आव्हानाचा सामना

09 Dec 2020 20:33:15

 singh_1  H x W



कोरोना हे जागतिक महामारीचे संकट म्हणजे कार्यकर्त्यांना आव्हानच होते. तो कुठून येईल आणि कोणाला विळखा घालेल हे सांगता येत नव्हते. त्यामुळे सजग राहणे आणि लोकांना जागरूक ठेवणे हेच लोकप्रतिनिधी म्हणून सुधा सिंग यांनी आपले कर्तव्य मानले आणि कार्यकर्त्यांच्या बळावर गल्लोगल्ली फिरून कोरोना प्रतिबंधासाठी अविरत लढा दिला. गरजूंना सर्वोपरी मदतीचा हात दिला. तेव्हा, त्यांच्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा...

सुधा सिंग
राजकीय पक्ष : भाजप
प्रभाग क्र.: ६७, अंधेरी (प.)
पद : नगरसेविका, मुंबई मनपा
संपर्क क्र. : ९९२०४८६२४०



कोरोना हा परदेशात निर्माण झालेला आणि विमान प्रवाशांमार्फत भारतात शिरकाव केलेला एक वेगळाच आजार. मुंबईत शिरकाव करताच त्याने सगळ्यांचीच तारांबळ उडवून दिली. सुरुवातीला या आजाराचे गांभीर्य कोणाच्याही लक्षात आले नाही. पण, कोरोना प्रतिबंधासाठी ‘जनता कर्फ्यू’पाठोपाठ ‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्यानंतर आणि सगळेच घरात बसल्यानंतर या आजाराचे गांभीर्य सगळ्यांच्या लक्षात आले आणि त्याच्याशी सामना करायला तयार झाले. लोकप्रतिनिधींमध्ये नगरसेवक ही सर्वात पहिली पायरी असते. अगदी परिचित लोकांमधूनच नगरसेवक निवडून येत असल्याने त्याचा प्रभागातल्या जनतेशी अगदी जवळचा संबंध असतो. त्यामुळे नगरसेवकांकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा असतात. कोरोनाकाळातही नगरसेवकांकडूनच जनतेच्या जास्त अपेक्षा होत्या. सुधा सिंग यांच्या कार्यालयात तर रोजच फोन खणखणत असायचे. मात्र, सिंग यांनी त्यांच्या प्रभागातील जनतेला कधी नाराज केले नाही आणि जेवढी शक्य होईल, तेवढी त्यांची जनसेवा केली.


स्वच्छतेला महत्त्व


सुरुवातीला सिंग यांनी प्रभागातील नागरिकांना धीर देण्याचे काम केले. सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन केले तर आपणाला काहीही होणार नाही, याची नागरिकांना खात्री दिली. त्यामुळे लोकांनी घरी राहणे पसंत केले आणि मास्क वापरण्याला प्राधान्य दिले. आता मास्क स्वस्त मिळतात. पण, त्यावेळी मास्कचाही काळाबाजार चालायचा. त्यामुळे सुधा सिंग शीतलादेवी, डी. एन. नगर, गिल्बर्ट हिल, मनीष नगर, जुहू गुलमोहर रोड परिसर, जेव्हीपीडी, जुनेद नगर, खजुरवाडी, समता नगर, सी. डी. बर्फीवाला रोड, शक्ती नगर, साई नगर, गणेशनगर, शिवनगर, शीतलादेवी ट्रान्झिट कॅम्प, एसआरए बिल्डिंग, पोलीस ठाणे अशा सर्व विभागांत मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. तसेच कोरोना विषाणू लोकांच्या घरापर्यंत पोहोचू नये यासाठी रस्ते, झोपडपट्टी परिसर, चाळी आणि इमारतींच्या आवारात जंतुनाशक फवारणी केलीच; परंतु मजल्यांवरही फवारणी केली. सार्वजनिक शौचालयांमधूनही दिवसातून दोन वेळा फवारणी सुरू ठेवली. लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी रस्तोरस्ती फिरून कोरोना प्रतिबंधक ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप केले.


अन्नदान


‘लॉकडाऊन’च्या काळात सगळेच बंद असल्याने मजुरीवर जगणार्‍यांचे खायचे वांदे झाले होते. त्यांच्यासाठी सकाळ, संध्याकाळ अन्नाची पाकिटे पुरविण्याचे काम केले. जे बेघर होते, त्यांच्यासाठी अन्नदान केंद्रे सुरू करण्यात आली. तेथे येऊन ते अन्नाची पाकिटे घेऊन जात असत. बेघर असणार्‍यांना, एकत्र राहणार्‍या मजुरांना अन्नाची पाकिटे घेऊन गुजराण करणे शक्य होते. पण, जे कुटुंबासह राहत होते त्यांना धान्य हवे होते. त्यांच्यासाठी अन्नधान्याचे किट तयार केले. ते घरोघरी वाटण्यात आले. सुधा सिंग यांच्या भागात ‘मेट्रो’ची कामे चालतात. तेथील मजुरांना अन्नाच्या पाकिटांचा पुरवठा केला. त्यावेळी लोकांच्या चेहर्‍यावरचे समाधान पाहून आपल्या लोकप्रतिनिधित्वाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले.

मुलांसाठी पोषक अन्न


अन्नाची पाकिटे घेऊन मोठ्या माणसांचे समाधान होत होते. पण, अधूनमधून गोळ्या-बिस्किटे खाणार्‍या लहान मुलांना कोरोनाची भीती दाखवून त्यांचे पालक त्यांना गप्प बसवू शकत नव्हते. त्यासाठी लहान मुलांसाठी बिस्किटे आणि अन्य पोषक अन्नांचे वाटप केले. त्यामुळे काही काळ तरी त्यांचे पालक मुलांना घरी बसवू शकले. अगदीच लहान मुलांसाठी दूध मिळणे अशक्य होते. त्यांच्यासाठी सिंग व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुधाची पावडर मिळवून प्रत्येक झोपडपट्टीत वाटप केले.


 singh_1  H x W

 

माझ्याकडे कार्यकर्त्यांचे बळ असल्याने जनतेच्या गरजा पूर्ण करता येणे शक्य झाले. त्यामुळे कोरोनाकाळात मी जी काही नागरिकांची सेवा केली असेल, ती कार्यकर्त्यांच्या बळावर केली. माझ्या प्रभागातील कार्यकर्ते हेच माझे बळ आहे.


‘कंटेनमेंट झोन’मध्ये भाजीपाला


अन्नधान्याचे किट वाटल्यानंतर प्रत्येक विभागात भाजीपाल्याची गरज भासू लागली. अशा वेळी सोसायट्यांच्या गेटवर आणि चाळ-झोपडपट्टी परिसरात तेथीलच काही स्वयंसेवक नियुक्त करून त्यांच्यापर्यंत भाजीपाला पोहोचविण्यात आला. काही ठिकाणी सोसायटींच्या गेटवरच तात्पुरत्या स्वरूपात भाजीपाला विक्रेते बसविण्यात आले.

गणेशोत्सव मंडळांना मदत

कोरोना प्रतिबंधाच्या नियमांच्या प्रचारासाठी यंदा गणेशोत्सव मंडळांची फारच मोठी मदत झाली. सिंग यांच्या प्रभागातील अनेक मंडळांकडे सॅनिटायझर बाटल्या आणि मास्कची पाकिटे देण्यात आली होती. वाहतुकीचे साधन नसल्याने प्रभागातील लोकच गणेश दर्शनासाठी येणार होते. त्यांच्यामार्फतही प्रभागातील नागरिकांसाठी सॅनिटायझर बाटल्या आणि मास्कचे वाटप करण्यात आले.


आरोग्य शिबिरे

सॅनिटायझर, मास्क, अन्नाची पाकिटे, या प्राथमिक सुविधा प्रभागात पुरविल्याच; पण महत्त्वाचे म्हणजे, प्रभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून घेतली. सर्दी-पडसे, ताप हे नेहमीचे आजार असतात. पण, ती कोरोनाची लक्षणेही असू शकतात. यासाठी माझ्या प्रभागात अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित केली. त्यातून नागरिकांचे तापमान आणि प्राणवायू तपासणी केली. साधा आजार असणार्‍यांना तेथेच औषधे देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, संशयास्पद नागरिकांना आजार बळावण्याच्या आधीच ‘क्वारंटाईन सेंटर’मध्ये जागा उपलब्ध करून औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली.

श्रमिकांसाठीही मदत

‘लॉकडाऊन’ काळात जे नागरिक त्यांच्या गावी जाऊ इच्छित होते, त्यांच्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र मिळवून देण्यात आले. त्यांच्याकरिता रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली. शिवाय, त्यांना नाश्त्याची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या पुरविण्यात आल्या.

कार्यकर्ते हेच बळ

कोरोनाकाळात महिला लोकप्रतिनिधी म्हणून घरी न बसता, घरी बसलेल्या नागरिकांच्या सहकार्यासाठी पहिल्या दिवसापासूनच सुधा सिंग कार्यरत राहिल्या. लोकप्रतिनिधी म्हणून ते त्यांनी स्वत:चे आद्यकर्तव्यच मानले. कारण, आमदार-खासदारांपेक्षा नगरसेवकालाच लोक जास्त जवळचे असतात. त्यांच्याकडे त्या त्यांच्या प्रतिक्रिया लगेचच व्यक्त करतात.

-अरविंद सुर्वे
 
 
 
Powered By Sangraha 9.0