आम्ही जनादेशाचा सन्मान करतो : जगतप्रकाश नड्डा

11 Feb 2020 18:33:07


 J P Nadda_1  H



नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात आम आदमी पक्ष ६३ जागांसह पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत आला आहे. भारतीय जनता पक्षाला आठ जागांवर समाधाना मानावे लागले, तर काँग्रेसला गतवेळप्रमाणेच यावेळीदेखील भोपळा मिळाला आहे. दिल्लीच्या जनतेद्वारे देण्यात आलेल्या जनादेशाचा आम्ही सन्मान करतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी व्यक्त केली. भाजप आता रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असून विकासाची संबंधित प्रत्येक प्रश्नाकडे लक्ष दिले जाईल. निवडणुकीत अथक परिश्रम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आम आदमी पक्षाचे सरकार दिल्लीच्या विकासासाठी कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त करतो.



मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता देशात विकासाचे राजकारण चालेल, अशी प्रतिक्रिया निकालानंतर व्यक्त केली. दिल्ली विधानसभेची यंदाची निवडणूक अतिशय लक्षवेधी ठरली होती. गत निवडणुकीत ७० पैकी तब्बल ६७ जागांवर विजय मिळविणाऱ्या आप पुढे सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान होते. तर दिल्लीची सत्ता काबिज करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली होती. सुमारे दीड महिना चाललेल्या प्रचारात स्थानिक ते राष्ट्रीय अशा सर्व प्रकारचे मुद्दे मांडण्यात आले होते.




 

निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली. त्यावेळी सुरुवातीपासूनच आम आदमी पक्षाची वाटताल विजयाकडे होत होती. काही काळ भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली असली तरी त्यानंतर पुन्हा आपकडे विजयाचे पारडे झुकले. अखेर ७० जागांच्या दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाला ६३ जागा, तर भारतीय जनता पक्षाला ७ जागांवर विजय मिळाला. गतवेळपेक्षा आपच्या जागा चार ने कमी झाल्या, तर भाजपच्या जागा चार ने वाढले. विशेष म्हणजे गेल्यावेळी भोपळाही न फोडता आलेल्या काँग्रेसने यंदाही ती परंपरा कायम राखली आहे.



हा दिल्लीकरांचा विजय – अरविंद केजरीवाल


मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना हा दिल्लीकर जनतेचा विजय असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, देशात आता विकासावर चालणारे राजकारण सुरू झाले आहे, हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले आहे. शिक्षण, आरोग्य, २४ तास पाणी, वीज, रस्ते आदी मुद्द्यांवरच आता निवडणुका जिंकता येतील, हे स्पष्ट झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0