‘कैलासा’एवढा मदतीचा ध्यास!

08 Dec 2020 20:04:28

कैलास बारणे _1  
 
कोरोनाच्या काळात काही लोक समाजसेवेचा वसा घेऊन पणतीरूपी प्रकाशाने कोरोनारूपी महाभयंकर मृत्यूच्या काळोखात प्रकाश पेरण्याचे काम करत होते. त्यापैकीच एक म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वार्ड क्रमांक २३, थेरगावचे नगरसेवक कैलास उर्फ बाबा बारणे. काळ-वेळ, दिवस-रात्र असा कुठलाही विचार न करता त्यांनी स्वत:ला मदतकार्यात झोकून घेतले. तेव्हा, त्यांनी ‘कोविड’ काळातील केलेल्या कार्याचा घेतलेला हा आढावा...


कैलास बारणे
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेवक, पिंपरी-चिंचवड मनपा
प्रभाग क्र. : २३, थेरगाव
संपर्क क्र. :९८८१३८३८२३


पिंपरी-चिंचवड शहरात १० मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. विषाणूच्या प्रादुर्भावामुळे साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली. या उद्रेकावरील उपाययोजनेचा भाग म्हणून काही अभूतपूर्व निर्णय घेण्यात आले. राज्यातील प्रवासी वाहतूक करणार्या सर्व बससेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या होत्या. जमावबंदीचा आदेश लागू होता. सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा, रेल्वे, लोकलसेवा बंद होती. संचारबंदी लागू झाली होती. राज्याच्या सर्व सीमा सील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जाण्याससुद्धा मनाई होती. सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद होती. त्याचा परिणाम महाराष्ट्रासह जागतिक स्तरावर ‘औद्योगिक नगरी’ म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील जनजीवनावरही झाला होता. कोरोनाकाळातील नियमांनुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांना घरातच बसणे सक्तीचे करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकर्यांवर गदा आली. हातावर पोट असलेल्या कामगारांची, नागरिकांची उपासमार होऊ लागली होती. अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला होता. कैलास बारणे यांनी परिस्थितीचे गांभीर्य वेळीच ओळखून मदतकार्याला प्रारंभ केला.
कोरोना या संसर्गजन्य महामारीच्या काळात जो तो आपल्या जीविताची काळजी घेत होता. सदर आजाराने मयत झालेल्या नातेवाईकांचे मुखही पाहण्यास रक्त-मासांचे सगेसोयरे जीवाच्या भीतीने त्याच्याजवळ जात नव्हते. सर्व पिंपरी-चिंचवड शहर ‘लॉकडाऊन’ झाल्याने गतप्राण झाले होते. हातावर पोट असणारे ‘काम नाही, पोट कसे भरावे?’ या विवंचनेत होते. पैसाअडका आणि गडगंज श्रीमंतही कोरोनारूपी मृत्यूच्या भयाने, या वैभवाचे करायचे काय? असे स्वतःलाच विचारत होते. अशा काळात नगरसेवक कैलास उर्फ बाबा बारणे यांनी मदतकार्याचा धडाका लावला.


अन्नधान्य व डबे वाटप


माणूस माणसाला भेटण्यास तयार नव्हता, घरात जे काही जगण्यासाठी होते, तेही संपले होते. घरातील मोठी माणसं आहे त्यातच उपाशी राहून, छोट्यांना उद्याच्या भविष्यासाठी जगत होती. कष्टकरी गोरगरीब जनता कुठून तरी कोणी परमेश्वर रूपाने भूक भागविण्यासाठी येईल, याची वाट पाहत होती. घराच्या बाहेर कोणी आरोपी मृत्यूची वाट पाहत होता, तर बंदिस्त भाड्याच्या घरात भूक माणसांना मारत होती, अशा भयावह परिस्थितीत कैलास बारणे आणि त्यांच्या सहकार्यांनी आजूबाजूच्या बिल्डिंगमधून आपल्या प्रयत्नातून तयार अन्नधान्याचे डबे बनवून घेतले. वॉर्डातील प्रत्येक भुकेकंगाल माणसाच्या घरी ते तयार अन्न पोहोचविण्याची व्यवस्था केली. काही कुटुंबांना शिधा पोहोचविला. अशा पद्धतीने पूर्ण ‘लॉकडाऊन’च्या काळात प्रत्येक दिवशी हजार कुटुंबांना तयार अन्नाचे डबे व धान्याचे किट आपल्या जीवाची पर्वा न करता पोहोचविण्याचे काम कैलास बारणे व त्यांच्या मित्रपरिवाराने केले. माणूस जेवला व जगला पाहिजे, हे बाबांचे स्वप्न अत्यंत स्तुत्य आहे.

मंगल कार्यालय बनले भाजी मंडई

वॉर्ड क्र. २३ थेरगावातील कैलास बारणे यांचे कैलास मंगल कार्यालय बारणे यांनी ‘लॉकडाऊन’च्या काळात भाजीमंडईसाठी दिले. ‘लॉकडाऊन’ दिवसांतून काही काळ शिथिल असताना प्रभागातील नागरिकांना ताजा व स्वस्त भाजीपाला मिळावा, तर व्यापार करू इच्छिणार्यांना भाजीपाला विक्रीतून रोजगार मिळविता यावा म्हणून आपल्या स्वतःच्या मंगल कार्यालयात शासनाचे आदेश पाळून बारणे यांनी भाजी मंडईची व्यवस्था केली.

मशीद-मंदिरात औषध फवारणी

‘जीव हमारी जाती हैं, मानवधर्म हमारा, हिंदू, मुस्लीम, सीख, ईसाई धर्म नही न्यारा।’ जीवही जात व मानवता हाच धर्म समजून कैलास बारणे आणि त्यांच्या सहकार्यांनी थेरगाव परिसरातील मशीद, मंदिर परिसरात स्वतः ट्रॅक्टरवर बसून निर्जंतुकीकरणासाठीची फवारणी केली.


कोरोनाकाळात कार्यालय २४ तास उघडे

कोरोना महामारीच्या काळात एकीकडे अशी समाजसेवा करीत असताना आणि अनेक सदस्य कोरोना महामारीशी रुग्णालयात लढत असताना, लोकांच्या अडचणीला उपयोगी पडावे म्हणून बारणे हे सतत कार्यालयातच दिवसातील २४ तास लोकसेवेसाठी तत्पर होते.



कैलास बारणे _1  

समाजाचा एक घटक म्हणून आवश्यक उपाययोजना करण्यास आम्ही कोरोनाच्या काळात तत्काळ सुरुवात केली. ‘मी, सगळा अंधार दूर करू शकणार नाही. पण, तेवत राहीन. प्रकाशाने अंधार भेदला जातो. यावर लोकांचा विश्वास जागा ठेवेन,’ यावर विश्वास ठेवत मी कार्यरत राहिलो.


कोरोना योद्धांना सहकार्य

कोरोनाकाळात प्रत्यक्ष काम करणार्या डॉक्टर, परिचारिका, शिक्षक, पोलीस, मनपा कर्मचारी यांना आपल्या सहकार्यांमार्फत व आपण स्वतः अनेक प्रकारे मदत केली.शिधापत्रिकाधारकांना रेशन मिळालेच पाहिजे.कोणत्याही रंगाचे रेशन कार्ड असले, तरी शिधापत्रिकाधारकांना कोठेही आणि केव्हाही रेशन मिळाले पाहिजे, यासाठी प्रत्यक्ष दुकानावर जाऊन ते बसत व योग्य रेशन मिळते का, याची खात्री करून घेत.

प्रवाशांची सोय

गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटकसह, राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यामधून अलेले नागरिक ‘लॉकडाऊन’ काळात शहरात अडकून पडले होते. पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाच्या मदतीने पाठपुरावा करून नागरिकांना पासेस उपलब्ध करून दिले. त्यांच्या या मदतकार्याला गरजूंचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि बारणे यांच्या कार्याचे सगळ्यांनी तोंडभरुन कौतुकही केले.


- सुशील कुलकर्णी 

Powered By Sangraha 9.0