यंदा कोकणात शिमग्याबरोबर 'खवलोत्सव'!

    दिनांक  10-Feb-2020 11:25:25
tiger_1  H x W:


कोकणातील सुरू असलेल्या 'खवले मांजर संवर्धन मोहिमे'च्या परिणामांची प्रचिती करुन देणारा हा लेख...

 
चिपळूण (भाऊ काटदरे) - खवले मांजर हे मोठ्या प्रमाणात वाळवी, मुंग्या, डोंगळे फस्त करून शेतकरी आणि सामान्य जनतेला एका अर्थी मदत करत असतो. हा प्राणी एक प्रकारे नैसर्गिक ’पेस्ट कंट्रोल’चे काम करतो. ते ही अगदी विनामूल्य. निसर्ग साखळीतील हा महत्त्वाचा घटक आज धोक्यात आहे. मोठ्या प्रमाणात चोरटी शिकार, बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि त्यातून मिळणाऱ्या पैश्यांमुळे हा प्राणी जगात तसेच कोकणात संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत कोकणात एक गाव जे गेली तीन वर्षे खवले मांजराचे संरक्षण करत आहे. विशेष म्हणजे या गावातील ग्रामस्थ यंदा ’खवलोत्सव’ साजरा करणार आहेत.
 
 
 
 
 
 
 
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामधील डुगवे गावात लोक खवले मांजराच्या रक्षणासाठी पुढे आले आहेत. याबाबत डुगवेचे ग्रामस्थ म्हणतात, खवले मांजर वाळवी खाऊन माणसाची सेवा करतो. त्यामुळे तो आम्हाला देवासमान आहे. आम्ही त्याला वंदन करतो. निसर्गामध्येच आपले देव आहेत. त्याचे आमच्या गावात वास्तव्य आहे. आमची ग्रामदेवता ’वाघजाई’चे त्याला आशीर्वाद असून देवीच त्याचे रक्षण करत आहे. म्हणूनच आम्ही ’खवलोत्सवा’चा आनंद साजरा करणार आहोत. आम्ही आमच्या गावात त्याचे संरक्षण, संवर्धन करत आहोतच. परंतु, जगभर त्याचे संरक्षण व्हावे म्हणून प्रार्थना करणार आहोत. १५ फेब्रुवारी या ’जागतिक खवले मांजर दिनी’ डुगवे गावचे ग्रामस्थ खवले मांजराच्या प्रतिकृतीची पूजा करणार आहेत. या प्रतिकृतीला वाजत गाजत पालखीत घालून नाचवणार, आनंद साजरा करणार आहेत. हे गावकरी खवले मांजरासाठी होळी/शिमगा साजरा करणार असून ‘खवल्याच्या नावाने चांगभलं’चा जयघोष करणार आहेत.
 
 

tiger_1  H x W: 
 
जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच गाव आहे जेथे खवले मांजराला देवाचे स्थान देऊन समस्त ग्रामस्थ त्याच्या संरक्षणासाठी एकवटले आहेत. ’सह्याद्री निसर्ग मित्र’ संस्था गेली चार वर्षे कोकणात खवले मांजर संरक्षण संवर्धन प्रकल्प राबवत आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती, प्रत्यक्ष खवले मांजराचा अभ्यास, संशोधन व प्रत्यक्ष संरक्षण असे काम चालू आहे. वन विभागाचा मोलाचा सहभाग व मार्गदर्शन या कामाला लाभत आहे. आज जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात खवले मांजराची शिकार होते आहे. त्याच्या खवल्यांना आंतराष्ट्रीय पातळीवर प्रचंड मागणी आहे. मुख्यत: हे खवले चिनी औषधात वापरले जातात. यामुळे आंतराष्ट्रीय टोळ्या या बेकायदेशीर कृत्यात सहभागी झाल्या आहेत. कोकणसुद्धा त्याला अपवाद नसून अनेक ठिकाणी छापेमारीत पकडलेली खवले मांजरे व त्याचे खवले आढळली आहेत. खवले मांजर हे निसर्ग साखळीतील एक महत्त्वाचा एकमात्र खवलेधारी प्राणी आहे. त्याचे संरक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ’जागतिक खवले मांजर दिना’च्या दिवशी १५ फेब्रुवारी रोजी डुगवे ग्रामस्थ सकाळी १०.३० वाजता ग्रामदेवता मंदिरात जमणार आहेत. यामध्ये पुरुष, महिला, विद्यार्थी या सर्वांचा समावेश असणार आहे. यावेळी सर्वजण नटून थटून उपस्थित राहतील. खवले मांजराची प्रतिकृती जंगलातून मंदिरात आणण्यात येईल. तेथे विधीपूर्वक त्याची पूजा करण्यात येईल. परंपरेप्रमाणे खवले मांजराच्या जागतिक पातळीवर संरक्षण, संवर्धनासाठी गार्हाणे, आरज घालण्यात येईल. मग प्रतिकृतीला पालखीत घालून सहाणेवर गावकरी पालखी नाचवतील. त्यानंतर पालखी ग्रामस्थांच्या घरा-घरात जाईल व तेथे लोक त्याची पूजा करतील. पुन्हा पालखी देवळात येईल, नंतर महाप्रसाद होईल व सोहळा संपन्न होईल.
 
 
जगात खवले मांजराच्या आठ प्रजाती आढळतात. त्यातील चार प्रजाती आफ्रिकेत, तर चार आशिया खंडात आढळतात. भारतात चिनी खवले मांजर व भारतीय खवले मांजर या दोन प्रजातींचा अधिवास आहे. पूर्वोत्तर व हिमालय वगळता सर्वत्र भारतीय खवले मांजर आढळते. भारतीय खवले मांजर सर्व प्रकारच्या अधिवासामध्ये आढळते. सुमारे पाच फूट लांब संपूर्ण शरीरावर खवले असलेल्या या प्राण्याला दात नसतात. पण त्याच्या सुमारे एक फूट लांबीच्या चिकट जिभेच्या साहाय्याने तो हजारोंच्या संख्येने वाळवी, मुंग्या खातो. धोका वाटताच अंगाचे वेटोळे करतो ते कोणालाही सोडवता येत नाही. त्याचे खवले खूप मजबूत असतात. त्यामुळे त्याला निसर्गात फार कमी शत्रू आहेत. माणूस त्यांच्या बिळांचा शोध घेऊन ती बिळे खणून त्यातून खवले मांजर काढून त्याला उकळत्या पाण्यात घालून मारतात. ‘आययुसीएन‘च्या लाल यादीत भारतीय खवले मांजर धोक्यात असलेला प्राणी आहे. ‘भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२’ अन्वये खवले मांजराला प्रथम श्रेणीत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम होत असून त्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मी करतो.
(लेखक ज्येष्ठ वन्यजीव संशोधक, चिपळूणच्या ’सह्याद्री निसर्ग मित्र संस्थे’चे संस्थापक आहेत. )