सिद्धेश्वर तलाव परिसरातील हजारो कुटुंबांना मिळणार हक्काचे घरकूल

04 Dec 2020 16:10:25

thane_1  H x W:





क्लस्टरला मंजुरी मिळाल्याने भाजप नगरसेवक नारायण पवार आनंदी



ठाणे: ठाणे महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर तलाव परिसरातील झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करणाऱ्या सुमारे २ हजार कुटुंबांचे हक्काच्या घरकुलाचे स्वप्न आता साकार होणार आहे. महापालिकेने मंजूर केलेल्या क्लस्टर आराखड्यात सिद्धेश्वर तलाव परिसराचाही समावेश झाला आहे. याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.

 
 
 

ठाणे शहरात सिद्धेश्वर तलाव हा पुरातन तलाव असुन तलावाभोवती असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये दोन हजारांहून अधिक कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. तसेच या भागात ६० ते ७० जुन्या इमारतीतही शेकडो कुटुंबे अनेक वर्षापासुन राहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून सिद्धेश्वर तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास होत असला तरी झोपड़पट्टीतील रहिवाशांना जुन्या घरातच राहावे लागत होते. या भागाचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातूनही विकास करण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या.

 
 
 

या पार्श्वभूमीवर ठाण्यात क्लस्टर योजनेची चाचपणी सुरू झाल्यावर सिद्धेश्वर तलाव परिसराचा यात समावेश करण्यासाठी नगरसेवक पवार यांच्याकडून प्रयत्न केले जात होते. अखेर सिद्धेश्वर तलाव परिसराचाही समावेश क्लस्टर योजनेत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला. या निर्णयामुळे झोपडपट्टीतील सुमारे २ हजार कुटुंबांच्या घराचा प्रश्न सुटणार आहे. त्याचबरोबर परिसरातील अनधिकृत इमारतींचाही क्लस्टरमध्ये समावेश केला जाणार आहे. त्यामुळे शेकडो कुटुंबांना अधिकृत घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Powered By Sangraha 9.0