शैक्षणिक साहित्याचं ‘अमृत’- सुंदरम नोटबुक

    दिनांक  13-Feb-2020 21:19:38   
sundaram_1  H x

आठ जणांचं त्याचं कुटुंब. ‘तो’ सगळ्यात मोठा. शिक्षणाची आवड होती. मात्र, परिस्थितीमुळे शिकायला मिळालं नाही. पण, ‘तो’ खचला नाही. ‘आपण जरी शिकलो नाही, तरी इतरांच्या शिक्षणास आपण नक्कीच कारणीभूत ठरू,’ हा चंग त्याने बांधला. आज महाराष्ट्रातला असा एकही विद्यार्थी बहुधा नसेल, ज्याने त्याच्या वहीचा वापर केला नसेल. परिस्थितीअभावी स्वत: शिकू न शकलेला हा मुलगा मोठा उद्योजक बनला. त्याने बांधलेल्या शाळेतून आज हजारो मुलं शिक्षण घेत आहेत. स्वत: उद्योजक बनून विद्यार्थ्यांसाठी शाळा बांधणारा हा उद्योजक म्हणजेच ‘सुंदरम’ या प्रसिद्ध ब्रॅण्डचे अध्यक्ष अमृत शाह होय.गुजरातमधील कच्छ प्रदेशातलं प्रेमजीभाई आणि गंगाबेन शाह यांचं एक साधं, संस्कारी कुटुंब. या शाह दाम्पत्याला एकूण सहा अपत्ये. तीन मुलं अन् ३ मुली. ३० ऑगस्ट, १९६१ रोजी अमृतचा जन्म झाला. अमृत लहानपणापासून कष्टाळू. कच्छच्या जिल्हा परिषदेत अमृतचं सहावीपर्यंतचं शिक्षण झालं. पुढे दहावीपर्यंतचं शिक्षण सोनगढ आश्रमात झालं. याच आश्रमात त्यांच्यावर खर्‍या अर्थाने सुसंस्कार झाले. दहावीनंतर मात्र अमृतने शिक्षणाऐवजी रोजगाराचा मार्ग पकडला, कारण ती शाह कुटुंबासाठी गरज होती. अमृतचे मामा मुंबईत राहायचे. त्यांचा वह्या तयार करण्याचा कारखाना होता. अमृत त्यांच्याकडे १९७७ साली आला. त्यावेळेस त्याचं वय होतं अवघं १७ वर्ष. कारखान्यात काम करून अमृत त्यांना हातभार लावत होता. पुढच्याच महिन्यात त्याने आपला भाऊ रायचंदलासुद्धा बोलावून घेतले. दोन्ही भाऊ इमानेइतबारे मामासाठी काम करू लागले. रायचंद उत्पादन पाहत असे तर अमृत संपूर्ण महाराष्ट्रात फिरून वह्यांची विक्री करायचा.


१९८४च्या नोव्हेंबरमध्ये या दोन्ही भावांनी स्वत:चा व्यवसाय करण्याचे ठरविले. मामांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली. लोअर परळ येथील सनमिल कंपाऊंड येथील ३०० चौरस फुटाच्या जागेत छोटासा कारखाना सुरू केला. लखमशीभाई या सद्गृहस्थाने या दोन भावांची मेहनत व धडपड पाहून त्यांना व्यवसाय करण्यास ही जागा दिली. स्वत: साठविलेले १५ हजार रुपये त्यांनी भांडवल म्हणून वापरले. आठ वर्षे या उद्योगधंद्यात असल्याने अनेक लोकांच्या ओळखी होत्या. त्यामुळेच यंत्रे आणि कागद उधारीवर मिळाले. ‘सत्यम, शिवम, सुंदरम’ या बोधवाक्यातील ‘सुंदरम’ हा शब्द निवडून ‘सुंदरम’ असं कंपनीचं नामकरण त्यांनी केलं. दोन रुलिंग मशीनसोबत ८०० किलोग्रॅम कागदाचं उत्पादन ते घेऊ लागले. दरम्यान, १९८३ साली विमलाबेन या सुविद्य तरुणीसोबत अमृतचा विवाह संपन्न झाला.


१९८५ साली खर्‍या अर्थाने ३०० चौरस फूट माळ्यावर सुरू झालेल्या ‘सुंदरम नोटबुक कंपनी’कडे ५० हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे काही वर्षांतच पाच कारखाने झाले. १९९३ साली ‘सुंदरम’च्या वह्या सातासमुद्रापार निर्यात होऊ लागल्या. आधी आफ्रिका नंतर अमेरिका असं हे निर्यातचक्र सुरू झालं. १९९५ साली ‘सुंदरम बुक कंपनी’चं नूतनीकरण ‘सुंदरम मल्टीपेप लिमिटेड’ असं करण्यात आलं. पुढच्याच वर्षी ‘सुंदरम’ कंपनीने शेअर बाजारात स्वत:चा ‘आयपीओ’ आणला. आज ‘सुंदरम मल्टीपेप’ ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ आणि ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’मध्ये नोंदणीकृत आहे. २००७ साली नागपूरचा पेपर कारखाना ‘सुंदरम’ने विकत घेतला. २००९ साली कंपनी आधुनिक अशा डिजिटल क्षेत्रात उतरली. ‘ई-क्लास’ नावाची डिजिटल कंपनी सुरू केली. २००९ मध्येच पालघर येथे अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असा १ लाख, १० हजार चौरस फूट क्षेत्रात कारखाना सुरू केला. अमृत शाह यांच्यानुसार ‘सुंदरम’ आज महाराष्ट्रात शालेय आणि कार्यालयीन स्टेशनरी क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाचा ब्रँड आहे, तर संपूर्ण भारतात तिसर्‍या स्थानावर आहे. तब्बल २० हजार स्टेशनरी दुकानांची साखळी ‘सुंदरम’ने जोडलेली आहे. शालेय आणि कार्यालयीन स्टेशनरी प्रकारातली तब्बल २२० हून अधिक उत्पादने ‘सुंदरम’ तयार करते. दररोज १०० टन कागद उत्पादन तयार करण्याची ‘सुंदरम’ची क्षमता आहे.


२०१४ वर्ष हे ‘सुंदरम’साठी वेदनादायी ठरलं. नागपूरचा पेपर कारखाना विकत घेणे आणि ई-क्लास कंपनी सुरू करणे हे दोन निर्णय ‘सुंदरम’साठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरले. तब्बल ११७ कोटी रुपयांचं कर्ज झालं. बँकेची थकबाकी भागविण्यासाठी कंपनीचे समभाग विकण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. मात्र, अशा कठीण परिस्थितीतच कुटुंबाची ताकद कळते. अमृत शाह, रायचंद शाह आणि शांती शाह या भावांनी एकत्र येऊन विचार केला. जर आपण दुसर्‍या कंपनीला समभाग विकले तर आतापर्यंत ज्यांनी विश्वासाने साथ दिली, त्यांच्यावर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळेल. आपल्यावर शेकडो कुटुंबं अवलंबून आहेत. त्यांना विसरून कसं चालेल. नाही, आपणच कंपनी चालवायची. शाह बंधूंचा निर्णय झाला. बँकेकडून त्यांनी आणखी दोन वर्षांचा कालावधी मागितला. याच कठीण प्रसंगात शाह बंधूंसोबत त्यांचे पुरवठादार, विक्रेते त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. या सगळ्यांमुळे अमृत शाह यांचा उत्साह दुणावला. ते जोमाने कामाला लागले. बहुतांश कर्ज त्यांनी फेडलं.


आज ‘सुंदरम’चा गाडा दुसरी पिढीदेखील तितक्याच समर्थपणे हाताळत आहे. शांतीभाई देशांतर्गत विक्रीचं काम पाहतात, तर रायचंद शाह उत्पादन प्रक्रियेकडे लक्ष देतात. अमृत शाह निर्यात आणि कंपनीच्या इतर उपक्रमाकडे लक्ष देतात. त्यांचा मुलगा हार्दिक ‘ई-क्लास’ कंपनीचा कारभार पाहतो. शांतीभाईंचा मुलगा कुणाल दैनंदिन प्रक्रिया पाहतो, तर रायचंद शाह यांचा मुलगा यश उत्पादनासोबत इतर राज्यांतील विक्रीकडे लक्ष देतो.


अमृतभाईंनी आपल्या गावी वडिलांच्या नावे शाळा सुरू केली आहे. एका कॅथलिक शाळेला त्यांनी भूखंड उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे अनेक शाळा आणि इस्पितळे यांना ते आर्थिक साहाय्य करतात. त्यांच्या उद्योजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक योगदानासाठी अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा निर्यातीसाठी, महाराष्ट्र बुक मॅन्युफॅक्चर असोसिएशनचा लघु उद्योगक्षेत्रासाठी, फेडरेशन ऑफ महाराष्ट्र स्टेशनरी मॅन्युफॅक्चरर्स अ‍ॅण्ड ट्रेड असोसिएशनचा महाराष्ट्र रत्न, इकॉनॉमिक टाइम्सचा एसएमई अ‍ॅक्टिव्हेटर-२०१८ अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.


आपल्या वाटचालीत डॉ. मिलिंद भट या आध्यात्मिक गुरूचं योगदान अनमोल असल्याचं अमृत शाह सांगतात. “श्रद्धा आणि सबुरी हा साईबाबांचा संदेश आपण अमलात आणल्यानेच येथवर पोहोचू शकलो,” असे अमृत शाह प्रांजळपणे कबूल करतात. “तरुणांनीदेखील व्यवसाय करताना हा संदेश लक्षात घेऊन कार्य करावे, हाच यशस्वी होण्याचा मंत्र आहे,” असे ते म्हणतात. परिस्थितीला शरण न जाता आपलं शिक्षणाचं स्वप्न इतरांच्या माध्यमातून पूर्ण करणारे अमृत शाह एक ‘ग्रेट’ उद्योजक आहेत, यात शंकाच नाही.