मदतीची ‘तेजस’ एक्सप्रेस

08 Dec 2020 13:39:04

TEJAS _3  H x W





पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी प्रभाग क्र. २० मध्ये सेवाकार्य हाती घेतले. कोरोना व त्यामुळे आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे अनेकांना मदतीची गरज होती. यावेळी तेजस कांडपिळे यांनी स्वत:च्या मदतीसह लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदत ही प्रभागात दिली. कोरोना रुग्णांच्या कुटुंबाला धीर देऊन त्यांना आत्मविश्वास दिला. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
 
 

नाव : तेजस कांडपिळे
 
पक्ष : भाजप
 
पद : माजी भाजप युवा मोर्चा पनवेल शहर चिटणीस
 
प्रभाग क्र. : २०, नगरसेवक, प्रभाग ‘ड’ अध्यक्ष
 
संपर्क क्र. : ९८२१३४६९०५
 
कोरोना काळात महापालिकेकडून अनेक वेळा व्यक्ती बरी झाल्यानंतर १५ दिवसांनी ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या यादीत नाव यायचे. त्यावेळी लोक नाराजी व्यक्त करीत. एकदा तर प्रभाग २० मधील पोदीवरील एका व्यक्तीचा काविळीने मृत्यू झाला असताना, त्याचे नाव कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या यादीत आले. त्यावेळी नातेवाईकांनी तक्रार केल्यावर तेजस कांडपिळे यांनी उपायुक्त संजय शिंदेंना सांगून दुसर्‍या दिवशी रिपोर्टमध्ये दुरुस्तीची टीप द्यायला लावली. त्यानंतर कुठे नातेवाईकांचा राग शांत झाला होता.
 
 
 
एखाद्या कुटुंबातील कर्ता माणूस ‘पॉझिटिव्ह’ आला आणि त्या घरात वृद्ध माणसे असली की घरातील सगळे घाबरून जात. आता कसे होणार, अशा वेळी त्यांना धीर देऊन तुम्ही घाबरून जाऊ नका. आपण पालिकेच्या माध्यमातून चांगली औषधे देऊन आठ-दहा दिवसांत त्यांना बरे करू, असा धीर तेजस कांडपिळे यांनी दिल्यावर त्यांना बरे वाटायचे. त्यांना आत्मविश्वास मिळायचा. सोसायटीतील माणसांचा ‘पॉझिटिव्ह’ रुग्णाच्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा. यावेळी सोसायटीतील लोकांना तेजस कांडपिळे स्वतः समजावून सांगायचे.
 
 
नगरसेवक तेजस कांडपिळे हे महापालिकेच्या प्रभाग क्र. २० मधून भाजपतर्फे निवडून आलेले आहेत. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्र. २० मध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. कोरोना काळात पनवेल महापालिका प्रभाग ‘ड’चे ते अध्यक्ष होते. ‘लॉकडाऊन’ झाल्यावर पोदी स्मशानभूमीसमोर ३०-३५ खोल्यांत मजुरी करणारे कामगार राहतात. रोज काम करून मिळणार्‍या मजुरीवर संध्याकाळी त्यांची चूल पेटते. त्यांनी येऊन, “आता आम्ही काय करायचे? काय खायचे? आमच्या मुलांना खायला काही नाही, ती रडत आहेत,” असे सांगितल्यावर तेजस कांडपिळे यांनी स्वत: त्यांची खाण्याची व्यवस्था केली.
 
 
त्यानंतर आ. प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत रामशेठ ठाकूर विकास मंडळाकडून दोन वेळा रेशन, धान्य, तेल, साखर, कांदे-बटाटे दिले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल भाजपच्या वतीने गरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू झाल्यावर या महत्त्वपूर्ण उपक्रमात हातभार लागावा, यासाठी त्यांनी ३० हजार रुपयांची मदत तसेच नगरसेवकपदाचे दोन महिन्यांचे मानधन त्यांनी महापौर निधीला दिले.
 
 
 

TEJAS _2  H x W 
 
‘’गरजेला हाक मारून आलात, साथ दिलीत हेच खूप मोठे आहे, असे मला अनेक जण भेटून सांगतात, त्यावेळी समाधान मिळते. आजही कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळूनच काम केले पाहिजे, मास्क वापरला पाहिजे. मुख्य म्हणजे, कोरोनासोबत जगण्याची सवय करणे आवश्यक आहे.”
 
पनवेल तालुक्यात औद्योगिक वसाहत, उरणला जेएनपीटी बंदर आणि नवी मुंबईला घाऊक बाजारपेठ असल्याने इतर राज्यांतील वाहनचालक मोठ्या प्रमाणात आपल्या वाहनातून माल घेऊन येत असतात. त्यापैकी अनेक जणांना कोरोनाची लक्षणं दिसल्याने रुग्णालयात दाखल केले जात होते. पण, रुग्णालयात त्यांना लागणारी औषधे उपलब्ध नसल्याने बाहेरून आणायला सांगितली जात असत. अनेक चालकांजवळ पैसे नसल्याने त्यांना आणता येत नसत. पण, त्यांच्यावर वेळेवर उपचार न झाल्यास आपल्या परिसरात संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने त्यांना औषधे उपलब्ध करून दिली. याशिवाय अन्नधान्यवाटप, ‘मोदी किचन’च्या माध्यमातून भोजन वाटप, सॅनिटायझर, ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्या, मास्क, अशी मदत करण्याबरोबरच परप्रांतीयांना गावी जाण्याकरिता मदत, स्वच्छता मोहीम, डॉक्टर, परिचारिका, आशासेविका आदींचा सन्मान करून त्यांच्या कार्याप्रति आदर व्यक्त केला.
 
 
नगरसेवक तेजस कांडपिळे यांना पनवेलच्या तहसीलदारांकडूनही चांगले सहकार्य मिळाले. त्यांनी तेजस कांडपिळे यांच्याकडून प्रभाग २० मधील झोपडपट्टीतील रहिवाशांच्या कुटुंबांतील माणसांची यादी घेऊन रोज २००-२५० लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. अनेक भाड्याच्या घरात राहणार्‍या मध्यमवर्गीयांची नोकरी गेल्याने ते भाडे देऊ शकत नव्हते, त्यांच्या घरात खायला शिल्लक नव्हते, अशा गरजू लोकांची यादी आनंद भुजबळ, हरेश भुजबळ, साहिल मोरे, समीर मोरे, विजय भुजबळ व इतर कार्यकर्ते यांच्यामार्फत मिळवून महापालिकेच्या अधिकार्‍यांना देऊन तेजस कांडपिळे यांनी त्यांना मदत मिळवून दिली.
 
 
उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब टेस्ट केल्यावर ४८ तासांनी रिपोर्ट मिळायचा, तोपर्यंत टेस्ट केलेली व्यक्ती प्रचंड तणावाखाली असायची. अनेक वेळा रिपोर्ट वेळेवर मिळत नव्हते. ४८ तासांनी ती व्यक्ती रिपोर्ट न्यायला यायची ती ‘पॉझिटिव्ह’ असल्यास तोपर्यंत अनेकांच्या संपर्कात येत असे. ही बाब लक्षात आल्यावर आ. प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर आणि अधिकार्‍यांशी बोलून ‘पॉझिटिव्ह’ व्यक्तीला फोन करून माहिती द्यावी, ज्याला फोन आला नाही तो ‘निगेटिव्ह’ आहे असे त्याने समजावे, अशी व्यवस्था करण्याचे सुचविले. त्याप्रमाणे रुग्णालयातून माहिती देण्यास सुरुवात झाली. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी झाला. खासगी रुग्णालयांत अनेक वेळा रुग्णांकडून जास्त बिल आकारले जात होते. त्याबाबत तक्रार येताच डॉक्टरांशी बोलून ते कमी करून देण्याचे कामही करावे लागत होते.
 
  
कोरोनामध्ये काम करताना तेजस कांडपिळे यांना घरातूनही चांगले सहकार्य मिळाले. त्यांचा भाऊ कृपेश त्यांच्या कार्यात सहभागी होऊन मदत करीत होता. पत्नीचीही साथ होती. आईवडील ज्येष्ठ नागरिक असल्याने प्रत्यक्ष सहभागी झाले नाहीत, तरी त्यांचा कामाला पाठिंबा होता. या सगळ्यांचे फक्त एकच म्हणणे होते की, “लोकांची सेवा करण्याचे चांगले काम करीत आहेस, त्यांचे आशीर्वाद तुला मिळतील. पण, काम करताना काळजी घे. ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळ, सॅनिटायझरचा वापर कर, काळजी घेतलीस तरच तुला लोकांची सेवा करता येईल.”
 
 
- नितीन देशमुख
Powered By Sangraha 9.0