रुग्णसेवेचा पाईक

09 Dec 2020 19:35:23

Satyavan Nar_1  
 
 
 
‘जे का रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले॥ तोचि साधु ओळखावा। देव तेथेंचि जाणावा॥’ तुकोबारायांच्या या अभंग पक्तींचा प्रत्यय समाजातील अनेक माणसं प्रत्यक्ष कृतीमधून अमलात आणत आहेत. समाजातील अशाच रंजल्या-गांजल्या लोकांना आपले मानून त्यांच्यासाठी प्रसंगी देवाप्रमाणे धावणारे एक व्यक्ती म्हणजे ‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’चे संस्थापक सत्यवान नर. त्यांनी हाती घेतलेल्या समाजकार्याचा वसा खऱ्या अर्थाने ‘कोविड’ संक्रमणाच्या काळात लोकहितास पडला.

सत्यवान नर
ट्रस्ट : जीवन प्रबोधिनी ट्रस्ट
पद : संस्थापक
राजकीय पक्ष : भाजप
संपर्क क्र. : ९८९२२ २२२३१

कोरोना संक्रमणाच्या गेल्या सात महिन्यांच्या काळात खऱ्या अर्थाने समाजातील माणुसकीचे दर्शन झाले. ‘कोविड’सारख्या गंभीर आजारात स्वत:ला संक्रमणाचा धोका असतानाही सत्यवान नर यांनी रुग्णसेवा केली. या कठीण काळात आरोग्य सुविधांसाठी रुग्णांची लूट चालू असताना त्यांनी अनेक सेवा रुग्णांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिल्या. मग त्या रुग्णवाहिकांच्या स्वरूपात असो वा उपचार, शस्त्रक्रिया, अल्पोपाहार आणि तत्सम. अतिआवश्यक सेवेतील पालिका, पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची विशेष सेवा त्यांनी केली. सतत कार्यरत असणाऱ्या या लोकांच्या उदरभरणासाठी हजारो अल्पोपाहार पाकिटांचे वाटप केले. पूर्वीपासूनच नर यांच्याकडून सुरू असलेल्या या लोकहिताच्या कामाचे कौतुक महाराष्ट्राचे यशस्वी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केले आहे. नर यांनी ‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’ची अधिकृत नोंदणी दोन वर्षांपूर्वी केली. मात्र, गेल्या सात ते आठ वर्षांपासूनच त्यांचे समाजकार्य हे वेगवेगळ्या माध्यमांमधून सुरू आहे. ‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’ संपूर्ण महाराष्ट्रभर खास आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करते. नर यांना सामाजिक कार्याची दिशा आपल्या रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून मिळाली. या ठिकाणीच त्यांच्या समाजकार्याचा पाया रचला गेला. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात काम करत असतानाच त्यांनी आपल्या सामाजिक कार्यांना प्रारंभ केला. सुरुवातीस मुंबई महानगरापुरता मर्यादित असणारा त्यांच्या लोकोपयोगी कामाचा विस्तार त्यांची जन्मभूमी कोकणपर्यंत विस्तारला. त्यांच्या मुक्त हस्ते काम करण्याच्या गुणधर्मामुळे अवघ्या महाराष्ट्रातून त्यांना मदतीसाठी विचारणा होऊ लागली. अशावेळी मागेपुढे न पाहता, नर यांनी सढळ हस्ते लोकांना खास करून गरजू रुग्णांना मदत करून आपल्या कामाचा कार्यविस्तार महाराष्ट्रभर पसरविला.
 
‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’च्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात आदिवासी पाड्यातील गरजू विद्यार्थ्यांपासून केली. बदलापूर येथील थारोळ-वांगणी गावातील आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप हे नित्यनियमाने गेल्या सात ते आठ वर्षांपासून करत आहेत. याशिवाय ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या विचारांनी पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी वृक्षरोपणाची मोहीम हाती घेतली. रुग्णांना मिळणाऱ्या अपुऱ्या आरोग्य सुविधांबाबत ते सुरुवातीपासून सजग होते. मुंबईत लालबाग परिसरात वास्तव्यास असल्याने केईएम, टाटा रुग्णालयांशी त्यांचा जवळचा संबंध होता. म्हणून आरोग्य सुविधांमधल्या त्रुटी लक्षात घेऊन त्यांनी रुग्णसेवेच्या कामाचा वसा उचलला. याच कालावधीत त्यांची भेट केईएम रुग्णालयात साताऱ्यातील नागजरी गावचे ट्रक डायव्हर संभाजी भोसले यांच्याशी पडली. त्यांचा मुलगा यशराजला ‘एबस्टिन्स अ‍ॅनामॉली’ हा हृदयाचा दुर्धर विकार झाल्याचे निदान झाले होते. यासाठी होणारी शस्त्रक्रिया किचकट आणि खर्चिक होती. अशा परिस्थितीत भोसले यांना खासगी रुग्णालयांचा खर्च परवडणारा नव्हता. दुसरीकडे मुंबईतही त्यांचे परिचयाचे कोणीच नव्हते. तरीही त्यांनी मुंबई गाठली. केईएमचा अवाढव्य विस्तार पाहून ते भांबावले. कोणत्या डॉक्टरांकडे जायचे हेही त्यांना समजत नव्हते. सुदैवाने त्यांची भेट नर यांच्याशी झाली. भोसले यांची बिकट आर्थिक परिस्थिती पाहून नर यांनी आपल्या संस्थेच्या मदतीने त्यांना मदतीचा हात दिला. ‘राजीव गांधी जीवनदायी योजने’च्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नर यांनी त्यांना पुरेपूर मदत केली. यामुळे यशराजवर मोफत शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आणि त्याला नवे जीवदान मिळाले.
 
 
 
Satyavan Nar_1  
 
 

"लालबाग-परळसारख्या गिरणगावातच लहानाचा मोठा झाल्याने, राबणाऱ्या आणि कष्टकरी लोकांसोबत मी दिवस घालवले. त्यामुळे त्यांच्या छोट्या-छोट्या समस्यांची मला जाण होती. रंगारी बदक चाळ गणेशोत्सव मंडळाची, मित्रपरिवाराची साथही आहेच. शिवाय, प्रकाश आमटे यांच्यासारखी समाजासाठी राबणारी थोर मंडळी अप्रत्यक्षपणे माझ्यासाठी दिशादर्शकासारखीच आहेत."

 
 
अशाप्रकारे रुग्णांना योग्य दिशा दाखवून त्यांना मदत करण्याचे काम ‘जीवन प्रबोधिनी ट्र्स्ट’च्या माध्यमातून नर करतात. उपचाराच्या खर्चाचे पत्र मुख्यमंत्री कार्यालय आणि मंदिरांपर्यंत मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे काम नर कोणताही हेतू न बाळगता करत आहेत. शिवाय, मेडिकल फंडही मिळवून देण्याचे काम त्यांची ट्रस्ट करते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक गरजूंना अशा प्रकारे मदत करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे काम त्यांनी केले आहे. शिवाय, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टसारख्या लोकांची मदत करणाऱ्या धार्मिक ट्रस्टपर्यंत गरजूंना पोहोचविण्याचे काम ते आजतागायत करत आहेत. रुग्णांना आर्थिक गरजांसोबत त्यांच्या मानसिक, भावनिक गरजाही पूर्ण कराव्या लागतात. सण-उत्सवांच्या काळात दुर्धर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या लोकांना कुटुंबाची गरज असते. या आनंदोत्सवाच्या काळात रुग्णांच्या भावनाही त्यामध्ये गुंतलेल्या असतात. अशावेळी नर आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून विविध आरोग्य केंद्र, रुग्णालयांमध्ये जाऊन दिवाळीसारखे सण रुग्णांसोबत साजरे करतात. टाटा कर्करोग रुग्णालय, दादर येथील संत गाडगेबाबा ट्रस्ट येथील कर्करोगग्रस्त लहान मुलांसोबत ते दिवाळीचा उत्सव साजरा करतात. यावेळी लहान मुलांसोबत विविध खेळ खेळून त्यांना बक्षीस, खाऊ आणि भेटवस्तू देतात. सर्वत्र दिवाळी सुरू असताना या मुलांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, हा यामागे मुख्य उद्देश असल्याचे नर सांगतात. ‘कोविड’ संक्रमणाच्या या गेल्या सात महिन्यांमधील काळात रुग्णांना आरोग्यसेवेची अत्यंतिक गरज जाणवली. त्यावेळेसही नर पाय घट्ट रोवून आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांच्या पाठीशी उभे राहिले. महिनाभर त्यांनी आरोग्य, पालिका तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना पहाटेच्या अल्पोपाहाराचे वाटप केले. महिनाभराच्या कालावधीत त्यांनी जवळपास सात ते आठ हजार अल्पोपाहाराची पाकिटे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली. त्यानंतर रुग्णालयांमध्ये फळवाटपाचे काम केले. ५०० फळांच्या टोपल्या त्यांनी विविध रुग्णालयांमध्ये पाठविल्या.
 
नर यांनी रुग्णांसाठी रुग्णवाहिकांचे नियोजन मोफत स्वरूपात करून दिले. यासोबतच गृहनिर्माण संकुलांमध्ये सॅनिटायझर, हॅण्डवॉश वाटपासह जंतुनाशक फवारणीचे काम केले आहे. नर यांच्या या सेवाकार्यात अमित पवार, हेमंत मकवाना, श्रेयस घाटकर, विनायक यंढे, रवींद्र जाधव, गणेश श्रीरसागर, तुषार घाडी, नवनाथ पानसरे, नागेश तांदळेकर, अविनाश पवार, गणेश काळे, दयानंद घाडी, दत्ता कोरडे, प्रवीण पावस्कर, विजय चौरसिया, दत्तात्रेय माने, प्रशांत हांदे, रोहन परब, विनायक यंदे, संतोष सकपाळ, संदीप सकपाळ, सिद्धेश साळवी या सहकाऱ्यांची मदत मिळाली आहे. त्यांच्या ‘कोविड’काळातील कार्याचा गौरव चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही केला आहे. या सर्व कार्यात नर यांना लाखो रुग्णांचे आशीर्वाद मिळाले आहेत. लोकांचा विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी झाले असून, यापुढेही लोकहिताच्या कार्याची ही दिंडी सतत राबणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0