‘अच्छा छाब’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2020   
Total Views |



accha chab _1  


‘अच्छा छाब’ याच नावाने युट्यूबवर मोरोक्कोच्या जनमानसाच्या व्यथा कथन करणारा एक व्हिडिओ गेल्या वर्षीच्या अखेरीसच तुफान व्हायरल झाला.


लेखाच्या शीर्षकातील दोन्ही शब्दांचा एकत्रित अर्थ पटकन समजणारा नसला तरी ‘अच्छा’ या शब्दावरून हा शुभसंदेश वाटू शकतो आणि तो तसा आहेसुद्धा. ‘अच्छा छाब’ या शब्दाचा मोरोक्कोच्या अरबी भाषेत अर्थ होतो ‘(या देशातील) जनतेला दीर्घायुष्य लाभू दे!’ आता या संदेशात तुम्हाला-आम्हाला काहीएक गैर वाटत नसले तरी मोरोक्को देशाच्या पोलिसांना, राजेशाहीला मात्र हा घोर अवमान वाटला. अवमान मोरोक्कोचे राजे मोहम्म्द सहावा यांचा...‘जनतेला दीर्घायुष्य लाभू दे,’ या शुभचिंतनात कसला आला राजाचा, पोलिसांचा अपमान-अवमान, असे आपल्याला वाटणे अगदी स्वाभाविक. पण, मोरोक्कोमध्ये ‘दीर्घायुष्य फक्त राजाला लाभू देअशीच इच्छा प्रजेच्या मुखातून प्रकट झाली पाहिजे. यावरून कल्पना करा, राजाच्या विरोधात, हुकूमशाही व्यवस्था आणि राजेशाहीच्या विरोधात ‘ब्र’ जरी काढला तरी रवानगी थेट तुरुंगात ! ‘अच्छा छाब’ याच नावाने युट्यूबवर मोरोक्कोच्या जनमानसाच्या व्यथा कथन करणारा एक व्हिडिओ गेल्या वर्षीच्या अखेरीसच तुफान व्हायरल झाला.



तीन मोरोक्कन तरुणांनी रॅप संगीताच्या माध्यमातून देशातील समस्यांबरोबर राजेशाहीवर कडक ताशेरे ओढले
. मग काय, या तिन्ही रॅपर्सना पोलिसांचा, राजेशाहीचा अवमान म्हणून तुरुंगातच ‘रॅप’ केले. त्यानंतरही युट्यूबवरील व्यवस्थेविरोधी या गाण्याची ‘क्रेझ’ मात्र कमी झाली नाहीच, उलट मोरोक्कोच्या तरुणांनी या गाण्याला उचलून धरले. फेसबुकवर हे गाणे शेअर करणार्‍यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. कोणाला १००० दिरहमचा दंड ठोठावला, तर कोणाला तुरुंगात डांबले. पण, मोरोक्कन तरुणाईच्या आक्रोशाचा हा बुलंद आवाज काही केल्या पोलिसांना दाबता येईना. मोरोक्कोच्या कानाकोपर्‍यातून राजेशाहीच्या मनमानी कारभाराला त्रासलेली प्रजा रस्त्यावर उतरली अन् अटक केलेल्या या तीन तरुणांच्या सुटकेची मागणी जोर धरू लागली. ‘अच्छा छाब’च्या रॅप संगीतातील बोलांवर कटाक्ष टाकला की, मोरोक्कन तरुणाईच्या आशा-आकांक्षा राजेशाहीकडून कशा पायदळी तुडवल्या गेल्या असतील, त्याची बर्‍यापैकी कल्पना येते. या गीतात हे रॅपर म्हणतात, “या देशाचे दमन करून कोण अधिकाधिक श्रीमंत होऊ पाहतंय? आम्हाला या समस्यांच्या गर्तेत कोणी ढकललं? तुम्ही (राजेशाहीने) आमची प्रतिष्ठा धुळीस मिळवली. जर या देशात आम्ही ४० दशलक्ष लोक असू, तर त्यापैकी ३० दशलक्ष तुमच्यासोबत आहेत, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्यायच उरलेला नाही. आमच्या आयुष्याचे ध्येयच नाही. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही आमचा केवळ विश्वासघातच केला. जेव्हा तुम्ही आजारी पडता, तेव्हा देशाबाहेर उपचारांसाठी पळता. ‘माझ्या प्रिय लोकहो’ असे तुम्ही त्याच जनतेला उद्देशून संबोधता, जे अन्याय, अत्याचार आणि असमानतेचे भयंकर वार झेलत आहेत.”



या रॅप संगीताच्या माध्यमातून युट्यूबवर राजेशाहीविरोधात आवाज उठवणार्‍या हजारो युट्यूबर्सना सरकारने राजाचा
, पोलिसांचा, न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटले दाखल करून जेरबंद केले. आधी प्रसिद्धीच्या यशोशिखरावर असलेले मोरोक्कोचे राजे आज जनतेच्या मनात त्यांच्या कुकृत्यांमुळे सलत आहेत. बेरोजगारी, गरिबी, शिक्षणाचा खालावलेला दर्जा, मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आणि सरकारी भ्रष्टाचारामुळे मोरोक्कन तरुणांमध्ये राजेशाहीविरोधात रोष अगदी ठासून भरलेला दिसतो. या युट्युबर्सच्या गीताने या बुजलेल्या रोषाला वाट मोकळी करून दिली आणि मोरोक्कोमधील धुसफूस, एकाधिकारशाहीचा फसवा चेहरा जगासमोर आला.



एका अहवालानुसार
, तर मोरोक्कोची दोन तृतीयांश म्हणजे जवळपास ३५ दशलक्ष लोकसंख्या ही तरुणवर्गात मोडते. त्यापैकीही १५ ते २४ वयोगटातील २५ टक्के तरुणांनी तर शिक्षण मध्येच सोडले असून त्यांच्या हाताला नोकरी नाही की अंगी कुठले कौशल्यही नाही. अशा परिस्थितीत मोरोक्कोची वाटचाल एका अराजकाकडेच सुरू असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सीरिया, लिबिया, इजिप्तप्रमाणे ‘अरब स्प्रिंग’चे वारे आता उत्तर आफ्रिकेतील या मोरोक्कोच्या वेशीवर घोंगावत आहेत. तेव्हा, मोरोक्कोच्या रत्नखचित महाराजांनी आणि जनतेच्या करानेच भरलेल्या तिजोरीवर डल्ला मारणार्‍या सरकारने या तरुणाईचा हुंकार वेळीच ओळखावा ; अन्यथा या जनआक्रोशाच्या वादळात मोरोक्कोची राजगादी वाळवंटात रेतीसारखी उडल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की !

@@AUTHORINFO_V1@@