प्रपंच करावा नेटका...

    दिनांक  12-Feb-2020 21:20:25
samarth ramdas_1 &nb
प्रपंच परमार्थाचे चाक आज उलट्या दिशेने फिरून प्रपंचाला विलक्षण महत्त्व आले आहे. त्यातून परमार्थाची अवहेलना सुरू झाली आहे. परमार्थ विचार अनावश्यक झाले असून त्यांच्या हद्दपारीची भाषा लोक करीत आहेत. याचा समन्वय साधायचा तर पुन्हा दासबोधातील विचारांकडे वळावे लागेल.


मानवी जीवन तसे पाहिले तर अथांग आहे. मनुष्य बुद्धिजीवी, भावनाप्रधान व कल्पनाप्रिय असल्याने प्रत्येक क्षणी तो कल्पनाविलास रचत असतो. त्याची भावनात्मक गुंतवणूक अफाट असल्याने जीवन अथांग आहे. जीवन समजून घेऊन आपला पारमार्थिक उद्धार कसा करून घ्यायचा, हे माणसाला नीट समजत नाही. पारमार्थिक विचार बाजूला ठेवला तरी प्रपंचातही अनेक समस्या असतात. प्रपंचात जीवन ‘यशस्वी’ कसे करायचे हा प्रश्न आहेच. ‘यशस्वी जीवन’ म्हणजे काय, याची नेमकी जाण लोकांना नसते. अशा वेळी ‘यशस्वी जीवन’ कसे असते, त्यासाठी काय केले पाहिजे, हे समजण्यासाठी शहाण्या माणसाचे मार्गदर्शन आवश्यक असते. त्यातून आपल्या विचारांना योग्य ती दिशा मिळून माणूस प्रपंच व परमार्थात यशस्वीपणे सुखी-समाधानी जीवन जगतो. परमार्थात अशा मार्गदर्शक, शहाण्या व ज्ञानी पुरुषाला ‘गुरू’ म्हणतात. गुरूवर पूर्ण विश्वास टाकावा, असे परमार्थात सांगितले आहे. परंतु, ‘परमार्थ’ हा असा प्रांत आहे की, त्यात अनेकजण लुडबूड करतात. त्यामुळे खरा पारमार्थिक गुरू कोण व दांभिक कोण, हे चटकन ओळखता येत नाही. मग सामान्य माणसाने काय करावे? आजवर अनेक संत-महात्मे होऊन गेले. त्यांचा प्रत्यक्ष सहवास मिळणे आज अशक्य आहे. तथापि, या संतांनी पुढील लोकांसाठी ग्रंथसंपदा निर्माण करून ठेवली आहे. त्या ग्रंथांतील विचार-उपदेश हाच त्यांचा सहवास समजावा. संत त्यांच्या ग्रंथांतून आपल्याला भेटत असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही. समर्थांचा ‘दासबोध’ ग्रंथ हा त्यापैकीच एक आहे. आजकाल अनेक जण समर्थ वाङ्मय वाचत आहेत. विशेषत: आजची तरुण पिढी समर्थ वाङ्मय समजून घेऊ लागली आहे व त्यावर विचार करू लागली आहे, हे स्वागतार्ह आहे. दासबोध ग्रंथ हा गुरु-शिष्यांचा संवाद आहे हे ग्रंथारंभी समर्थांनी स्पष्ट केले आहे.ग्रंथा नाम दासबोध।
गुरुशिष्यांचा संवाद।
येथ बोलिला विशद ।
भक्तिमार्ग ॥(१.१.२)


पुढे निवेदनाचा ओघ वाढल्याने दासबोधात एक विषय एका ठिकाणी आढळत नाही. कदाचित मधून मधून शिष्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना नवीन विषय येतात व मूळ विचाराचे निवेदन मागे पडते. त्यामुळे तो विषय पुढील काही समासात पुन्हा येतो. त्यामुळे एक विषय दासबोधातून अभ्यासायचा, तर अनेक समासांतून त्याचे शोधन करावे लागते. काही विद्वान अभ्यासक त्यामुळे म्हणतात की, दासबोधाच्या रचनेत विस्कळीतपणा आहे. तथापि समर्थकालीन असुरक्षितता, धावपळ, ग्रंथनिर्मितीसाठी लागणार्‍या स्वास्थ्याचा अभाव या सार्‍याचा विचार करता, दासबोध रचनेतील विस्कळीतपणा गृहीत धरावा लागतो. आपल्याला हवा तो विचार शोधावा लागतो. दासबोधातून अनेक विषय चर्चिले असले, तरी दासबोध ग्रंथातून मुख्य शिकायचे ते म्हणजे प्रपंच व परमार्थ यातील विवेक! समर्थांच्या पूर्वी सुमारे ३०० वर्षे समाजमनावर संन्यस्त निवृत्तीवादाचा व एकांगी भक्तिपंथाचा पगडा होता. निवृत्तीमार्गाच्या प्रतिपादनाचे वर्म नीट न समजल्याने समाजमनात प्रपंच पराङ्मुखता निर्माण झाली. तसेच एकांगी भक्तिमार्गातून प्रपंचाची अवहेलना होऊन प्रपंचाविषयी उदासीनता पसरली. या उदासीन वृत्तीने राष्ट्रकल्पनेचा लोप होऊन राष्ट्रियत्व हरवत गेले. ज्या समाजातील राष्ट्रभावना लोप पावते, तो समाज सहजी पारतंत्र्यात जातो. या संदर्भात राजवाडे म्हणतात,“....जीवनमुक्त संन्यस्त व विरक्त यांनी प्रपंच सोडलेलाच असतो. तेव्हा त्यांची काही हानी व्हायची राहिलेली नसते. पण, ज्यांनी प्रपंच सोडला नाही, त्यांची मात्र या (निवृत्तीवादी) तत्त्वज्ञानाने पुरती फजिती होते. व्यक्तींचा समुदाय, समाज किंवा राष्ट्र यांच्या प्रपंचाला व परमार्थ मार्गाला हे तत्त्वज्ञान अत्यंत घातक असते. समाज किंवा राष्ट्र यांना समाजाचा किंवा राष्ट्राचा तिरस्कार करण्यास शिकवणे म्हणजे समाजाला किंवा राष्ट्राला नाशाच्या पंथास लावणे आहे....” (ऐतिहासिक प्रस्तावना). मध्यंतरीच्या काळात संतांनी प्रतिपादलेल्या भक्तिमार्गाने लोकांचा असा समज झाला की, परमार्थ करायचा, मुक्ती साधायची, तर त्यासाठी प्रपंच सोडला पाहिजे. समर्थांनी तीर्थाटनाच्या काळात हिंदू संस्कृतीच्या या अशा अवनतीचा अभ्यास केला. तेव्हा स्वामींच्या लक्षात आले की, आता या समाजाला प्रथम प्रपंचविज्ञान सांगण्याची गरज आहे. तत्पूर्वी सर्व संतांनी परमार्थासाठी भक्तिमार्गाचा प्रसार केला व त्याद्वारा संस्कृतीरक्षणाचे कार्य केले. त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवले की, भक्तिमार्गाने गेल्यास मन प्रसन्न होऊन परमेश्वराचे दर्शन घडते. तेच माणसाचे अंतिम ध्येय आहे. समर्थही भक्तिमार्गी संत आहेत. पण, परमार्थ अथवा भक्तिपंथ सुरक्षित व्हावा असे वाटत असेल तर त्यासाठी प्रपंचविज्ञानाला तितकेच महत्त्व द्यावे लागेल. हे सर्वप्रथम समर्थांनी जाणले. त्यामुळे समर्थ मुळात भक्तिमार्गी असूनही इतर संतांहून वेगळे वाटतात. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,


आधी प्रपंच करावा नेटका।
मग घ्यावे परमार्थ विवेका।
येथे आळस करू नका।
विवेकी हो॥(१२.१.१)


येथे रामदासांनी लोकांच्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवून त्यांना ‘विवेकी हो’ असे संबोधले आहे. पुढे लगेच ‘विवेकी’ कोणाला म्हणावे तेही सांगून टाकले. ‘प्रपंच परमार्थ चालवाल। तरी तुम्ही विवेकी।’ स्वामी पुढे सांगतात, तुम्ही म्हणाल, प्रपंच सोडून आम्ही परमार्थ करू, तर ते शक्य होणार नाही. त्याने तुम्ही दुःखीकष्टी व्हाल. प्रपंच टाकून दिला तर धड पोटाला खायला अन्न मिळणार नाही. मग अशा करंट्याला परमार्थ कसा काय साधणार? तसेच तुम्ही परमार्थ टाकून दिला व फक्त प्रपंचच करीत राहिलात, तर जीवाला अनेक यातना सोसाव्या लागतील. म्हणून शहाणपण याच्यातच आही की, प्रपंच व परमार्थ हे दोन्ही सांभाळले पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ एकसमयावच्छेदे करून सांभाळाल तर तुम्ही खरे विवेकी! त्यानेच तुम्ही सुखी व्हाल. दूरदृष्टी असणार्‍या लोकांकडून हे शहाणपण शिकता येते.दासबोधात हे शहाणपण सांगितले आहे. दासबोधातील समास ११.३ मध्ये प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही अंगांचा समतोल कसा साधायचा आणि त्याने आपले जीवन कसे सुखी व सुंदर करायचे हे सांगितले आहे. समर्थांच्या काळी परमार्थ विचार एकांशी झाला होता व प्रपंचाला क्षुद्र समजले जात होते. समर्थांनी दासबोधातून प्रपंच विज्ञानाची महती सांगून शिवकार्यासाठी वातावरण तयार केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वपराक्रमाने व अथक प्रयत्नातून समाजाला म्लेंच्छांच्या पारतंत्र्यातून बाहेर काढून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत केला. समर्थांनी आपल्या ग्रंथांद्वारा त्याला तात्त्विक अधिष्ठान प्राप्त करून दिले व हिंदू संस्कृतीला विनाशापासून वाचवले. प्रपंच परमार्थाचे चाक आज उलट्या दिशेने फिरून प्रपंचाला विलक्षण महत्त्व आले आहे. त्यातून परमार्थाची अवहेलना सुरू झाली आहे. परमार्थ विचार अनावश्यक झाले असून त्यांच्या हद्दपारीची भाषा लोक करीत आहेत. याचा समन्वय साधायचा तर पुन्हा दासबोधातील विचारांकडे वळावे लागेल. समर्थांनी सांगितले आहे की,


परमार्थ सांडून प्रपंच करिसी ।
तरी तू यमयातना भोगिसी ॥


केवळ प्रपंचाच्या नादी लागल्याने भोगाव्या लागणार्‍या यातना व त्यातून सुटण्याचा मार्ग पुढील लेखात पाहू.- सुरेश जाखडी