सुप्रजा (भाग-२६)

10 Feb 2020 21:44:09
supraja_1  H x





आहार-शरीराचे भरणपोषण करण्यासाठी, ऊर्जानिर्मितीसाठी, ताकद भरून काढण्यासाठी, झीज भरून नवीन पेशी निर्माण करण्यासाठी तसेच सुदृढ, सक्षम शरीर-मन आणि बुद्धीच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध आहारघटक शरीरात जाऊन त्यांचे पचन झाल्यावर वरील सर्व कार्ये करण्यात उपयोगी पडतात. यासाठी सकस, पौष्टिक व नियमित आहार घेणे गरजेचे आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांपैकी ‘अन्न’ हे पहिल्या क्रमांकावर आहे. यातूनच त्याचे महत्त्व सिद्ध होते.


हल्ली प्ले ग्रुप-नर्सरीपासूनच मूल शाळेत जाऊ लागते. म्हणजे दोन-अडीच वर्षाचे मूल झाले की, त्याची शाळेत रवानगी होते. काही शाळांमध्ये नर्सरीपासून प्रवेश सुरू होतात. मग शाळेच्या वेळापत्रकानुसार या लहानग्यांचे शारीरिक वेळापत्रक बसवावे लागते. वेळेत उठणे, वेळेत दूध पिणे, न्याहारी, शौचकर्म, अंघोळ करणे आणि गणवेश परिधान करून निघणे. पण हे ‘रुटिन’ काही वेळेस खूप कठीण जाते. काही मुले उशिरा उठतात किंवा उठल्या उठल्या शौच येत नाही. मग शाळेत जाताना डायपर बांधून पाठवले जाते. काही नर्सरी शाळांमधून, डे-केअर सेंटरमधून डायपर बांधणे अनिवार्य केले जाते.


डायपर बांधल्यामुळे मलमूत्र वेगांची संवेदना आली तरी ते मूल आहे तिथे आणि त्याच परिस्थितीत आपले नैसर्गिक आवेग उरकून घेते. कुणाला काही सांगत नाही. शौचाचा वास आला तरच कळते अन्यथा डायपरही तसेच राहते. म्हणजे खेळताना, जेवताना एकीकडे खेळणे, जेवणे सुरू आहे आणि दुसरीकडे मलमूत्र विसर्जन! हे चुकीचे आहे. मूल उभे राहू लागले, आधाराशिवाय चालू लागले की त्याला ‘टॉयलेट ट्रेनिंग’ देण्यास सुरुवात करावी. शौचकर्म एका विशिष्ट जागी, ‘टॉयलेट’मध्येच करणे शिकवावे. दर दीड-दोन तासांनी शूला घेऊन जाणे, तोंडाने शूऽऽ असा आवाज करून, पायावर पाणी घालून शू करायला लावावी. थंडीत, पावसाळ्यात शूचे प्रमाण जास्त असते आणि वारंवार जावे लागते. पण उन्हाळ्यात घामामुळे (घाम अधिक आणि शूचे प्रमाण कमी) शू कमी होते. तसेच मुलांना शौचाची संवेदना लागली की ते जे करत असतात, ते तसेच थांबतात. म्हणजे चालता-चालता शी होते असे जाणवले, तर ते जागीच उभे राहतात. जेवत असल्यास घास तसाच तोंडात धरून ठेवतात. म्हणजे, जी क्रिया सुरू असते (हालचाल/धावणे/गाणे/खाणे) ते अचानक थांबून स्तब्ध होतात आणि शौच झाले की पुन्हा धावपळ, खाणे इ. सुरू करतात. तेव्हा शौचाच्या वेळेस या लक्षणांकडे मोठ्या व्यक्तींनी लक्ष ठेवावे. मूल स्तब्ध झाल्यास, शौचास होते आहे का बघून शौचालयात नेऊन बसवावे. असे रोज, नियमित केल्याने शौच एका विशिष्ट ठिकाणी शौचालयात करण्याची सवय अंगवळणी पडते.


मध्यंतरी एक वृत्तपत्रात अशी बातमी वाचनात आली की, ज्यांना शौचकर्मावर नियंत्रण लवकर येते, त्या मुलांमध्ये डायपरचा वापर पूर्वीपासून नव्हता किंवा कमी होता. फक्त रात्री झोपताना मूल दीड वर्षाचे झाले की, हे ‘ट्रेनिंग’ सुरू करावे. दीड ते दोन वर्षांमध्ये ‘पॉटी ट्रेनिंग’ व्यवस्थित करता येते. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये तिसर्‍या वर्षापर्यंत हे ‘ट्रेनिंग’ द्यावे लागते. यामध्ये पालकांचा, शिक्षकांचा, घरातील इतर वडीलधारी व्यक्तींचा व पाळणाघरातील मावशींचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे. ‘ब्रेन डेव्हलपमेंट’मधील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्या मांसपेशींवर नियंत्रण मिळविणे हे ‘पॉटी ट्रेनिंग/ टॉयलेट ट्रेनिंग’मधून साध्य होते. ‘Gross Motor Development’ या प्रशिक्षणामुळे चांगले होते. मुलांच्या वाढीच्या टप्प्यातील हे एक अविभाज्य अंग आहे.

काही वेळेस या प्रशिक्षणाबरोबर आहारातही काही बदल करावे लागतात. उदा. रात्री जर ‘शू’ वारंवार होत असेल, तर रात्री ९ नंतर द्रवाहाराचे प्रमाण कमी ठेवावे. झोपी जाण्यापूर्वी ‘शू’ला एकदा घेऊन जावे तसेच मध्यरात्री पुन्हा एकदा ‘शू’ला घेऊन जावे. तसेच शौच करते वेळी जर जास्त कुंथावे लागत असल्यास आहारातून साजूक तुपाचा वापर निश्चित असावा. गरम भातावर तूप, पोळ्याला तूप लावून खावे. काळ्या मनुकांचे पाणी द्यावे. लगेच लॅक्टिव्ह वापरणे टाळावे. त्याची सवय लागू शकते. आहारातून स्निग्धांश घ्यावा. दुधातून तूप प्यायला द्यावे किंवा नेवैद्याच्या वाटीत पंचामृत तयार करून ते पिण्यास द्यावे (पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर असते. यात मध कमी आणि अन्य घटक अधिक घ्यावेत. जर सर्दी, पडसे, कफाचा त्रास असला, तर मधाचे प्रमाण तुपापेक्षा अधिक घ्यावे.)


एका संशोधनामधून असेही सामोरे आले आहे की, ज्यांच्यामध्ये शौचावर नियंत्रण लवकर येते, त्या मुलांमध्ये मोठेपणी निर्णय क्षमता उत्तम निर्माण होते. पण, ‘अति सर्वत्र वर्ज्येत।’म्हणजे वारंवार ‘शू’ला नेणे (आताच करून आल्यावर परत लगेच नेणे, संवेदना नसतानाही बळजबरीने शौचास नेणे इ.) हे चुकीचे आहे. या सवयीला आयुर्वेदामध्ये ‘वेगोदीरण’ असे म्हटले आहे. (म्हणजे ‘वेग’ संपूर्ण लागला नसतानाही त्याचे ‘उदीरण’ करणे, निष्कासन करणे) आणि या उलट संवेदना लागलेली असतानाही ते धरून ठेवणे याला ‘वेगधारण’ अशी संज्ञा दिलेली आहे. ‘वेगधारण’ आणि ‘वेगोदीरण’ या दोन्ही सवयी प्राकृत/नैसर्गिक नाहीत. याने पुढे जाऊन विविध आजार ओढावतात, असे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे. ‘वेगधारण’ आणि ‘उदीरण’ यात एकूण १३ विविध वेग/संवेदना सांगितल्या आहेत. शारीरिक संवेदना/वेग जाणवले की, त्यांना अडवू नये. (उदा : जांभई, उचकी, शिंक, वात सरणे इ.) आणि चांगल्या सवयींची सुरुवात लहानपणापासूनच करावी लागते. म्हणून ‘टॉयलेट ट्रेनिंग’ला खूप महत्त्व आहे. हा मुलांच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.


जर शौचास रोज होत नसले, खडे होत असतील तर फक्त जास्त पाणी प्यायला देऊन पुरेसे होत नाही. पाण्याने शौचास साफ होते, हा गैरसमज आहे. जसे भूक लागल्यावर आपण जेवतो, तसेच तहान लागल्यावरच पाणी प्यावे. तेही तहान भागेपर्यंतच! पाण्याचा अतिरेकी वापर टाळावा. याने पाचकाग्नी मंदावतो. पचनप्रक्रिया बिघडते आणि लहानपणीच पचनाच्या तक्रारी सुरू होतात म्हणजे कारण जरी क्षुल्लक असले, तरी त्याने शरीरात विभिन्न त्रास उद्भवू शकतात. अतिपाणी प्यायल्याने वारंवार सर्दी होणे, भूक न लागणे, जंत होणे, अंग सुजणे. अंथरुणात ‘शू’ होणे, अंगाला कंड येणे, उवा-लिखा होणे इ. त्रास होऊ शकतात, विशेषत: लहान मुलांमध्ये!


वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत शरीराचे विविध अंग अवयव बनत असतात. पचनक्रिया, उंची वाढणे, दात येणे, बुद्धी वाढणे, भाषा समृद्ध होणे, लिहिता येणे, वयात येणे इ. सर्व बदल या वयोमर्यादेतच होत असतात. त्यामुळे आहाराची जशी सवय लावू तसे शारीरिक घटक निर्माण होतात आणि मानसिक भावही तयार होतात. म्हणून आहारावर अधिक भर आयुर्वेदात दिला आहे. काय खावे, काय खाऊ नये हे तर सांगितलेच आहे, पण त्याचबरोबर कोणी खावे, कधी खावे आणि किती प्रमाणात खावे हेही सांगितले आहे. तेव्हा आरोग्यदायी जीवनाची प्रथम पायरी ही बाल्यावस्थेत खंबीरपणे जर रुजवली, तर संपूर्ण आयुष्य सुकर होऊन आरोग्यदायी होऊ शकते.
(क्रमश:)

- वैद्य कीर्ती देव
Powered By Sangraha 9.0