तत्पर, ऊर्जस्वी ‘कोविड योद्धा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

vvv_2  H x W: 0



’ठाणे नगरीतील महान सामाजिक व्यक्तिमत्त्व असलेल्या स्व. अरविंद पेंडसे यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या मृणाल पेंडसे आज कोरोनाच्या काळात एक नगरसेविका म्हणून, एक माणूस म्हणून आणि एक ‘कोविड योद्धा’ म्हणून करत असलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. भारतीय जनता पक्षाचे युवा व्यक्तिमत्त्व असलेल्या नगरसेविका मृणाल पेंडसे म्हणजे तत्पर, ऊर्जस्वी ‘कोविड योद्धा’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या या कार्याचा घेतलेला आढावा.
 
 
नाव : मृणाल अरविंद पेंडसे
 
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
 
पद : ठाणे शहर महिला भाजप अध्यक्षा
 
नगरसेविका : ठाणे महानगरपालिका
 
कार्यक्षेत्र : नौपाडा, घंटाळी ठाणे (प)
 
प्रभाग क्र. : २१
 
संपर्क क्र. : ९५९४५०२५७५
 
आपला प्रभाग हाच आपला परिवार मानून मृणाल पेंडसे यांनी स्वतःचा वैयक्तिक विचार न करता, प्रभाग आणि जबाबदारी समोर ठेवून स्वतःला मदतकार्यात झोकून दिले. महापालिका अधिकारी असो की सामान्य नागरिक, ज्येष्ठ असो की तरुणवर्ग, महिला असो की आदिवासी आश्रम शाळेतील बालक-बालिका, सफाई कामगार असो की वैद्यकीय अधिकारी, भाजीविक्रेते असो की व्यापारी वर्ग, आपल्या उत्साही स्वभावामुळे आणि लोकांना जोडण्याच्या कौशल्यामुळे ‘लॉकडाऊन’ काळात त्यांनी अत्यंत प्रभावीपणे सेवाकार्य केले.
 
‘लॉकडाऊन’च्या सुरुवातीला दुकाने-मंडई सर्वकाही बंद होते आणि जे उघडत होते दुप्पट-तिप्पट दराने होते! अशा परिस्थितीत पेंडसे यांनी प्रभागातील अनेक इमारती व सोसायट्यांमध्ये योग्य दरात भाजीपाला आणि फळे नागरिकांसाठी विक्रेत्यांच्या मार्फत उपलब्ध करून दिली, शिवाय हलाखीच्या परिस्थितीतील झोपडपट्टीमधील वस्त्यांमध्ये डाळ, तांदळासह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे मोफत वाटप त्यांनी केले.
 
 
ज्येष्ठ नागरिक म्हणजे मृणाल पेंडसे यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय! ज्येष्ठ नागरिकांच्या मर्यादा लक्षात घेता, त्यांना संसर्गाचा धोका अधिक असल्याने प्रभागातील सर्वच ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी त्या आवर्जून घेतात. ‘लॉकडाऊन’च्या काळात एकट्या राहणार्‍या ज्येष्ठांना जीवनावश्यक वस्तू तसेच औषधे त्यांना घरपोच करून देण्याची व्यवस्था पेंडसे यांनी केली. वेळप्रसंगी ‘जेथे कमी, तेथे स्वतः मी’ या उक्तीप्रमाणे संबंधित ठिकाणी स्वतः जाऊन ज्येष्ठांची मदत आजही त्या करत असतात.
 
आजवर आजी-आजोबा उद्यानात असंख्य ज्येष्ठ नागरिकांचा मोठा परिवार मृणाल पेंडसेंशी जोडला आहे. आपली व्यथा आणि आनंद ते हक्काने त्यांच्याजवळ व्यक्त करतात. हा मोठा परिवार त्या आपले कुटुंब समजूनच सर्वांच्या संपर्कात राहतात. ‘लॉकडाऊन’ काळात मदतीच्याही एक पाऊल पुढे जाऊन ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आधार देत, वेळप्रसंगी त्यांच्या घरी जाऊन मनमोकळ्या गप्पा मारत त्यांना एकटेपणाची जाणीव त्या होऊन देत नाहीत, हेच एका संवेदनशील नेतृत्वाचे कौशल्य आहे!
 
 
मजबूत रोगप्रतिकार शक्तीमुळे आजार अथवा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते, म्हणूनच सामान्य नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिकारशक्ती वाढीसाठी आयुर्वेदिक प्रतिकारशक्तीवर्धक किटचे तसेच ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषधाचे विनामूल्य वितरण पेंडसे यांनी त्यांच्या ‘ऊर्जा’ ग्रुपतर्फे प्रभागात केले. तसेच कै. अरविंद पेंडसे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे विविध उपक्रम त्या राबवित आहेत.
 
 
पावसाळी परिस्थितीत कोरोनासह साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर प्रभागामध्ये स्वच्छता कायम ठेवणे अनिवार्य आहे, म्हणूनच पेंडसे यांनी आपल्या प्रभागातील प्रत्येक भाग, प्रत्येक इमारत आणि प्रत्येक मजल्यावर सफाई कर्मचार्‍यांकडून स्वच्छता करून घेण्यावर भर दिला. स्वखर्चाने निर्जंतुकीकरण मशीन घेऊन अनेकदा त्यांनी मशीनने स्वत: फवारणी केली. जितका स्वच्छ प्रभाग तितकेच सर्वजण सुरक्षित राहतील म्हणून प्रभागातील प्रत्येक कानाकोपर्‍यात सातत्याने औषध फवारणी, निर्जंतुकीकरण करण्याचा त्यांचा आग्रह आहे. नागरिकांनीही त्यांना याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संपूर्ण स्वच्छतेसाठी आपल्या प्रभाग सुधार निधीचा सुयोग्य वापर करत लहान व अरुंद परिसरांमध्ये सहज कचरा गोळा करू शकणार्‍या छोट्या कचरागाड्या (घंटागाडी) त्यांनी उपलब्ध करून दिल्या.
 
सफाई कामगार म्हणजे स्वच्छतादूतच! स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाचा उद्रेक झालेला असतानाही स्वच्छता सेवा अविरत सुरू ठेवण्यात आरोग्य कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत ते पालिका सफाई कर्मचारी. सफाई कर्मचारी हा उपेक्षित राहणारा घटक असला तरी त्यांचा संपूर्ण सन्मान आणि त्यांना प्रोत्साहन देण्यात पेंडसे या अग्रणी आहेत.
 
एकूणच सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, पोलीस वर्ग, व्यापारी वर्ग, भाजीविक्रेते, तरुण मंडळे, सफाई कामगार, महापालिका कर्मचारी, अधिकारी आदी सर्वांना वेळोवेळी सुरक्षेसाठी पेंडसे यांनी त्यांच्या ‘ऊर्जा ग्रुप’च्या वतीने त्यांना वैयक्तिक सुरक्षेसाठी सॅनिटायझर, प्रतिकारशक्तिवर्धक औषधाचे किट आदी साहित्याचे वितरण केले. ‘लॉकडाऊन’च्या काळात सामान्य नागरिकांसाठी मंडईत भाजीविक्रेत्यांचा तसेच सफाई कर्मचार्‍यांचा वेळोवेळी सन्मान, त्यांची नियमित विचारपूस तसेच स्वच्छता सप्ताहामध्ये सफाई कामगाराच्या समवेत स्वत: हाती झाडू घेऊन स्वच्छता करून सामान्य नागरिकांना प्रभाग स्वच्छतेचा संदेश दिला.


vvv_1  H x W: 0

"राजकीय जबाबदारीतून कार्य करत असताना, पदाधिकार्‍यांचे सहकार्यही तितकेच मोलाचे. भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, आ. संजय केळकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हाला लाभत असते. या द्वयींसह भाजपच्या इतर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नेहमीच सहकार्य मिळाले आणि यापुढेही त्यांचे सहकार्य मिळत राहील, अशी आशा मी व्यक्त करते."

 
‘अनलॉक’ सुरू झाल्यावर मोठ्या कालावधीनंतर सलून व्यवसाय सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्यासाठी प्रभागातील अनेक सलून व्यावसायिकांना त्यांच्या व ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पेंडसे यांच्या ‘ऊर्जा’ ग्रुपच्या वतीने सुरक्षा अ‍ॅप्रनचे वितरण केले. तसेच, गणेशोत्सव काळात प्रभागातील अनेक मंडळांना गणेशभक्तांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी मास्क, ऑक्सिमीटर आणि टेंपरेचर स्कॅनिंग गन (थर्मल गन) मृणाल पेंडसे यांनी स्वखर्चाने भेट दिले.
 
 
राज्यभरात ‘कोविड’ तसेच ‘क्वारंटाईन सेंटर्स’मध्ये महिलांबाबतीत घडलेल्या अप्रिय घटनांविषयी त्यांनी आपल्या पदाचा योग्य उपयोग करीत प्रशासनाकडे स्थानिक ‘कोविड सेंटर्स’मध्ये महिला सुरक्षेबाबत आवाज उठवत मार्गदर्शक सूचनांचे निवेदन देत आक्रमक भूमिकाही घेतली. प्रशासनाने त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली. प्रभागात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ नये, म्हणून सामाजिक संस्थांच्या सहयोगाने आरोग्य व रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी पाठपुरावा त्यांनी केला, तसेच प्रत्यक्ष शिबीरस्थळी भेट देऊन नागरिकांना मार्गदर्शनही केले. अंकिता सूद, संहिता देव, क्षमा पाटकर, अजय सिंग, नितेश तेली यांसारख्या कार्यकर्त्यांचे याकामी विशेष सहकार्य लाभले. तसेच पंतप्रधान आत्मसन्मान योजनेच्या अंमलबजावणीतही पेंडसे यांचे मोलाचे सहकार्य सुरू आहे.
 
कोरोनाकाळात संकटांना भिडणार्‍या मृणाल पेंडसे या रणरागिणीच आहेत. नागरिकांच्या संकटात त्या धावून जातात, ही बाब एक महिला योद्धा म्हणून उल्लेखनीय आहे. आज काही अंशी संसर्ग ओसरत असल्याचे चित्र दिसत असताना पुन्हा लोकांनी निष्काळजीपणाने वागू नये, म्हणून वारंवार त्या सर्वांना प्रत्यक्ष भेटीतून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वच्छता, मास्क तसेच सॅनिटायझरचा योग्य वापर, सामाजिक अंतर, आरोग्यसेतू अ‍ॅपचे महत्त्व आदी विषयांवर त्या सातत्याने जागृती करत असतात.
 
 
- दीपक शेलार
@@AUTHORINFO_V1@@