आरोग्यव्रती

09 Dec 2020 16:18:42

pandharinath mhatre_1&nbs



जिथे आपली रक्ताची माणसेदेखील मदतीला येत नाहीत, अशा परिस्थितीत आपण घेतलेले सामाजिक कार्याचे व्रत निभावण्यासाठी डोंबिवली शहर मंडलाचे भाजप उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे यांनी गरजूंना मदतीचा हात दिला. ‘कोविड’च्या महामारीत गरजूंच्या मदतीसाठी धाव घेणार्‍या म्हात्रे यांची पावलं आजही थांबलेली नाहीत. त्यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...


पंढरीनाथ हिरू म्हात्रे
राजकीय पक्ष : भाजप
पद : उपाध्यक्ष, डोंबिवली शहर मंडल
प्रभाग क्र. : ८१ आनंद नगर-गांधीनगर
संपर्क क्र. : ९८७०१३३५६०

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका गरीब, मजूर, कामगार, विद्यार्थी, अपंग, दिव्यांग, रोजंदारीवर काम करणार्‍या महिला आणि पुरुषांना बसला. या प्रत्येक गरजूंच्या मदतीला पंढरीनाथ म्हात्रे धावून जात होते. त्यांच्या या कामात त्यांना पत्नी पूनम यांची मोलाची साथ लाभली. सुरुवातीला आपल्या प्रभागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी त्यांनी आनंदनगर-गांधीनगर वार्ड क्रमांक-८१ मधील सर्व इमारतींना सॅनिटाईझ करण्याचे ठरविले. त्यानुसार प्रभागातील २४६ इमारती सॅनिटाईझ केल्या. सोसायटीचे एकदाच निर्जुंतकीकरण करून न थांबता, त्यांनी काही दिवसांच्या फरकाने चार वेळा सोसायट्यांचा परिसर सॅनिटाईझ केला. अनेकांचा रोजगार बंद झाल्याने त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत निर्माण झाली होती. त्यांच्यासाठी अन्नधान्य वाटप करण्यासाठी किट तयार केले. प्रत्येक गरजूपर्यंत हे किट पोहोचविले.




जवळपास दोन महिने गरजूंना अन्नधान्य वाटप करण्याचे काम सुरू होते. सुरुवातीच्या काळात सोसायटीमध्ये ‘कोविड रुग्ण’ आढळल्यास तो विभाग ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून जाहीर केला जात होता. त्या सोसायटीतील इतर नागरिकांना सोसायटीच्या बाहेर जाण्यास बंदी होती. या नागरिकांना अन्नधान्य, भाजीपाला, औषधे पुरविण्याचे काम म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले. संपूर्ण प्रभागात एका दिवसांत दोन ठिकाणी अ‍ॅन्टिजेन चाचणी शिबिरांचे त्यांनी आयोजन केले. या चाचणीतून सात ते आठ जणांची चाचणी सकारात्मक आल्याचे दिसून आले. या कोविड रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी म्हात्रे यांची धडपड सुरू होती. या रुग्णांना रुग्णालयात बेड मिळेपर्यंत ते सातत्याने पाठपुरावा करीत होते. कोविड रुग्णांना प्लाझ्माची गरज भासत असल्याने एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने त्यांनी एक दिवसांचे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात ६२ बाटल्या रक्त जमा करण्यात आले होते. कोरोना विरोधात लढण्यासाठी संपूर्ण प्रभागात मास्क आणि १,६०० लोकांना ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या गोळ्यांचे वाटपही त्यांनी केले.



रायगड जिल्ह्यातील माणगावमधील आदिवासी शाळेला वादळाचा तडाखा बसल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या शाळेला डोंबिवली पूर्वेच्या भाजप युवा मोर्चाने मदत केली. त्यात म्हात्रे यांनी शाळेसाठी लागणारे इलेक्ट्रिक साहित्य पुरविले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेकडूनही अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये रेशन पुरविण्यात आले. कल्याण ग्रामीण भागातील नेवाळी नाका परिसरातील गरीब व गरजू लोकांना दोन महिने दुपारचे जेवणही त्यांनी दिले. परप्रांतीयांनी पायी चालत आपल्या गावाची वाट धरली होती. त्यांच्या मदतीसाठी शहापूर हायवेच्या ठिकाणी जाऊन त्यांना चहा-नाश्ता, जेवण, पाण्याची बाटली, पादत्राणे दिली. अवघ्या दोनच दिवसांत ४५० परप्रांतीयांना त्यांनी मदत केली.‘कोविड’ चाचणीचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आल्यावर अनेक जण खचतात. उपचारासाठी कुठे जावे, हेच त्यांना समजत नाही. या रुग्णांना योग्य मार्गदर्शन म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले. कोविड रुग्णांना प्लाझ्मा मिळावा, यासाठी एक ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुप तयार केला आहे. सहकार्‍यांच्या मदतीने प्लाझ्मादात्यांची यादी तयार आहे. या ग्रुपवर कोविड रुग्णांचे नातेवाईक संपर्क करतात. ज्यांना ज्या रक्तगटाच्या प्लाझ्माची गरज आहे, तसे रुग्णांचे नातेवाईक घेऊन जातात. त्यासाठी मुरबाडपासूनही गरजू येत आहेत. त्यांना मोफतही सेवा पुरविली जात आहे.



pandharinath mhatre_1&nbs


‘कोविड’ परिस्थिती जी उद्भवली आहे, या परिस्थितीत ज्यांना जमेल त्यांनी मदत करणे गरजेचे आहे. स्वत:ला सांभाळून मदत करणे गरजेचे आहे. हे कार्य मा. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र चालू आहे, त्यांच्यामुळेच आम्ही हे कार्य करू शकलो.


म्हात्रे यांना त्यांच्या या कार्यात सहकार्‍यांनी मनापासून साथ दिली. हे काम करताना त्यांच्या कार्यकर्त्यांना कोविडची लागण झाली. पण, या सामाजिक कार्याला कोविडदेखील रोखू शकला नाही. प्रत्येक कार्यकर्त्याची कोविड तपासणी ही दोनदा करून घेतली. या कार्यकर्त्यांशिवाय हे काम होऊ शकले नसते. त्यात मंदार जोशी, सुधीर माळगावकर, विलास खंडिझोड, सचिन माने, बालाजी नायडू, भानुप्रताप सिंग, रवि नायर, संतोष बंगेरा, कांतिभाई गालिया, केदार देशपांडे, सुरेश इल्लीकल, उननिकृष्णन, सुभाष फुलोरे, शैलेश घोसाळकर, निलेश सारंग यांचा सहभाग उल्लेखनीय होता. कार्यकर्ते नागरिकांच्या मदतीसाठी धावपळ करीत असताना त्यांना पक्षपातळीवर वरिष्ठांकडून मोलाचे मार्गदर्शन लाभले. वरिष्ठांनी केवळ मार्गदर्शन न करता, त्यांची आस्थेने चौकशीही केली. माजी राज्यमंत्री, आमदार रवींद्र चव्हाण यांचे सर्व कामांवर लक्ष होते.



याशिवाय कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी, डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष नंदू परब यांचेही मार्गदर्शन लाभले. म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनीही या सामाजिक कामात त्यांना योग्य साथ दिली. आम्ही दररोज बाहेर आणि लोकांमध्ये आहोत. ‘कोविड’चे सर्व नियम योग्य रीतीने पाळले आहेत. आपल्यामुळे कुटुंबाला त्रास होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. ‘लॉकडाऊन’च्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत असल्याने अव्वाच्या सव्वा भाव आकारले जात होते. त्यावर दुकानदारांशी वाद न घालता, आधी नागरिकांची गरज भागविली. आपले सामाजिक कार्य सुरू आहे हे पाहून मग दुकानदारांनीही योग्य दर लावले. अ‍ॅन्टिजेन चाचणी शिबिरात कडोंमपाकडून चांगले सहकार्य लाभले. या शिबिरात किट आणि कर्मचारी वर्ग कडोंमपाकडून देण्यात आला होता.कोविड रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधाराची गरज या काळात होती. या कुटुंबांना आधार देण्याचे काम म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले. ते म्हणतात की, “जे काम समोर आले, चांगले वाटले ते करीत गेलो. ज्यांच्या घरी गॅससारख्या इतर वस्तू नव्हत्या, त्यांना आर्थिक मदत केली. अंदाजे दोन लाखांच्या आसपास खर्च केला.” म्हात्रे व त्यांच्या कार्यकर्त्यांना मदतीचे काम करताना पाहून लोकही टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करीत होते. हीच त्यांच्या कामाला मिळालेली खरी पोचपावती होती. 


- जान्हवी मौर्ये 
Powered By Sangraha 9.0