा आहे ते सोळाव्या शतकातच केवळ ओळखले नाही, तर त्याबाबत प्रबोधनही केले. पण, तुकारामांसह इतरही संतांच्या वाणीला माणसाने गांभीर्याने घेतले असते तर आज पर्यावरण संरक्षणाचे वेगळे धडे कदाचित द्यावेही लागले नसते. आपल्या समाजात आज असे करोडोंपैकी लाखो हात का होईना, पर्यावरण संरक्षणासाठी झटत आहेत. त्यापैकीच मुक्या प्राण्यांविषयी विशेष प्रेम आणि काळजी बाळगणारी मुंबईच्या भांडुप उपनगरातील निशा कुंजू. तिने आजवर शेकडो प्राणीपक्ष्यांना जीवनदान दिले आहे.


अगदी शालेय जीवनापासून निशाला प्राणीमात्रांविषयी विशेष प्रेम. शाळेत असताना निशा जखमी पोपट आणि कुत्र्यांना औषधपाणी करायची. अगदी आपल्या बचतीच्या पैशांतून बिस्किटे खरेदी करून प्राण्यांना खायला घालणे, हा तर निशाचा रोजचाच उद्योग होता. अशाप्रकारे दिवसेंदिवस निशाचे प्राणी-पक्षीप्रेम वाढतच गेले. आपल्या आजूबाजूला या मुक्या पक्ष्यांना-प्राण्यांना त्रास देणारी माणसं बघून निशाला वाईट वाटायचे. तिचा संताप व्हायचा. या मुक्या प्राणी-पक्ष्यांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, अशी गाठ मग तिने मनोमन बांधली. म्हणूनच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राणी-पक्ष्यांच्या संरक्षणार्थ निशाने आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले.


यासाठी तिने २००० मध्ये ‘प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर’ या संस्थेची स्थापना करून संस्थेसाठीच पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. याशिवाय निशा ‘अम्मा केअर फाऊंडेशन’ची सचिव असून वन्यजीव गुन्हेगारी नियंत्रण ब्युरोची सभासदही आहे.


मुंबईच्या पूर्व उपनगरातील भांडुप-मुलुंड येथील अनेक भटक्या प्राण्यांना शोधून त्यांचे लसीकरण करणे, त्यांच्यावर औषधोपचार करणे ही आपली नैतिक जबाबदारी समजून निशा कामाला लागली. त्यामुळे पूर्व उपनगरांमध्ये जे निशाच्या कार्याशी सुपरिचित आहेत, ती मंडळी एखादा पक्षी जरी कुठे अडकलेला दिसला तरी निशाला पाचारण करतात. निशा आपल्या टीमबरोबर या प्राण्यांच्या बचावार्थ २४ तास तत्पर असते.


काही उपद्रवी लोक मुक्या प्राण्यांना विनाकारण त्रास देतात. शिवाय अनेकदा त्यांना ‘पाळीव’ म्हणून घरीही आणतात. मात्र, या प्राण्यांना जेव्हा सांभाळणे डोईजड होते, तेव्हा मात्र त्यांना पुन्हा बाहेरचा रस्ता दाखवला जातो. अशा बेघर प्राण्यांना ‘शेल्टर होम’पर्यंत नेण्याचे कामही निशा तितक्यात तत्परतेने करते. सुरुवातीला निशाला या कामांत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिची या प्राण्यांविषयीची संवेदना अनेकांच्या चेष्टेचा विषयही ठरली. एखाद्या कुत्र्या-मांजरावर भररस्त्यात औषधोपचार करणार्‍या निशाकडे अगदी विचित्र नजरेने बघणारेही महाभाग भेटले. मात्र, याकडे साफ दुर्लक्ष करत निशाने आपल्या कामाचा धडाका असाच कायम ठेवला.


विनाकारण प्राणीपक्ष्यांना त्रास देऊन जखमी करण्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. मकरसंक्रांतीच्या उत्सवाच्या उत्साहात मांज्यामुळे पंख कापल्याने अनेक पक्षी गंभीर जखमी होतात. यासाठी नागरिकांमध्ये ‘प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर’ या संस्थेकडून जागरूकता मोहीम राबविली जाते. याशिवाय पाळीव प्राण्यांवर होणार्‍या अत्याचारांची माहिती घेऊन त्यासाठी लढा दिला जातो. तसेच दिवाळीतील फटाक्यांच्या धुरांचा प्राणी-पक्ष्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम जाणवतो. त्याविषयीही नागरिकांमध्ये जनजागृतीचे कार्य निशा आणि त्यांची संस्था करते. याशिवाय लहान मुलांच्या मनात असणारी प्राणीपक्ष्यांविषयीची भीती दूर करून त्यांना प्राणी हे आपले मित्र असतात, याविषयी निशा नेहमी मार्गदर्शन करते.


मुक्या प्राण्यांच्या जीवाचे अजूनही बर्‍याच माणसांना मोल नाही. त्यामुळेच त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार केले जातात. अशा असंवेदनशील लोकांना कायदेशीररित्या धडा शिकवण्याचे काम निशा करते. भांडुप पंपिंग स्टेशन, मुलुंड मिठागर, नवी मुंबई येथे अनेक परदेशी पक्षी वास्तव्यास येतात. मात्र, अनेकदा या पक्ष्यांना बघ्यांच्या गर्दीने जखमी केल्याचेही प्रकार घडतात. यामध्ये बरेचदा या पक्ष्यांच्या पंखांना, पायांना इजा होते किंवा त्यांचा जीवही जातो. अशा जखमी पक्ष्यांवर उपचाराचे काम निशा व तिची टीम उत्तमप्रकारे करते. अनेकदा मुलुंडच्या नागरी वस्तीत रानटी प्राणी, साप घुसतात. त्यांना वाचवून पुन्हा जंगलात सोडण्याचे काम निशा अगदी प्रेमाने करते.


निशासह तिच्या संस्थेत अनेक प्राणीप्रेमी तरुण मंडळीही काम करतात. निशाच्या या भूतदयेला, पशुसेवेला अनेक संस्थांनी, अनेक व्यासपीठांवर सन्मानित केले आहे. यामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त १०० शक्तिशाली महिलांपैकी एक म्हणून निशाला गौरवान्वित करण्यात आले. तसेच ‘कर्मवीर चक्र’ आणि ’कर्मवीर पुरस्कार’ यांसारख्या जागतिक पुरस्कारांचीही ती मानकरी ठरली. वन्यजीवांसाठी एवढे करूनही निशा स्वस्थ बसणार्‍यांपैकी नाही. भविष्यात तिला आपल्या कामाचा आवाका आणखीन वाढवायचा आहे. संस्था-धोरणांचा विस्तार करायचा आहे. त्यादृष्टीने ती कार्यरतही आहेच. अशा या ‘भूतदया’ सर्वोपरी मानणार्‍या निशाला दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा!- कविता भोसले