समुद्री गोगलगायींच्या दोन नव्या प्रजातींचा उलगडा; मुंबईतील प्रदूषित किनाऱ्यांवर वावर

    दिनांक  01-Feb-2020 11:53:58   
|
tiger_1  H x W:

 

 खडकाळ किनाऱ्यांवर अधिवास 

 
मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या किनारपट्टीवरून समुद्री गोगलगायीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात सागरी जीवशास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. या गोगलगायी 'क्रेटेना' पोटजातीमधील आहेत. 'क्रेटेना पोषित्राएन्सिस' आणि 'क्रेटेना पवारशिंदेओरम', असे नामकरण या दोन प्रजातींचे करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे यामधील 'क्रेटेना पवारशिंदेओरम' ही प्रजात मुंबईच्या खडकाळ किनाऱ्यांवर सामान्यपणे आढळून येते.
 
 

tiger_1  H x W: 
 
 
चकाकते रंग आणि शोभिंवत अशा समुद्री गोगलगायी सागरी परिसंस्थेमधील आकर्षक जीव आहेत. या जीवगटांमध्ये दोन नव्या प्रजातींची भर पडली आहे. गुजरात किनारपट्टीवरुन 'क्रेटेना पोषित्राएन्सिस' आणि महाराष्ट्राच्या किनारी क्षेत्रातून 'क्रेटेना पवारशिंदेओरम' या दोन नव्या प्रजातींचा उलगडा झाला आहे. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे संचालक आणि ज्येष्ठ सागरी जीवशास्त्रज्ञ डाॅ. दिपक आपटे आणि सागरी जीवशास्त्रज्ञ मोनिषा भारते, विनीसियस पादुला, गौरव शिंपी यांनी या प्रजातींचा शोध लावला आहे. 'झूटॅक्सा संसोधनपत्रिकेत गुरुवारी या संशोधनाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले. खडकाळ किनारे हे समुद्री गोगलगायींचे अधिवास क्षेत्र आहेत. नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी समुद्री शैवाळ, स्पॉज, कोरल आणि हायडॉइड यांचा बहरण्याचा कालावधी असल्याने त्यावर समद्री गोगलगाय उपजीविकेसाठी येतात. त्यामुळे हा काळ त्यांच्या निरीक्षणासाठी उत्तम असतो.
 
 

tiger_1  H x W: 
 
 
'क्रेटेना पोषित्राएन्सिस' ही प्रजात गुजरातमधील पोषित्रा, पोरबंदर, व्दारका, ओखा आणि वेरावळ किनारपट्टीदरम्यान असलेल्या खडकाळ किनाऱ्यांवर आढळते. या गोगलगायीचा आकार २५ मि.मी आहे. डाॅ. आपटे यांनी २०११ मध्ये पोषित्रा किनारपट्टीवरुन या गोगलगायीचे नमुने गोळा केले होते. 'क्रेटेना पवारशिंदेओरम' ही प्रजात महाराष्ट्रातील खडकाळ किनाऱ्यांवर सर्वसामान्यपणे आढळत असून २००९ मध्ये उरणमधून या प्रजातीचा नमुना संशोधनासाठी गोळा करण्यात आला होता. ही गोगलगाय ३० मि.मी. आकाराची आहे. मुंबईत ही गोगलगाय प्रामुख्याने हाजीअली, खारदंडा, कार्टर रोड, प्रियदर्शनी पार्कसारख्या खडकाळ किनाऱ्यांवर आढळत असल्याची माहिती 'मरिन लाईफ आॅफ मुंबई'चे प्रदीप पाताडे यांनी दिली. या संशोधनामुळे 'क्रेटेना' पोटजातीमधील या जीवाला आता ओळख मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नव्याने शोधण्यात आलेल्या या दोन्ही प्रजाती प्रामुख्याने खडकाळ किनाऱ्यांवर आढळत असून त्या हायडॉइडवर उपजीविका करत असल्याची माहिती डाॅ.आपटे यांनी दै.'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. यामधील एक प्रजात पोषित्रामध्ये आढळल्याने तिचे नामकरण या प्रातांच्या नावाने 'क्रेटेना पोषित्राएन्सिस' असे करण्यात आले. तर 'बीएनएचएस'चे कर्तव्यनिष्ठ कर्मचारी आणि सागरी संशोधनात महत्वपूर्ण कामागिरी करणारे राजेंद्र पवार आणि विश्वास शिंदे यांच्या नावाने 'क्रेटेना पवारशिंदेओरम' या प्रजातीचे नामकरण करण्यात आल्याचे, आपटे म्हणाले
 
 
मुंबईत एक प्रजात संकटात
'क्रेटेना पवारशिंदेओरम' ही प्रजात मुंबईतील खडकाळ किनाऱ्यांवर आढळून येते. या किनाऱ्यांमधील हाजीअली आणि प्रियदर्शनी पार्कच्या किनाऱ्यावर 'कोस्टल रोड' प्रकल्पाअंतर्गत भराव टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या भागामधून ही प्रजात नष्ट होण्याची भिती सागरी निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.