धार्मिक ऐक्य ‘टिकटॉक’ला नकोसे?

12 Feb 2020 19:25:55
tiktok_1  H x W





टिकटॉकचा भारतातील प्रवेश, प्रसिद्धी आणि व्यवसाय हा जितका लौकिक मिळवणारा ठरला तितका वादग्रस्तही. आज अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये असलेले हे सोशल मीडिया अ‍ॅप कित्येकांचा विरंगुळा, कित्येकांचे मनोरंजन, काहींचा व्यवसाय तर काहींसाठी प्रसिद्धीसाठीचे खुले द्वार बनले आहे. मात्र, हेच टिकटॉक अनेकदा हिंसाचार, विकृती आणि किळसवाण्या प्रवृत्तींनाही प्रोत्साहन देताना दिसते. त्यामुळेच आता युझर्सद्वारे पोस्ट केल्या जाणार्‍या विविध व्हिडिओंवर सेन्सॉरशिप लादलेली दिसते. यात भडकाऊ किंवा हिंसक विषयांवरील व्हिडिओंना थेट कात्री लावण्याचे काम कंपनीने सुरू केल्याची उदाहरणे आहेत. ज्याप्रमाणे फेसबुकवर हिंसक व्हिडिओज किंवा पोस्टवर कारवाई करण्यात येते, त्याचप्रमाणे टिकटॉकही असे व्हिडिओ ‘शॅडो बॅन’ करत असल्याची उदाहरणे समोर आली आहेत. मात्र, यामुळे अनेकदा चोर सोडून संन्याशाला फाशी, अशी गत झाल्याने याचा फटका टिकटॉक स्टार्सनाही बसलेला दिसतो.


हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देणारे व्हिडिओ तयार करणारा २२ वर्षीय अजय बर्मन हा एकेकाळचा टिकटॉक स्टार सध्या रसातळाला जाण्याच्या मार्गावर आहे. अजयने तयार केलेले व्हिडिओज युझर्सपर्यंत पोहोचवलेच जात नाहीत. त्यामुळे त्याला मिळणारा प्रतिसादही कमी होत गेला. परिणामी, २५ लाखांपर्यंत व्ह्यूज (प्रेक्षक) मिळवणारा त्याचा व्हिडिओे केवळ आठ ते १० हजारांवरच येऊन अडकला. परिणामी, अजयचे फॉलोअर्सही कमी होऊ लागले. त्यामुळे यामागे कुठली परकीय यंत्रणा कार्यरत तर नाही ना, असा प्रश्न आपसूकच उपस्तित होतो. मूळचे चिनी अ‍ॅप असलेल्या या टिकटॉकला चिनी रणनीतीचा दर्प नसेल हे कशावरून? असाही प्रश्न उपस्थित राहतो. टिकटॉकने सुरुवातीपासूनच राजकीय विषयांपासून फारकत घेतलेली दिसते. कुठल्याही राजकीय पोस्ट्स किंवा अन्य व्हिडिओेला ‘प्रमोट’ न करण्याचा निर्णय टिकटॉकने घेतला आहे. मात्र, ज्यावेळी भारतात ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू झाला, तेव्हापासूनच अशाप्रकारे व्हिडिओजवर हळूहळू बंधने येऊ लागली. भारतातील परिस्थितीनुसार या डिजिटल मंचावर विदेशी अंकुश ठेवला तर जात नाही ना, अशीही शंकेची पाल चुकचुकते. तसेच हिंदू-मुस्लीम ऐक्य या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नकोसे झाले की काय? तशी रणनीती मुद्दाम तर ठरवली जात नाही ना? असाही संशय घेण्यास वाव आहे.


अजय बर्मन याने सुरुवातीपासून हिंदू-मुस्लीम ऐक्य सांगणारा १५ सेकंदाचा व्हिडिओे तयार केला. काही क्षणात या व्हिडिओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. अजय हा एका रात्रीत टिकटॉक स्टार बनला. ९ लाख १२ हजार फॉलोअर्स आणि ३७ दशलक्ष लाईक्स मिळवणारा हा टिकटॉक स्टार सध्या मात्र चिंतेत आहे. अजयच्या अकाऊंटला ‘शॅडो ब्लॉक’ करण्याचे नेमके कारण काय, हे अद्याप त्यालाही कळू शकलेले नाही. आपल्या व्हिडिओेतून तो हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देतो. व्हिडिओे तयार करताना हिंदू आणि मुस्लीम, अशा दोन्ही वेशभूषा परिधान करतो. त्याच्या व्हिडिओला जगभरातून प्रतिसाद मिळू लागला होता. अजय हा मूळचा भोपाळचा. गेल्या चार महिन्यांपासून त्याच्या व्हिडिओजना प्रोत्साहन मिळणे एकाएकी बंद झाल्याचा आरोप अजयने केला आहे. त्याचे २५ हजार फॉलोअर्सही कमी झाले आहेत. टिकटॉकने हिंसेला प्रवृत्त करणारे व्हिडिओ ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्याचा संबंध अजयने तयार केलेल्या व्हिडिओशी लावला जात असल्याचा हा परिणाम असल्याचे अजय सांगतो. मात्र, याला जबाबदार कोण, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे. धार्मिक किंवा राजकीय हेतूने प्रेरित होऊन असा प्रकार केला जात नाही ना, असा संशय युझर्सना कायम राहतो. आम्ही असा कुठलाही व्हिडिओे शॅडो ब्लॉक करत नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. मात्र, असे असले तरीही भारताच्या विविधतेतून एकतेचा संदेश देणार्‍या व्हिडिओंवर बंधने आणण्यामागचा हेतू कोणता हे अनाकलनीय आहे.


‘द गार्डियन’ या वृत्तपत्राच्या दाव्यानुसार डोनाल्ड ट्रम्प आणि चिनी साम्यवादाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या व्हिडिओेजला बाद ठरवणारी यंत्रणा टिकटॉक राबवत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. भारतात तरी टिकटॉकने सावध पवित्रा घेतलेला दिसतो. हिंसक, भडकाऊ व्हिडिओजना कात्री लावत, पोर्नोग्राफी, जमावाचा हिंसाचार अशा घटनांमुळे सतर्कता बाळगण्यात आली आहे. मात्र, अशा घटनांमुळे विविधतेतून एकतेने नटलेला भारत चिनी टिकटॉकला नकोसा झाला का, असा प्रश्नही अजय बर्मनच्या प्रकरणावरून पडतो.
Powered By Sangraha 9.0