सेवाभाव सर्वोपरी...

09 Dec 2020 14:51:08

PAYAL KABARE_1  



कोरोनामुळे सगळीकडे हाहा:कार उडाला. अशा काळात गरजूंना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे आले. त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील भाजयुमोच्या महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी विभाग, सहसंयोजक पायल कबरे यांनीही कोरोच्या काळात विविध प्रकारचे मदतकार्य तर केलेच, शिवाय महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांना आत्मनिर्भर बनविण्याची योजना आखली, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची काळजीसुद्धा घेतली, त्याविषयीचा आढावा....



पायल सुधीर कबरे
राजकीय पक्ष : भाजप
पद : महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी विभाग,
सहसंयोजककार्यक्षेत्र : अंबरनाथ
संपर्क क्र. : ९३७२१९४७००



कोरोनाचे काळेकुट्ट संकट संपूर्ण जगावर दाटले होते. सुरुवातीच्या काळात दूरदर्शन व सोशल मीडियावरून सतत येऊन आदळणार्‍या बातम्यांमुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच ‘लॉकडाऊन’चा निर्णय झाल्यामुळे त्याचे गांभीर्यही लक्षात आले होते.या दुहेरी संकटामुळे शहरंच्या शहर, गावखेडी यातील व्यवहार ठप्प झाले, कोरोनामुळे प्रत्येकाने घरात राहा, असे जाहीर करण्यात आले. तसेच एकमेकांच्या संपर्कात येऊ नका, असे फतवे काढले गेले. पण, अशा फतव्यांमुळे कोणतेही काम निश्चित होणार नव्हते. आणीबाणीच्या कठीण प्रसंगी घरात राहणार्‍या सर्वांना जीवनावश्यक वस्तू औषधपाणी व इतर आवश्यक ती मदत मिळणे तेवढेच आवश्यक होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सर्वांना पूर्णपणे नवा असलेल्या कोरोनाच्या संकटाची पूर्णपणे माहिती घेऊन संपूर्ण देशवासीयांसाठी तत्काळ अभ्यासपूर्ण अशा अनेक उपाययोजना राबविल्या. त्यात ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत गरजूंना पुढील दोन-तीन महिने रेशनवर विनाशुल्क धान्य, नवीन रुग्णालयांच्या निर्मितीसाठी तत्काळ अर्थसाहाय्य, शासकीय अधिकार्‍यांचा, डॉक्टर्स, परिचारिका व पोलीस कर्मचारी, यांचा ५० लाखांचा विमा इत्यादी अनेक उपाययोजना करून महत्त्वाच्या सेवा अहोरात्र चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात आणायला सुरुवात झाली.


“भाजप पक्षाचा एक सक्रिय कार्यकर्ता या नात्याने घरात गप्प बसणे केवळ अशक्य होते. माझ्या शहरासाठी, मी राहत असलेल्या विभागासाठी काय काय करता येईल, त्याची पाहणी केली. अनेक जणांशी फोनवर बोलून प्रथम त्यांना धीर दिला, “काही प्रॉब्लेम झाला किंवा वाटला तर विनासंकोच संपर्क करा,” असे सांगून त्यांना इमर्जन्सीसाठी आमच्या काही कार्यकर्त्यांचे नंबर देण्याची व्यवस्थाही केली,” असे पायल कबरे म्हणाल्या. ‘लॉकडाऊन’च्या सुरुवातीला एक-दोन महिने धान्यवाटप, भाजीपालावाटप, ‘आर्सेनिक अल्बम-३०’च्या गोळ्यांचे वाटप, आयुष मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या काढ्याला लागणार्‍या वस्तूंचे वाटप इत्यादी जे जे शक्य होते, त्याचे वाटप कबरे यांनीकेले. लोकांना यासाठी घराबाहेर पडावे लागू नये, अशा अनेक वस्तूंचे वाटप कार्यकर्त्यांनी सर्व प्रकारची रिस्क घेऊन घरोघरी जाऊन केले.



PAYAL KABARE_1  


सर्वत्र कोरोनाचा हाहाःकार माजला असताना, सुदैवाने आजपर्यंत आम्ही आमच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या वृद्धाश्रमातील सर्व वयोवृद्ध आजी-आजोबांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ न देण्यात यशस्वी ठरलो आहोत व ही माझ्या दृष्टीने अतिशय मोलाची अशी कामगिरी ठरली आहे.


यात उल्लेखनीय दोन गोष्टी केल्या व त्याचे महत्त्व फार वाटते म्हणून त्या इथे नमूद करणे पायल कबरे यांना फार गरजेचे वाटते. अनेक वस्तूंचे वाटप संपूर्ण भारतात सर्वच कार्यकर्ते अतिशय तळमळीने करत होतेच. त्या महिन्या, दोन महिन्यात एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली ती म्हणजे, या काळात महिलांना/तरुणींना त्यांच्या हायजिनची काळजी घेण्यासाठी त्यादृष्टीने कोणीच पावले उचलली गेली नव्हती. मासिक पाळीच्या काळात लागणारे ‘सॅनिटरी नॅपकिन’ महिलांना मिळणे मुश्कील झाले होते. तेव्हा, अंबरनाथचा सर्व्हे केल्यावर असे लक्षात आले की, अनेक मेडिकल दुकानांमध्ये त्याची उपलब्धता फारच कमी होती. याबाबत महिला संकोचाने कोणासमोर बोलत नव्हत्या, बोलू शकत नव्हत्या. त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या या समस्येचा व महिलांच्या आरोग्याचा विचार करून तत्काळ येथील एका लोकल ‘सॅनिटरी नॅपकिन’ मॅन्युफॅक्चरिंग युनिटला संपर्क साधला. त्यांच्याकडेही त्यावेळी ‘सॅनिटरी नॅपकिन’चा पुरेसा माल उपलब्ध नव्हता व त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग युनिटही ‘लॉकडाऊन’मुळे बंद झाले होते. परंतु, त्यांना या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले व त्यांना काही हजार नॅपकिन्स तातडीने बनवायला सांगितले.



कबरे यांच्या मागणीला त्यांनीही चांगला प्रतिसाद देत उपरोक्त मागणी पूर्ण केली व अक्षरश: घरोघरी जाऊन व काही ठिकाणी महिलांना एकत्र करून त्यांना ‘सॅनिटरी नॅपकिन’चे वाटप केले. यात आणखीन एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे, या प्रसंगामुळे आमच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, ‘कोरोना’पासून बचाव करण्यासाठी लागणारे मास्क, सॅनिटायझर याची तत्काळ निर्मिती लहान-लहान उद्योजकांकडून, महिला बचतगटांकडून करू शकलो, तर या ‘सॅनिटरी नॅपकिन’ बनविण्याचे कौशल्य बचतगटांना दिले, तर या महिलाही स्वावलंबी होतील व त्यांना अन्य नवीन उद्योग, व्यवसायही मिळेल, अशी कल्पना सुचली. मग त्याप्रमाणे कबरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हालचाल सुरू केली व काही बचतगटांना त्या लवकरच ‘सॅनिटरी नॅपकिन’ मॅन्युफॅक्चरिंगचे संपूर्ण प्रशिक्षण देण्याची व्यवस्था व लागणारी साधन सामग्री त्या उपलब्ध करून देत आहेत. यात ‘व्होकल फॉर लोकल’ होत त्यांनी बनविलेल्या ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ला कबरे मार्केटही मिळून देणार आहेत.



याच कालावधीत दुसरी मोठी गोष्ट पायर कबरे यांनी केली ती म्हणजे, त्यांच्यातर्फे संचालित ‘कमलधाम’ वृद्धाश्रम. पायल कबरे या वृद्धाश्रमाच्या संचालिका आहेत. सर्वत्र ‘लॉकडाऊन’ची परिस्थिती निर्माण झाल्याने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे काय करायचे, असा मोठा प्रश्न कबरे यांच्यासमोर उभा राहिला. वृद्धांना कोरोनाची बाधा लगेच होते, असे समजले. आजारी वृद्ध बरे होण्याचे प्रमाण कमी असल्याने त्यांना यापुढे सांभाळणे, एक आव्हान होते. वृद्धाश्रमातील कर्मचारी लांबून लांबून कामावर येत असल्याने ‘लॉकडाऊन’मुळे त्यांना येणे अशक्य होते. विशेष परवानगी घेऊन वृद्धांची ने-आण करता येऊ शकत होती. परंतु, दररोज बाहेरून येणार्‍या कर्मचार्‍यांमुळे आश्रमातील वृद्धजनांना समस्या निर्माण झाल्या असत्या म्हणून आम्ही, ४० ते ४५ वयोवृद्ध राहत असलेल्या आमच्या वृद्धाश्रमात सर्वप्रथम सर्व आजी-आजोबांना त्यांच्या त्यांच्या घरी पाठविण्याचा निर्णय घेतला. परंतु, अनेक वेळा विनंती करूनही फारच थोड्या वृद्धांना त्यांच्या घरी जाण्याचे भाग्य नशिबी आले. उर्वरित ३०-३५ आजी-आजोबांना सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी वृद्धाश्रमावर आली. परंतु, कबरे यांनी न डगमगता, न घाबरता हे आव्हान स्वीकारले. या कालावधीत वृद्धाश्रमात आर्थिक अडचणही निर्माण झाली. तरीही कुठल्याही कर्मचार्‍याला आम्ही कामावरून कमी केले नाही व ते कामावर येऊ शकत नसतानाही त्यांना त्यांचा पगारही पूर्णपणे देण्याची व्यवस्था आम्ही केली. सर्वप्रथम संपूर्ण आश्रम ‘लॉकडाऊन’ केला. कुठल्याही बाहेरील व्यक्तीला आश्रमात येण्यासाठी व आश्रमातील कोणालाही बाहेर जाण्यासाठी मज्जाव केला. जे चार-पाच कर्मचारी उपलब्ध झाले, त्यांना विनंती करून आश्रमातच राहायला सांगितले. तसेच त्या सर्वांच्या जेवणा-खाण्यासाठी पुरेसे धान्य, दूध याची व्यवस्था केली. त्यांना इमर्जन्सीमध्ये डॉक्टर, रुग्णालयाची व्यवस्था लागली तर तशी बोलणी संबंधित यंत्रणेशी करून ठेवली. या सर्व प्रकारची काळजी घेतली गेली होती.
- श्रीकांत खाडे
Powered By Sangraha 9.0