‘मी’ पणा बाजूला सारून कार्य करणारे सेवक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020   
Total Views |

chandrakant khode _1 

 

‘लॉकडाऊन’मच्या काळात मदतीचे अनेक हात या काळात नागरिकांच्या समोर आले. नागरिकांनाही त्यामुळे आधार मिळाला. मात्र, या काळात करण्यात आलेल्या मदतीचे काही हात असे होते की, त्यात ‘ही मदत मी केली,’ असे सांगणे त्यांना अयोग्य वाटत होते. आपण एकट्याने मदत केल्यास ‘मी’पणाचा लवलेश त्यात दिसून येईल, त्यामुळे त्यांनी अनेकांच्या मदतीने सेवाकार्य करण्यास प्राधान्य दिले. त्यातीलच एक नाव म्हणजे चंद्रकांत खोडे.

चंद्रकांत खोडे
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेवक तथा माजी सभागृह नेता 
मतदार संघ : प्रभाग क्र. २३
संपर्क क्र. : ९६०४१११९९९


नाशिक महानगरपालिकेचे प्रभाग क्र. २३ चे नगरसेवक चंद्रकांत खोडे हे १९८५ पासून समाजकार्यात सक्रिय आहेत. मागील काही वर्षांपासून सलग ते नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. सेवाभावीवृत्ती, लाघवी स्वभाव, मनमिळावूपणा यामुळे खोडे हे सर्वांनाच आपले हक्काचे वाटतात. कोरोनामुळे जाहीर झालेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यावर भर दिला. त्यात त्यांनी तांदूळ, गहू, तुरडाळ, गव्हाचे पीठ, भाजीपाला आदी जिन्नसांचे वाटप केले. खोडे हे स्वतः शेतकरी असल्याने नागरिकांच्या क्षुधातृप्तीचे, एका बळीराजाचे कार्य त्यांनी या काळात अतिशय तन्मयतेने केले. तसेच, अनेक नागरिकांना त्यांनी खिचडीचे वाटप केले. सुमारे दहा ट्रक मालाचे वाटप याकाळात खोडे यांच्या माध्यमातून करण्यात आले.
 
 

 

नाशिक शहरातील इंदिरानगर, विनयनगर, शिवाजीवाडी, बजरंगवाडी, भारतनगर, वडाळागाव आदी भागांत त्यांनी आपले सेवाकार्य केले. प्रभाग क्र. ३०, ३१ व २३ मध्ये त्यांच्या सेवाकार्याचा ओघ हा या काळात ओसंडून वाहत होता. खोडे यांच्या मदतकार्यामुळे सात ते आठ हजार कुटुंबांना आपला उदरनिर्वाह करणे, या काळात सहज शक्य झाले. यासाठी सुमारे तीन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम खोडे यांनी खर्च केली. खोडे यांच्या मदतीची कल्पना असल्याने या सेवाकार्यात त्यांना विविध नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले. करत असलेले कार्य हे सांघिकदृष्ट्या झाल्यास त्यात कोणताही ‘मी’पणाचा लवलेश राहत नाही. यावर खोडे यांची धारणा असल्याने त्यांनी सहकार्य घेत सांघिक मदतीच्या रूपाने मदतकार्याचा परीघ विस्तृत करण्यावर भर दिला. यासाठी त्यांना नरेश कारडा, सुजॉय गुप्ता, नरेनभाई ठक्कर, विलास शहा, राजू शहा, बागड असोसिएट्स आदींचे विशेष सहकार्य लाभले, तसेच अनेक शेतकर्‍यांनी वाटपासाठी गहू व तांदूळ यांची पोती देत मदतकार्यास हातभार लावला. खोडे यांचे मदतकार्य हे अनेकांसाठी पथदर्शक ठरले, त्यांची मदत पाहून अनेक जण त्यांच्या मदतकार्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवू लागले.


 

खोडे यांच्या कार्याची दखल प्रसारमाध्यमांनी स्वतःहून घेतली, त्यामुळे त्यांच्या कार्याची माहिती अनेकांना मिळत गेल्याने मदतकार्याची प्रेरणा अनेकांना मिळण्यास साहाय्य झाले. विशेष म्हणजे, मदतकार्य करत असताना ते निःस्पृह भावनेने करणे आवश्यक असल्याचे खोडे यांचे मत आहे. त्यामुळे मदतकार्याचे फोटो त्यांनी काढले नाहीत. खोडे यांच्या मुलांनी स्वतः सॅनिटायझरची फवारणी करत परिसर निर्जंतूक करण्यावर भर दिला. खोडे यांना या मदतकार्यात प्रकाश चौधरी, विलास काश्मिरे, अरुण मुनशेट्टीवार, नारायण यादव, तुषार जोशी, कै. सुहास लेंबे (काका), रमाकांत अलई आदी कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ‘खोडे कुटुंब बरोबर समाजकार्य’ हे समीकरण आहेच, त्यामुळे चंद्रकांत खोडे यांना त्यांच्या या सेवाकार्यात कुटुंबाचे मोलाचे पाठबळ प्राप्त झाले. वाटपासाठी अन्नधान्यांचे पाकीट बनविण्याकामी खोडे यांचे नातलग, मुळे, मित्रपरिवार यांनी हातभार लावला. त्यांच्या मुली, पत्नी, भावजई, पुतणी यांनी या कामात स्वतःला अक्षरश: झोकून दिले. खोडे व त्यांचे कुटुंब कुंभमेळा, श्रावणातील तिसरा सोमवार आदी महत्त्वाच्या वेळी कायमच समाजकार्यात हिरिरीने सहभागी होत असतात, त्यामुळे कोरोनाचा धोका असूनदेखील सामाजिक जाणिवेतून खोडे यांचे कुटुंब या कार्यात अग्रेसर होते.

 
 
 
chandrakant khode _1 
 
 मानवाने वैज्ञानिक क्षेत्रात प्रगतीचे अनेक उच्चांक गाठले आहेत. पाण्याखालून जाणारी व्यवस्था देखील विकसित केली आहे. मात्र, निसर्ग हा सर्वोपरी आहे. माणसे ही पैसे कमविण्याच्या नादात मनुष्यधर्माला विसरत असल्याचे दिसून येते. मानवधर्म हाच खरा धर्म असून तो आपण जोपासणे आवश्यक आहे. संत गाडगे महाराज यांनी तसा आदर्श निर्माण केला आहे. गरजवंताला कायम मदत करणे आवश्यक आहे.
 
 
 

चंद्रकांत खोडे यांना या कार्यासाठी पक्षपातळीवरून मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्यात माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, महापौर सतीश कुलकर्णी, नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांची साथ बहुमोल असल्याचे खोडे आवर्जून सांगतात. कार्य आणि कार्याचा हेतू, असे दोन्ही उत्तम असल्यास त्यास सगळ्यांचीच साथ ही लाभत असते. खोडे यांच्याबाबतीत नेमके हेच घडले. सरकारी यंत्रणेचे सहकार्यदेखील खोडे यांना उत्तमरीत्या लाभले. मदतकार्यात आणि त्यासाठीच्या आवश्यक त्या दळणवळणात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने पास देऊ केले होते. तसेच नाशिक महानगरपालिकेच्या मार्फत ‘सोडियम हायड्रोक्लोराईड’ची फवारणी केली. नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्याकामी मनपा कर्मचार्‍यांची उत्तम साथ लाभली.

 
 
 

उन्हाचा प्रचंड तडाखा आणि सुरुवातीच्या काळात सर्वांनाच करण्यात आलेले प्रतिबंध हेच मोठे आव्हान खोडे यांच्यासमोर होते. लोकप्रतिनिधींना मदतीसाठी परवानगी मिळावी, यासाठी खोडे यांनी प्रशासनातील अधिकार्‍यांची भेट घेतली. नागरिक मदतीसाठी विचारणा करत असल्याची बाब त्यांनी या अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली व परवानगी प्राप्त करत त्यांनी या आव्हानाचा सामना केला, तसेच आर्थिक अडचणीसाठी उद्योगपतींची मदत त्यांनी घेतली. मदतकार्य करत असताना खोडे यांना अनेक भावनिक प्रसंगांना सामोरे जावे लागले. हातावर पोट असणारे अनेक मजूर, घरकाम करणारे नागरिक अशा अनेकांची या काळात दैन्यावस्था झाली होती. मदतकार्य करत असताना खोडे हे शिवाजीवाडी व निकुळेवाडी या सेवावस्तीमध्ये गेले असता, तेथे त्यांना एक महिला व तिचा गतिमंद मुलगा हे दोन दिवसांपासून उपाशी असल्याची बाब समोर आली. ते केवळ पाणी पिऊन मागील दोन दिवसांपासून आपले पोट भरत असल्याचे खोडे यांना समजले. ते पाहून खोडे यांचे मन विदीर्ण झाले. या प्रसंगाने खोडे यांचे मन अक्षरश: हेलावून गेले. खोडे व त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी केलेले मदतकार्य हे या काळात अनेकांच्या जीवनाला आधार देणारे ठरले.

@@AUTHORINFO_V1@@