कर्करुग्णांचा सेवेकरी

10 Feb 2020 19:04:13
mansa_1  H x W:



कोलकात्याचे पार्थ रॉय यांनी कर्करुग्णांच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. कर्करुग्णांच्या आजारापेक्षाही परिस्थितीमुळे ते हतबल असतात, त्या परिस्थितीला सकारात्मक करण्याचे काम पार्थ करतात.


“डॉ. बळीराम हेडगेवार यांनी जेव्हा रा. स्व. संघाची स्थापना केली, तेव्हा त्यांच्यासमोर संकल्प होता. कार्याची सुनिश्चिती होती. कारण, कार्य दैवी होते, बंधुत्वाचे होते, समरसतेचे होते. थोडक्यात, मानवतेचे होते. त्या कार्यात यश मिळेल की नाही, याचा विचार डॉ. हेडगेवार यांनी केला नाही. ते कार्य करत राहिले. एक संघ स्वयंसेवक म्हणून डॉक्टरांचे विचार माझ्या मनावर कोरले गेले,” पार्थ रॉय सांगत होते. मुंबईत तीन वर्षांपूर्वी आलेले पार्थ रॉय. 

पार्थ रॉय हे मूळ कोलकात्याचे. त्यांचे वडील विमलचंद्र हे शाळेत मुख्याध्यापक, तर आई गृहिणी. घरचे वातावरण सालस, सुसंस्कृत. कोलकात्यातले ८० चे दशक म्हणजे कम्युनिस्टांच्या हिंस्र धुमाकुळीचा काळ. पार्थ जेथे राहत त्याच्या बाजूच्या मैदानात संघाची शाखा लागायची. पार्थ लहानपणी फुटबॉल खेळायचे. त्याचवेळी मैदानात संघ शाखेत दंड खेळले जायचे. पार्थला शाखेचे कुतूहल वाटायचे. तेही शाखेत जाऊ लागले. प्रार्थना, खेळ, विचार यातून संघशाखेचे संस्कार पार्थ यांच्यावर होत होते. अशीच एक दिवशी शाखा सुरू होती. इतक्यात २०-२५ जणांचे टोळके शाखेत आले. त्यांनी संघ शिक्षकांना निर्दयपणे खेचून मारहाण सुरू केली. मुलांना उठाबशा काढायला लावल्या. मारहाण केली. शिक्षकाला मारझोड करत मारेकरी म्हणत होते, “इथे फक्त कम्युनिझमच चालेल समजले.” शिक्षक रक्तबंबाळ झाले, ते मारेकरी विकट हास्यविलाप करत निघून गेले. मात्र, या घटनेनंतर शाखेतल्या मुलांच्या मनात शाखेबद्दलचे प्रेम निर्माण झाले ती कायमचे. त्यांची आई छबी त्यांना म्हणाल्या, “पार्थ, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे चांगलेच आहे. हे माणुसकीचे लक्षण आहे. तुझी हिंमत, ऊर्जा तू रागाने प्रतिकार करण्यासाठी नको खर्ची करू, तर त्या ऊर्जेचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी कर.” पार्थ यांच्यावर आईचा खूप पगडा होता. आईलाही समाजात खूप आदर होता. कारण, त्या अडल्यानडल्याच्या मदतीला धावून जात. असे कितीवेळा व्हायचे की, आई आता जेवणाचे ताट तयार करणार आणि दारात कोणी भिक्षेकरी उभा राहायचा. त्यावेळी छबी ते ताट नेऊन भिक्षेकरीला द्यायच्या. स्वत: उपाशी राहायच्या. विचारल्यावर त्या म्हणायच्या माझ्यापेक्षा त्याला जास्त अन्नाची गरज होती. हे सगळे पाहत पार्थ मोठे होत होते. संघाची शाखा तर सुरू होतीच.


दिवस जात होते आणि आई आजारी पडू लागली. निदान झाले की, तिला कर्करोग झाला. तिला मुंबईच्या टाटा रुग्णालयात न्यावे लागले. नवे शहर, नवे वातावरण. टाटा रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेले ते रुग्ण, रुग्णालय, रुग्णालयाच्या बाजूचा परिसर रुग्णांनी, रुग्णांच्या नातेवाईकांनी खचून भरलेला. त्यांची ती वाताहत. देशभराच्या कानाकोपर्‍यातून आलेले ते रुग्ण. सर्वच बाबतीत असाहाय्य, त्यात भाषेचा अडसर, भौगोलिक परिस्थितीही वेगळीच. कर्करोगाने त्रस्त असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या सगळ्या वातावरणाने आणखीनच त्रासलेले. तीच परिस्थिती पार्थ आणि त्यांच्या आईची झाली. आईचेही उपचार ‘टाटा’मध्ये सुरू झाले. पण एकवेळ अशी आली की, त्यांची तब्येत खूपच ढासळली. उपचारांनी काहीच फरक पडत नव्हता. हतबल होऊन रॉय कुटुंब पुन्हा कोलकत्याला परतले. थोड्या कालावधीत पार्थ यांच्या आईचा कर्करोगाने त्यांचा बळी घेतला. त्यानंतर एका वर्षात पार्थ यांचे वडील विमलचंद्र यांचाही मृत्यू झाला. पार्थ यांच्यावर आकाश कोसळले. कर्करोगाने एक हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त केले होते. पार्थ मनात कितीदा ठरवत की, आपल्या आईला उपचारासाठी माहितीअभावी जो त्रास झाला तो इतर कुणालाही होऊ नये यासाठी काहीतरी करायला हवे.



त्यातूनच कामानिमित्त तीन वर्षांपूर्वी ते मुंबईत आले. दैवगती म्हणायला हवी की त्यांना मुंबईत पहिल्यांदा भेटला तो एक प.बंगालहून आलेला कर्करुग्ण. त्याला मुंबईत राहण्याची व्यवस्था नव्हती, काही माहिती नव्हती. पार्थ यांनी त्याला आपल्यासोबत ठेवले. इतकेच नव्हे तर टाटा रुग्णालयात त्याच्यासोबत मदतीसाठी जाऊही लागले. तिथे येणार्‍या प्रत्येक कर्करुग्णांची असाहायत्ता, होणार्‍या पीडेमध्ये त्यांना आपल्या आईची आठवण येई. आता पार्थ दिवसातले कित्येक तास टाटा रुग्णालयात घालवू लागले. रुग्णांना माहिती देणे, उपचारासाठी आर्थिक मदत कुठून कशी मिळवावी, त्यासाठी कागदपत्रे कशी तयार करावी. स्वत:हून सांगू लागले. रुग्णालयामध्ये रुग्णांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयात स्वेच्छेने कार्य करू लागले. त्यामुळे कर्करोग आणि उपचार, मदत याविषयीची अद्ययावत माहिती त्यांना झाली. रुग्णालयात काही लोक मदतीच्या नावाखाली रुग्णांची दिशाभूल करतात रुग्णाची आर्थिक फसवणूक करतात हे सुद्धा पार्थ यांनी पाहिले. मरणाच्या दारात असलेल्या रुग्णांसोबतचे हे असे छलकपट पार्थ यांना सहनच झाले नाही. ते याबाबत लोकांमध्ये जागृती करू लागले. त्यामुळे पार्थ नि:स्वार्थीपणे कर्करुग्णांची सेवा करतो हे मुंबईतल्या अनेक स्वयंसेवी संस्थाना माहिती झाले. त्यामुळे पार्थने आर्थिक मदतीसाठी पाठवलेल्या रुग्णांना संस्था सहकार्य करू लागल्या.



पार्थ रुग्णांमध्ये उपचारासंबंधात जागृती, उपचाराच्या खर्चासाठी मदत आणि बाहेरून आलेल्या रुग्णांच्या निवास व्यवस्थेसाठी मदत करतात. त्यासाठी त्यांनी ‘छबी सहयोगी फाऊंडेशन’ संस्था’ काढली आहे. रुग्णांची राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी त्यांनी जुईनगर येथे एक इमारतच भाड्याने घेतली आहे. रुग्णांच्या निवासासाठी ही इमारत सुसज्ज करायची आहे. त्यासाठी पार्थ अहोरात्र कष्ट करत आहेत. समाजातील दानशूर लोकांना भेटणे, पैसे नव्हे तर रुग्णांना मदतीसाठी त्यांना प्रेरित करणे हे काम पार्थ करतात. हे काम खूप मोठे आहे. इथेही ते स्थानिक संघशाखेशी जोडले गेले आहेत. त्या माध्यमातूनही त्यांना कर्करुणांच्या मदतीसाठी सहकार्य मिळते आहे. पार्थ रॉय यांचे कार्य खरेच प्रशंसनीय आहे. कारण, आईची आठवण म्हणून त्यांनी आयुष्यात कर्करुग्णांची सेवा हे ध्येय ठेवले आणि ते ध्येय हेच त्यांच्या आयुष्याचे लक्ष आहे. पार्थ म्हणतात, हा कर्करूग्णांची सेवा हा जगन्नाथाचा रथ आहे. यात, सज्जनशक्तीचा सहभाग असायलाच हवा.
Powered By Sangraha 9.0