माणुसकीची भिंत

08 Dec 2020 17:46:23

khade_1  H x W:



कोरोना संकटात मजूर, विद्यार्थी तसेच अन्य लोकांना जेवणाची सोय करण्यापासून ते रुग्णांना ऑक्सिजनची सोय, रक्तदान शिबिरांचे पिंपरी-चिंचवड मनपाचे नगरसेवक राहुल खाडे यांनी आयोजन केले. तसेच आपल्या प्रभागात वेगवेगळ्या लोकोपयोगी योजनाही राबविल्या. त्यांनी केलेल्या समाजकार्याचा प्रभागातील हजारो नागरिकांनी लाभ घेतला. तेव्हा, आपल्या मदतकार्याच्या माध्यमातून माणुसकीची भिंत उभारणार्‍या राहुल खाडे यांच्याविषयी...


राहुल सदाशिव खाडे
राजकीय पक्ष : भाजप
पद : भाजयुमो, उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर
प्रभाग क्रमांक : २०, संत तुकारामनगर, नगरसेवक
संपर्क क्र. : ९५६१८०९०९०

भारतात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना २३ मार्च, २०२० ‘लॉकडाऊन’ घोषित झाले. नंतरचा काळ सर्वांसाठीच खूप कठीण होता. लोकांना दोन वेळच्या जेवणाचीदेखील चिंता वाटू लागली होती. ‘लॉकडाऊन’मध्ये भीतीपोटी, काळजीपोटी सामान्य जनता घरीच बसून होती. हाताला काम नाही. त्यामुळे कुटुंब जगवायचे तरी कसे, अशा असंख्य विचारांनी गरीब आणि मध्यमवर्गीयही त्रस्त होते. पण, कोरोना महामारीत सामान्यांचा आधार म्हणून पिंपरी-चिंचवड शहराचे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल खाडे हे समाजातल्या लोकांच्या मदतीसाठी उभे राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लॉकडाऊन’ जाहीर केल्यानंतर लोकांमध्ये कोरोना विषाणूमुळे प्रचंड घबराट निर्माण झाली होती. सुरुवातीचे एक-दोन दिवस नक्की काय होतंय, हेच समजण्यामध्ये गेले. पण, समाजसेवेचा वसा घेऊन काम करण्याचे खाडे यांनी ठरविले. कोरोनाच्या या महामारीत सापडलेल्या लोकांना दिलासा मिळावा, यासाठी राहुल खाडे आणि सर्व कार्यकर्ते मिळून मैदानात उतरले. पिंपरी-चिंचवड शहराचे लाडके आमदार लक्ष्मणराव जगताप आणि शहराध्यक्ष महेशदादा लांडगे, वडील सदाशिवराव खाडे, सचिन पटवर्धन आणि सर्वांचे या मदतकार्यात खाडे यांना मार्गदर्शन लाभले. या सर्वांच्या पाठिंब्यामुळे मोठ्या प्रमाणावर विविध योजनांच्या माध्यमातून सेवा देता आल्याचे खाडे सांगतात.


‘लॉकडाऊन’ काळामध्ये ज्यांच्या जेवणाची सोय होत नव्हती, अशा लोकांसाठी सगळे कार्यकर्त्यांनी मिळून प्राधान्याने दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था उभी केली. यामध्ये भात, भाजी, पोळी देत लोकांना पोटभर अन्न खायला मिळेल, अशी व्यवस्था केली आणि जेवण पोहोचविण्याचीही यंत्रणा राबविली. दिवसाला कमीत कमी २०० ते २५० लोकांपर्यंत जेवण घरपोच पोहोचविण्याची त्यांनी सोय केली. या नियोजनामध्ये सर्व वरिष्ठ राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी हातभार लावला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या समाजसेवारूपी उपक्रमामध्ये सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे आपले कर्तव्य बजावले. नगरसेविका सुजाताताई पालांडे, पिंपरी-चिंचवडचे मंडल अध्यक्ष मुन्ना बाविस्कर, तसेच प्रभाग क्रमांक २० मधील मार्गदर्शक प्रमोद मिसाळ, या सर्वांचा कार्यक्रम राबविताना हातभार लाभल्याचे खाडे सांगतात. म्हणजे कुठे सोय करावी? कशी करावी? कोणाला कसं वाटप करावं, याविषयी त्यांना वरिष्ठांकडून योग्य ते मार्गदर्शन मिळत गेले. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या नियोजनानुसार रेशन कार्डधारकांना धान्यवाटपाचाही उपक्रम हाती घेऊन गरजूंना धान्यवाटप केलं. ज्यांच्या घरात अन्न नव्हते, त्यांचीही सोय केल्यामुळे लोकांनी खाडे यांचे आभार मानले.


अचानक झालेल्या ‘लॉकडाऊन’मुळे अनेकांना गावी जाण्याची सोय नव्हती. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतील तसेच परराज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी परतण्याचीही खाडे यांनी व्यवस्था केली. त्यांना ई-पास मिळवून देणे, बसेसची सोय करणे, या माध्यमातून गरजूंना प्रवासासाठी मदत करण्यात आली. या सर्व कार्यात आम्ही त्यांच्या उपयोगी कसे पडू, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे खाडे सांगतात. राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असताना, खाडे यांनी सर्वात मोठा उपक्रम राबविला तो रक्तदान शिबीर आयोजनाचा. या शिबिरांमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंदे, खाडे यांचे प्रभागातील सहकारी सुमित घाटे, मंगेश घाडगे आणि मित्रपरिवाराने मिळून रक्तदान शिबीर आयोजित केले. दि. ६ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून रक्ताची गरज असलेल्या रुग्णांपर्यंत, त्यांच्या नातेवाईकांपर्यंत ते रक्त वेळेत पोहोचेल याची सोय करण्यात आली.


khade_1  H x W:


संत तुकाराम नगर पिंपरी-चिंचवड प्रभाग क्रमांक २० असून, या ठिकाणी विविध योजना राबविण्याचे काम आम्ही संघटनेमार्फत केले. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत राहीन. कोरोनाकाळात केलेल्या सेवेने मी समाधानी आहे. भविष्यात अनेकविध लोकोपयोगी योजना राबविण्याचे काम हाती घेणार आहे.


कोरोनाच्या या महामारीमध्ये खाडे यांनी गल्लोगल्ली, सोसायटीमध्ये जाऊन जनजागृतीपर कार्यक्रमही राबविले. म्हणजे, लोकांनी सतत हात सॅनिटायझरने धुणे, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, मास्क वापरा, ‘सोशल डिस्टन्सिंग’चे अंतर ठेवा, अशा सूचनादेखील खाडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सातत्याने दिल्या.पिंपरी-चिंचवड, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर. त्यामुळे देशाच्या, राज्याच्या कानाकोपर्‍यातून शिक्षणासाठी विद्यार्थी या शहरात दाखल होतात. अचानक झालेल्या ‘लॉकडाऊन’मुळे ते सगळे पिंपरी-चिंचवडमध्येच अडकून पडले होते. अचानक मेस बंद झाल्याने त्यांच्या जेवणाची, तसेच त्यांना घरी पाठविण्यासाठीचीही खाडे यांनी सोय केली. हे सर्व उपक्रम राबवत असताना घरोघरी जाऊन कोणाला काही कोरोना लक्षण आहेत का? याची चौकशीदेखील युवकांनी केली. त्यामुळे कोणी आजारी असेल, तर त्याची माहिती लगेच मिळत होती आणि ती माहिती प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी खाडे प्रयत्नशील होते.

या काळामध्ये ज्या नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, त्या रुग्णांना बेड उपलब्ध करून ऑक्सिजनची सोय करण्यात आली. आगामी काळात प्लाझ्मादानाचा उपक्रम हाती घेणार असून, ज्या रुग्णांना गरज असेल, त्या ठिकाणी पोहोचविण्याची आम्ही व्यवस्था करणार असल्याचेही खाडे सांगतात. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने राबविलेल्या योजनेच्या माध्यमातून प्रभाग २० मध्ये व्हिटामीनच्या गोळ्यांचेही त्यांनी घरोघरी जाऊन वाटप केले व त्या गोळ्यांचे महत्त्वही पटवून सांगितले.‘लॉकडाऊन’च्या काळात घडलेला असाच एक प्रसंग खाडे सांगतात. ते म्हणतात की, “माझ्या एका मित्राचे आजोबा आजारी होते आणि त्यांना कोरोना झाला. त्यांना बेड मिळत नव्हता. पण, संघर्ष करून तो बेड मिळवून दिला आणि त्या आजोबांचे प्राण वाचले. याचे समाधान आम्हाला आहे. कारण, अथक प्रयत्न करून आम्ही त्यांचा जीव वाचविला होता. तो प्रसंग कधीच विसरता येणार नाही.”ते पुढे म्हणतात की, “भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, पंकजाताई मुंडे यांनी आम्हाला शिकवण दिली आहे, ती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचून काम करण्याची आणि गरजूंना मदत करण्याची. या काळात मदत करताना हेच आमचे ध्येय होते.” ‘लॉकडाऊन’ व कोरोनाकाळात मिळालेली शिकवण ही खूप मोठी शिदोरी आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी राहुल खाडे आणि त्यांचा मित्र परिवार भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून नेहमी तत्पर राहिल्याबद्दल त्यांचे कौतुक!


- सुशील कुलकर्णी
Powered By Sangraha 9.0