भारत बंद : सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी चर्चेची दारे खुली

08 Dec 2020 17:25:15

bharat band_1  


गेल्या तेरा दिवसांपासून दिल्लीच्या सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तीन कृषी विधेयक पूर्णपणे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत.आता हा बंद खरचं शेतकऱ्यांनी पुकारला होता की राजकीय पक्षांनी यासह आज दिवसभरात काय घडले यावर आपण एक नजर टाकणार आहोत....


केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अॅडव्हायझरी जारी करण्यात आली होती यानुसार सर्व राज्यांना कायदा व्यवस्था राखण्याचं आवाहन यात करण्यात आलं होतं. याबंद दरम्यान अनुचित घटना घडू नये यासाठी व्यवस्था निश्चित करण्याचे निर्देशही केंद्राकडून देण्यात आले होते. बर्‍याच राज्यात भारत बंदचा कोणताही परिणाम दिसला नाही अनेकांनी स्वेच्छेने आपली दुकाने खुली ठेवली. त्रिपुरामधील सर्व दुकाने व बाजारपेठा खुल्या होत्या. दिल्लीतही सत्ताधारी आम आदमी पक्षाने बंदला पाठिंबा दर्शविला होता मात्र दिल्लीतलं चित्र वेगळं होतं. दिल्लीतील दुकाने बाजारपेठा सुरूच होता.दक्षिण भारतात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. पुडुचेरीमध्ये द्रमुक आणि कॉंग्रेसने मिळून विरोध दर्शविला. तामिळनाडूत भारत बंदला फारसा पाठिंबा मिळालेला नाही. विरोधी पक्षांनी केलेल्या आवाहनानंतरही ट्रेड युनियन्सनी बाजार उघडले.हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशात बाजार उघडले आहेत. मुंबईतील डबेवाल्यांच्या संघटनेने शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे.बिहार, आसाम, कर्नाटक या राज्यांमध्ये शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा मिळाल्याचं चित्र आहे.

आता महाराष्ट्रात काय परिस्थिती होती हे पाहूया. महाराष्ट्रात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने बंदला पाठिंबा दर्शविला होता. राज्यातील काही शेतकरी नेतेदेखील या बंदला पाठिंबा दर्शवित दिल्लीत आंदोलनासाठी गेले आहेत, मात्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार वगळता इतर सर्व व्यवहार सुरु होते. मुंबईतील दुकाने खुली राहिली आणि लोकही दैनंदिन कामावर हजर राहिले.विदर्भातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना बाजारात आज बहुतांशी व्यवहार सुरु होते.सकाळी भाज्यांचे आणि दुपार पासून धान्याचे खरेदी विक्री व्यवहार सुरळीत असल्याचे आज पाहायला मिळाले.यादरम्यान शरद पवार यांनी दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना ऑगस्ट २०१०मध्ये लिहिलेल्या पत्राची बरीच चर्चा सुरू होती. कृषी कायद्यासंदर्भात खासदार, माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी केलेलं वक्तव्य आणि पत्रव्यवहार सोशल मीडियावर चर्चेत आहे. कृषी कायद्यासंदर्भात पवारांनी घूमजाव केल्याचंही काहींचं म्हणणं आहे. याबाबत भारत बंदवेळी पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.माझं ‘ते’ पत्र त्यांनी नीट वाचलं असतं तर त्यांना कळलं असतं असं शरद पवार म्हणाले मात्र यावेळी वारंवार पत्रावरून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर त्यांनी रोष व्यक्त केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे देखील आता आंदोलनात उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अण्णा हजारे यांनी १ दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. गोव्यात भारत बंदचा परिणाम दिसून आला नाही. गोव्यातील सर्व बाजार आणि सार्वजनिक वाहतूक सुरळीत सुरु होते. शाळा सुरु होत्या. तसेच ज्यांचा कृषी कायद्यांना विरोध आहे असे राजकीय पक्ष आणि कामगार संघटना पणजीमध्ये आजाद मैदानावर आंदोलन करत आहेत.
आज शेतकरी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात ७ वाजता बैठक होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यास शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तयारी दर्शवली असून एकूण १५ शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी अमित शाह यांची भेट घेणार आहेत. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी ही माहिती दिली. टिकैत यांनी सांगितलं की ते सर्वांत आधी सिंघू बॉर्डरवर जातील. तिथून ते काही नेते आणि शेतकऱ्यांची भेट घेतील.
Powered By Sangraha 9.0