इच्छुक राष्ट्रपतींचे विधान

06 Dec 2020 22:26:17

Rahul Gandhi_1  



पावसात भिजल्यापासून काकांना वेगळे वलय प्राप्त झाले आहे. आताही कृषी कायद्याबाबत ते पंतप्रधान किंवा कृषिमंत्र्यांना न भेटता थेट राष्ट्रपतींना भेटणार आहेत. कुणी म्हणेल की, मग काय झाले भेटले तर; तेही पंतप्रधानच आहेत. फक्त पंतप्रधानांच्या पुढे ‘इच्छुक’ लावले की झाले. दुसरे असे की भावी पंतप्रधान, ‘इच्छुक’ पंतप्रधानांच्या कधीही पूर्ण न होणार्‍या स्वप्नात आता महाराष्ट्राचे ‘बेस्ट सीएम’ आहेत. उगीच या भावी पंतप्रधानांच्या रांगेत का तिष्ठत राहायचे? म्हणून ते आता कदाचित ‘भावी राष्ट्रपती’ झाले असावेत. मग राष्ट्रपतींचे कार्य पाहायलाही ते गेले असतील. काहीही असो, शरदकाका आपल्या ‘कारवाया’, चुकलं चुकलं आपले ‘कार्य’ करतच असतात. आताही ते म्हणाले की,“राहुल गांधी यांच्या राजकारणात सातत्य नाही.” यावर म्हणे काँग्रेसवाले चिडले आहेत. त्यातही यशोमती ठाकूर यांनी तर निर्वाणीचा इशारा दिला की, “महाविकास आघाडी टिकवायची असेल, स्थिर ठेवायची असेल तर आमच्या नेत्यांवर टीका करू नका.” तर ‘लोकल चाणक्य’ (तेही स्वयंघोषित) म्हणाले की, “शरद पवार ज्येष्ठ असून त्यांनी वडीलकीच्या नात्याने सूचना दिल्या.” असो, महाविकास आघाडी ज्या संकल्पनेवर बनली, ती संकल्पनाच केवळ आणि केवळ सत्ताभूक होती. अरे हो, पण असे म्हणणेही चुकीचेच. कारण, काँग्रेस पक्षाचे आदर्श नेते अशोक चव्हाण यांनी तर स्पष्ट सांगितले होते की, पक्षाच्या मुस्लीम मतदारांना खूश करण्यासाठी भाजपला सत्तेबाहेर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे महाविकास आघाडीची बेचव खिचडी शिजली. शरद पवार काकांना त्यांच्या सत्तेत सहभागी झालेल्या राहुल गांधींच्याबाबत सर्वेक्षण घेतल्यावर काय चित्र असेल? याचा अंदाज दस्तूरखुद्द काँग्रेसच्या नेत्यांनाही आहे. मात्र, घराणेशाहीच्या पडक्या वाड्याची कबर सजवणे हा संधीसाधू राजकारणाचा एक भाग असतो. मात्र, या परिप्रेक्षात राहुल यांच्याबाबत जे शरदकाका बोलले, ते राहुलसकट राजकारणात दुसरी-तिसरी पिढी म्हणून घराणेशाहीच्या वारसदार असणार्‍या सगळ्यांचे वास्तव हेच आहे. इच्छुक पंतप्रधान, राष्ट्रपती असणार्‍या शरदकाकांच्या विधानाला अनेक अर्थ-अनर्थ आहेत, हे नक्की!
 
 

‘बालिश’ मुखवटा : थोतांड

 
 
कुठे काही अराजक दिसले की तिथे ‘हे’ दिसलेच पाहिजेत. मागे उत्तर प्रदेशामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला. त्यावेळीही वाल्मिकी समाजाची मुलगी, दलितांवर अत्याचार वगैरे वगैरे विद्वेषाची बीजे पेरण्याचा प्रयत्न यांनीच केलेला. खरेतर यांची छबी ‘बालिश’ वगैरे वगैरे रंगविली जाते. पण, ज्या व्यक्तीला जानवे, क्रॉस आणि जाळीदार टोपी कुठे, कधी घालावी आणि लोकांना कसे मूर्ख बनवावे, हे कळते, ‘ती’ व्यक्ती ‘बालिश’ कशी असेल? खरेतर मुखवट्याआडचा चेहरा बालिश नाही. या चेहर्‍याला बरोबर कळते की, अमुक अमुक ठिकाणी गेले, अमुक अमुक ठिकाणचे समर्थन केले, तर कदाचित देशात, समाजात अराजकता माजेल. आता ‘हा’च चेहरा शेतकरी आंदोलनाचा समर्थक झाला आहे. मोदींची अतिशय आपुलकीने आदराने गळाभेट घेत आहोत, हे दाखवत त्यानंतर काही क्षणातच सहकार्‍याला डोळा मारणारा ‘हा’ चेहरा. ‘हा’ चेहरा नेहमीच विघातक आणि समाजात अस्थिरता माजवणार्‍या विषयालाच का समर्थन देतो? आताही दिल्लीला शेतकर्‍यांचे आंदोलन आहे. ते शेतकर्‍यांचे आंदोलन आहे का, असा मुळातच प्रश्न आहे. कारण, ‘इंदिरा को ठोक दिया मोदी क्या हैं’ असे म्हणणारे शेतकरी असतील का? ही सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ गोष्ट आहे. ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे भारतीय मातीतला शेतकरी देईल? ‘ना मोदी का ना योगी का’ इथपर्यंत ठीक होते, पण ‘ना राम का’ असे म्हणणारे कोणते भारतीय शेतकरी आहेत? पण, असे शेतकरी नसलेले खोटे लोक या आंदोलनात घुसले आहेत. प्रसारमाध्यमांतून हे सातत्याने दिसतेही. मात्र, तरीही वर सांगितलेल्या बालिश चेहर्‍याने या शेतकर्‍यांच्या नावावर अराजक माजवणार्‍यांना समर्थन दिले आहे. केंद्र सरकाने कृषीविषयक पारित केलेल्या बिलांबाबत सगळ्या देशभरात केवळ पंजाबचेच शेतकरी नाराज आहेत? का? याचे उत्तर तिथे जमलेल्या त्या मुखवटाधारी शेतकर्‍यांनाही माहिती नाही. आता बालिश मुखवटा या आंदोलनामध्ये जाणार आहे. या बालिश मुखवट्याने हाथरसच्या दुर्दैवी घटनेत स्वत:हून पडत हसे करून घेतले होते. हाथरसच्या घटनेतून ‘नक्षीली भाभी कनेक्शन’ जाहीर झाले होते. आता या आंदोलनातूनही यांचे कोणते ना कोणते ‘कनेक्शन’ जाहीर होईलच. तूर्त बालिश मुखवट्याचे उपद्व्याप मनोरंजन म्हणून पाहत राहू!


Powered By Sangraha 9.0