दिलखुलास चैतन्यरंग!

09 Dec 2020 20:47:46

Pravin Davane_1 &nbs
 
 
 
 
साहित्याच्या अविरत सेवेसाठी महाराष्ट्रात साहित्याची पालखी नेणारे 'सावर रे' म्हणत आपल्या लेखनाची दिलखुलास आनंदयात्रा करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच प्रा. प्रवीण दवणे...
"विद्यार्थी दशेतच जाणीवपूर्वक लेखनप्रपंचाचा श्रीगणेशा केला, पण बऱ्याच ठिकाणांहून ते लेखन 'साभार परत' यायचे. तेव्हा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले वडील 'लिहीत राहा' असा धीर देत.” प्रयोगशीलतेतून माणसं वाचत, प्राध्यापकी करीत मराठीतील विविध साहित्य प्रकारांना ज्यांचा परिसस्पर्श झाला ते ख्यातनाम कवी, गीतकार, लेखक आणि नाटककार, निरुपणकार प्रा. प्रवीण दवणे आज साहित्याच्या विणकामात 'प्रवीण' झाले आहेत. त्यांचे हे दिलखुलास अपूर्वसंचित. 
 
प्रा. दवणे यांचा पहिला लेख म्हणून 'आपण' नामक साप्ताहिकात 'वळण' ही कथा छापून आली. त्यानंतर त्यांचे विपुल वाङ्मय किंबहुना 'आर्ताचे लेणे', मराठी साहित्य विश्वात 'अथांग' पसरलेले आहे. 'निघालो घेऊन दत्ताची पालखी' यातील भक्तीचा शब्दाविष्कार असो वा 'आई म्हणजे देवा घरची माया, आई कल्पतरूची छाया...' हा हळवेपणा असो तर कधी 'सायकलवाल्या पोलीसवाल्या जाऊ नको तू लांब...' हे युगुल गीत असो, साध्या सोप्या भावनाप्रधान शब्दांचा अलगुज अविष्कार म्हणजे प्रा. प्रवीण दवणे. 'त्याच वेळी सगळे व्यक्त करता आले असते तर...' ही सल त्यांनी सहज कवितेत मांडली, तशीच 'मोठी माणसे छोटी होती' यामध्ये बालवयातील निरागसता पण त्यांनी मांडली. तेच दवणे जेव्हा ज्ञानेश्वरीचे रसाळ निरुपण करु लागतात तेव्हा वातावरण भक्तिमय होते. तेच दवणे जेव्हा 'शुक्रतारा' कार्यक्रमात अरुण दातेंसोबत 'शब्दांचे झोपाळे' करायचे त्यावेळी रसिक श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात असत, तेच दवणे दिलखुलास बोलता बोलता जगण्यातील शाश्वत सत्य सांगतात. 'सावर रे' सांगून उमलत्या कळ्यांना सावरणारा बाप, मोठा भाऊसुद्धा कवी प्रवीण दवणे यांच्या शब्दसुमनांमध्ये भेटतो.
 
प्रा. दवणे यांच्या चित्रपट गीतांनी मराठी चित्रपट गाजवला. त्यासोबत प्रा. दवणे यांनी विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवल्या. ज्ञानसाधना महाविद्यालयात प्रा. दवणे यांचे लेक्चर असले की वर्ग भरुन जायचा. बाजूच्या वर्गातील मुले पण येऊन बसायची. त्याच भरलेल्या वर्गात प्रा. दवणे एखाद्या अबोल विद्यार्थ्याला उभे करुन बोलायला लावायचे. सुरुवातीला लाजणारे असे विद्यार्थी पुढे धिटाईने बोलू लागले आणि आज पत्रकार, कवी, लेखक म्हणून आपले स्वतःचे विचार स्वतंत्रपणे मांडू लागले. तसेच शेवटच्या बेंचवर बसणाऱ्या, अभ्यासात फारसा रस नसलेल्या विद्यार्थ्याला त्याच्या आवडीप्रमाणे आकाशकंदील बनवायला सांगणारे प्रा. दवणे यांनी ठाण्यातील एक चांगला हॉटेल उद्योजक घडविला. असे विद्यार्थी जागोजागी भेटतात. ठाण्याचे प्रथम नागरिक महापौर नरेश म्हस्केसुद्धा प्रा. दवणे यांचा गुरु म्हणून पदोपदी आवर्जून उल्लेख करतात. त्यांच्याच लेखणीतून चितारलेले सन्मानपत्र राज्य शासनाद्वारे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना प्रदान करण्यात आले होते. जिथे जिथे मराठी रसिक आहे तिथपर्यंत प्रा. दवणे पोहोचले आहेत. कधी लालित्यपूर्ण भाषेतून, भाव, भक्तिगीतातून, व्याख्यानातून, पुस्तक रुपात... महाराष्ट्रातील दत्ताच्या कोणत्याही मंदिरात गेलात की परिसरात तुम्हाला 'दत्ताची पालखी' या गीताचा स्वर कानी पडतोच...
 
३५ वर्षे अध्यापन करुन स्वेच्छानिवृत्तीनंतरही आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने साहित्याच्या अविरत सेवेसाठी महाराष्ट्रात ही साहित्याची पालखी नेणारे, 'सावर रे' म्हणत आपल्या लेखनाची दिलखुलास आनंदयात्रा करणारे व्यक्तिमत्त्व... पण त्याहीपेक्षा एक सामाजिक जाणीव असलेला माणूस म्हणजे प्रा. प्रवीण दवणे. त्यांचे वडील स्वयंसेवक असल्याबाबत त्यांना छेडले असता, वडील स्वयंसेवक आहेत म्हणजे मीही स्वयंसेवक असलंच पाहिजे, असं नाही. वडिलांमुळेच कळत नकळत संघाचे संस्कार झाले, त्याचा आनंद आहे. पण, लेखक-कलावंत असल्याने मुक्त असून माणूस नावाच्या संवेदनांशी बांधिलकी मानत आल्याचे ते सांगतात. ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात त्यांनी ३० वर्षे मराठी प्रयोगशील अध्यापन केले. बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात, पण याच वयात त्यांनी लेखनासाठी प्रारंभ केला तो आजतागायत सुरू आहे. मुखोद्गत असलेल्या मराठी कविता हे दवणेंचे वैशिष्ट्यच. त्यांनी भरभरून बोलावे आणि रसिकांनी कानसेन होऊन ऐकावे, असे त्यांचे रसाळ वक्तृत्व. त्यामुळे ते कितीही बोलत राहिले तरी ऐकतच राहावेसे वाटते.
 
'प्रकाशाची अक्षरे', 'रोप अमृताचे', 'मुक्तछंद', 'माझीया मना', 'सावर रे भाग १ ते ४', 'अथांग', 'मैत्रबन', 'चैतन्यरंग', 'रे जीवन', 'अत्तराचे दिवस', 'दिलखुलास', 'द्विदल' आदी ललित वैचारिक पुस्तकांबरोबरच त्यांचे बालवाङ्मय प्रसिद्ध झाले आहेत. 'बोका', 'अजिंक्य मी', 'फुलण्यात मौज आहे', 'घडणाऱ्या मुलांसाठी', 'गाणे गा रे पावसा', 'मोठे लोक छोटे होते तेव्हा' आदी बालवाङ्मयाबरोबरच 'झाड चांदण्याचे', 'गाणे स्वातंत्र्याचे', 'पिल्लू' हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. अनेक पारितोषिके व पुरस्कार मिळवलेले किंबहुना, प्रचंड अक्षरप्रपंच असलेले प्रा. दवणे म्हणजे एक आनंदाचे झाडच, दिलखुलास चैतन्यरंग जणू!
 
- दीपक शेलार
Powered By Sangraha 9.0