डावे उरले केवळ जेएनयुपुरते!

12 Feb 2020 20:50:23
agralekh_1  H x




जेएनयुतील गोंधळ घालणार्‍या टाळक्या आणि टोळक्यांव्यतिरिक्त दिल्लीत डाव्यांची विचारपूस करणारे कोणीही नसल्याचे स्पष्ट होते. पण असे का व्हावे? बरं, हे फक्त दिल्लीतच नाही, तर गेल्या काही वर्षांचा भारतीय राजकारणातील निवडणुकांचा अभ्यास केल्यास डावे पक्ष नेस्तनाबूत होत असल्याचेच आढळते.


दिल्ली विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर हर्षवायू झालेले मुंबईपासून दिल्लीपर्यंतचे राजकीय पक्ष व राजकीय विश्लेषक पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करत असल्याचे दिसते. भाजपकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान काही अधिक-उणे झाले असेल, ते नाकारता येणारही नाही, त्यावर पक्ष आत्मचिंतनही करेलच. परंतु, टीकाकार आपल्या विश्लेषणात डाव्या पक्षांचे नावही घेताना दिसत नाहीत, ही विशेष बाब नव्हे काय? कारण, अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्ष यांच्या विजयाची जी कारणे सांगितली जातात, त्यात जनतेशी निगडित मुद्द्यांशी भिडण्याच्या त्यांच्या कौशल्याचा उल्लेख होताना दिसतो. आरोग्य, पाणी, वीज, शाळा, बस प्रवास आदी सुविधा केजरीवालांनी मोफत वा सवलतीने दिल्या आणि त्यामुळे दिल्लीकरांनी ‘आप’ला स्वीकारल्याचेही सांगितले जाते. परंतु, डाव्या पक्षांचा अजेंडा तरी याहून निराळा काय होता किंवा असतो? मार्क्सने आपली संकल्पना मांडली, त्यावेळी त्याने हेच तर सांगितले होते ना आणि आजही डावे पक्ष मार्क्सलाच आपले प्रमाण मानतात ना? म्हणजे राज्यातील सर्व प्रकारचे विभाग, खाती, उद्योग, संपत्ती वगैरे वगैरे गोष्टी सरकारने आपल्या ताब्यात घ्यायच्या आणि त्याचे जनतेत वाटप करायचे, हाच विचार तर मार्क्सने दिला होता ना? मात्र, अरविंद केजरीवाल त्याच धर्तीवर विविध योजना राबवत असतील आणि त्यांना मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळत असेल, तर तसेच तत्त्वज्ञान सांगणार्‍या डाव्यांना का कोणी स्वीकारताना दिसत नाही?


मंगळवारी दिल्ली विधानसभेचा निकाल लागला आणि नंतर कोणत्या पक्षाला किती टक्के मते पडली, याची आकडेवारीही निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर झाली. सत्ताधारी आम आदमी पक्षाला पहिल्या क्रमांकाची ५३.५७ टक्के मते मिळाली, तर ३८.५१ टक्के मतांसह भाजप दुसर्‍या क्रमांकावर राहिला. इथे आम आदमी पक्षाला केवळ भाजपनेच तुल्यबळ लढत दिल्याचे आणि मतदारांनीही आपसमोर भाजपलाच पसंती दिल्याचे दिसते. दिल्लीवर सलग १५ वर्षे राज्य करणार्‍या काँग्रेसला मतदारांनी थोडेफार आठवणीत ठेवत, त्या पक्षाच्या झोळीत ४.२६ टक्के मते टाकली व तो पक्ष तिसर्‍या स्थानावर राहिला. इथे काँग्रेसची बहुतांश मते आपकडे वळल्याचेही दिसते, तो एक वेगळाच मुद्दा. पण, या सर्व घडामोडीत डाव्या पक्षांचा पुरता पालापाचोळा झाला. दिल्लीत डाव्या पक्षांनी लढत दिली ती कोण्या पक्षाशी नव्हे तर चक्क नोटाशी! मात्र, तिथेही डाव्यांवर नोटाने मात करत ०.४६ टक्के मते मिळवली आणि डाव्यांनी (सीपीआय + सीपीएम) केवळ ०.०३ टक्के मते! इथे डावे पक्ष केवळ जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष व सदस्यपदी निवडून येण्यापुरतेच उरल्याचे लक्षात येते. जेएनयुतील गोंधळ घालणार्‍या टाळक्या आणि टोळक्यांव्यतिरिक्त दिल्लीत डाव्यांची विचारपूस करणारे कोणीही नसल्याचे स्पष्ट होते. पण असे का व्हावे? बरं, हे फक्त दिल्लीतच नाही, तर गेल्या काही वर्षांचा भारतीय राजकारणातील निवडणुकांचा अभ्यास केल्यास डावे पक्ष नेस्तनाबूत होत असल्याचेच आढळते. एकेकाळी देशभरातील कितीतरी राज्यात आणि प्रामुख्याने महानगरांत डाव्यांचा भलताच बोलबाला होता. जनतेनेही डाव्या पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवणार्‍यांना अनेकदा विधानसभा वा लोकसभेतही पाठवले. पश्चिम बंगाल तर डाव्यांचा बालेकिल्ला होता नि त्रिपुरातली परिस्थितीही वेगळी नव्हती. नंतर मात्र डाव्या पक्षांचा जनसामान्यांशी असलेला संबंध, संपर्क, संवाद तुटला आणि त्या पक्षांची वाताहत होत गेली. बुद्धिजीवी, विचारवंत, अभ्यासक वा पत्रकार-विश्लेषकांच्या आधारावर त्या पक्षाने राजकारणात तगून राहण्याचे प्रयत्न केले. पुस्तकी शहाणपणाचे नारे देत निवडणुका जिंकण्याची स्वप्ने त्यांनी पाहिली. पण, लोकांशी तुटलेली नाळ जोडण्याचे प्रयत्न डाव्यांनी कधी केलेच नाहीत. आजही देशातील सर्वसामान्य जनतेच्या अनेकानेक गरजा आहेत आणि त्या वाढतही आहेत. त्या गरजांची पूर्तता कशी करावी वा तशी पूर्तता कोणी करून देईल का, याच्या शोधात ही जनता असल्याचेही दिसते. पण, वर्गसंघर्षाचे प्रतिपादन करणारे डावे पक्ष वा त्यांची विचारसरणी आपल्या गरजा भागवू शकेल, असे सामान्य मतदाराला अजिबात वाटत नाही, लोक डाव्यांच्या मागे जात नाहीत. पश्चिम बंगाल घ्या किंवा त्रिपुरा वा आताची दिल्ली विधानसभेची निवडणूक इथे मतदारांनी डाव्यांना साफ नाकारल्याचे दिसते. म्हणूनच हा डाव्या पक्षांच्या निवडणुकीच्या राजकारणातील जितका पराभव आहे, तितकाच तो त्या विचारधारेचाही आहेच. डाव्यांच्या मागे लोकांनी न जाण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यात त्यांच्या हिंसक वृत्ती व कृती आणि सातत्याने देशविरोधी, हिंदूविरोधी भूमिका घेण्याचा मोठा वाटा आहे. गेल्या कित्येक वर्षांत अशा अनेकानेक घटना घडल्या आणि डाव्यांचा बुरखा फाटत गेला व ते पक्ष केरळ वगळता सर्वदूर आक्रसले.


गेल्या पाच-सहा वर्षांत तर डाव्यांच्या मुखवट्यामागचे चेहरे समोर येण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर आल्या, ‘तुकडे तुकडे गँग’चे अस्तित्व हा त्याचाच दाखला. संसदेवर दहशतवादी हल्ला करणार्‍या अफझल गुरूचे समर्थन करणे, राष्ट्रीय व हिंदू प्रतिकांची हेटाळणी-विटंबना करण्याचे उद्योग डाव्यांनी केले. ज्या मुद्द्यांचा सामान्य नागरिकाशी काडीचाही संबंध नाही, त्या मुद्द्यांवर केवळ माध्यमांना हाताशी धरून राळ उडवून देण्याचे कामही डाव्या पक्ष व संघटनांनी केले. आताचा ‘सीएए’ व ‘एनआरसी’, ‘एनपीआर’ला डाव्यांकडून होणारा विरोध ही त्यातली ताजी घटना. तथापि, ही कामे डाव्यांनी उघडपणे केली, तर विरोधी विचारांच्या व्यक्तींच्या हत्येची एक नवी पद्धतीही डाव्यांनी शोधून काढली, ज्याची कबुली त्याच पक्षाच्या नेतृत्वाने दिलेली आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळमध्ये विरोधकांना संपवण्याचा रक्तरंजित खेळ डाव्यांनी खेळला. आपल्या जागतिक भाईबंदांचा वारसा उचलून घेत भारतातही डाव्यांनी रक्ताचा सडा शिंपण्याची कामे केली. आजचा भारतीय राजकारणाचा अवकाश डावेमुक्त होण्याला या सगळ्याची पार्श्वभूमी आहे. अर्थात डावी मंडळी जन्माला येतात, तीच मुळी जगातील सर्वोच्च ज्ञान आणि शहाणपण घेऊन. त्यामुळे त्यांना आपण काही चुकीचे करत आहोत आणि त्यामुळे आपल्याला जनता झिडकारत आहे, हे कधी पटणार नाहीच. ते अधिकाधिक खोलात जात राहतीलच, पण मग दिल्लीत भाजपला ३८ टक्क्यांहून अधिक मते मिळूनही तो माध्यमांच्या भाषेत ‘धुव्वा’ उडण्याचा प्रकार असेल तर सगळा देश आपल्या पाठीमागे असल्याचे म्हणणार्‍या डाव्यांच्या सारीकडून होत चाललेल्या सफायाचे काय? त्यांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीला कोणते विशेषण देणार?


दरम्यान, सध्या डाव्यांना कन्हैय्याकुमारच्या रूपात एक नवा चेहरा मिळाल्याचे आणि माध्यमेही त्याला नाचवत असल्याचे दिसते. डावे पक्ष त्याला बिहार विधानसभा निवडणुकीत आजमावण्याच्या तयारीलाही लागले आहेत. मात्र, आज कन्हैय्याकुमार बिहारमध्ये जिथे जिथे जातो, तिथे तिथे त्याचे स्वागत अंडी आणि चपलांच्या माराने होत असल्याचे उघड झाले. असे का होत असावे? आज भाजपच्या पराभवाने खुश होणारे डावे व त्यांची तळी उचलणारे वर उल्लेखलेले प्रश्न डाव्या पक्षांना वा स्वतःला तरी कधी विचारणार की नाही? कदाचित नाहीच, कारण मतदाराने डाव्यांना धिक्कारल्याचेच त्यातून समोर येईल आणि ते वास्तव स्वतःच्या विद्वत्तेचे, पांडित्याचे कौतुक वाटणार्‍यांना कसे पचेल?
Powered By Sangraha 9.0