राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

    दिनांक  12-Feb-2020 10:03:20

aurangabad_1  H
 
 
औरंगाबाद : आमदार रोहित पवार यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस पाठवली आहे. भाजपचे नेते राम शिंदे यांनी केलेल्या निवडणूक याचिकेवर आमदार रोहित पवार यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक लढताना गैरप्रकार केला असल्याचा आरोप करत माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात इलेक्शन पिटीशन दाखल केली. त्यावरून औरंगाबाद खंडपीठाने रोहित पवार यांना नोटीस बजावली आहे.
 
 
रोहित पवारांनी मतदारांना लाच देणे, राम शिंदे यांची बदनामी करणे, निवडणूक खर्चाचे तपशील लपवणे आणि या सर्वांचा आधार घेऊन निवडणुकीत विजय मिळवला, असा आक्षेप राम शिंदे यांनी घेतला आहे. त्याचबरोबर 'बारामती अॅग्रो लिमिटेड'च्या कर्मचाऱ्यांना प्रचारासाठी जामखेड कर्जत मतदारसंघात घेऊन आले होते. हे कर्मचारी घरोघरी जाऊन मतदारांना प्रभावित करत होते आणि १,००० रुपयाची लाच देत होते, असाही आरोप राम शिंदे यांनी केला आहे. त्यासोबतच रोहित पवार यांनी निवडणूक खर्च लपवून ठेवला, असाही आरोप करण्यात आला आहे. यावरून औरंगाबाद खंडपीठाने रोहित पवार यांना नोटीस पाठवली आहे. पुढील सुनावणी १३ मार्च रोजी करण्यात येणार आहे.