दिमाखात पार पडला ‘मन फकीरा’चा म्युझिक लाँच सोहळा!

    दिनांक  12-Feb-2020 16:31:10

mann fakira_1  




जॅमिंग सेशनमध्ये रंगली गाण्यांची मैफिल!

मुंबई : ‘मन फकीरा’ हा रोमँटिक ड्रामा प्रख्यात मराठी अभिनेत्री मृण्मयी प्रतिभा देशपांडे हिने लिहिला असून, तीच या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन हे कलाकार प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडला. ‘नात्यांचा खरा अर्थ सांगणारा’ हा चित्रपट आता ६ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मन फकीरा’ हा मृण्मयी देशपांडेचे लेखन आणि दिग्दर्शन असलेला पहिलाच चित्रपट आहे.



 


या संगीत अनावरण सोहळ्यासाठी दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन हे कलाकार उपस्थित होते. त्याशिवाय, संगीत दिग्दर्शक व गायक सिद्धार्थ महादेवन, सौमिल शृंगारपुरे आणि यशिता शर्मा हेदेखील उपस्थित होते. या संगीत सोहळ्याचे सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे आणि सुव्रत जोशी यांनी केले. या संगीत सोहळ्यात या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक व गायक सिद्धार्थ महादेवन, सौमिल श्रींगारपुरे, यशिता शर्मा, गौतमी देशपांडे, निकिता गांधी या सर्व गायकांनी वाद्यवृंदाच्या साथीने ‘मन फकीरा’ चित्रपटातील मन फकीरा, घरी गोंधळ, सांग ना, समथिंग इज राईट अश्या या चार बहारदार सुरेख गाण्यांची मैफिल रंगवली. यामध्ये सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन देखील सामील झाले. त्याचबरोबर सुव्रत जोशीने मधुचंद्राच्या पहिल्या रात्री जोडप्यांमध्ये नक्की काय गंमती–जमंती होतात यावर पोट धरून हसवणारे स्टॅन्ड-अप कॉमेडी सादर केले. या चित्रपटाची गाणी वैभव जोशी, क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून आली आहेत. या कार्यक्रमादरम्यान वैभव जोशी यांच्या काही प्रेमावरील रंगतदार कविता चित्रफीत रूपात दाखवण्यात आल्या. अश्या या धमाकेदार, बहारदार आणि वेगळा सादरीकरण असलेला संगीत अनावरण सोहळा संपन्न झाला.


‘फ्रेम्स प्रॉडक्शन’ कंपनीचे हेमंत रूपरेल, रणजीत ठाकूर आणि ‘स्मिता फिल्म प्रॉडक्शन्स’ची प्रस्तुती असलेल्या ‘मन फकीरा’ या चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी यांची आहे. हा चित्रपट ६ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.