‘आयुष्यभर साथ देणारीच माणसं निवडा, नाहीतर तास दोन तास साथ देणारी माणसे एसटी बसमध्येही भेटतात,’ असा बोलका स्टेट्स मोबाईलवर ठेवणारे, गृहनिर्माण संस्थांचे मार्गदर्शक, भाजपचे राष्ट्रीय परिषद सदस्य सीताराम राणे यांच्या सामाजिक तसेच धार्मिक कर्तृत्वाचा आलेख मांडताना शब्दही थिटे पडतील.
’अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ याप्रमाणे सतत कार्यमग्न असणार्या सीताराम राणेसाहेबांच्या कार्याचा आढावा घेताना अचंबित व्हायला होते. कोणतेही काम करताना साहेब खर्या अर्थाने रात्रीचा दिवस करतात. मनासारखे कार्य जोपर्यंत होत नाही, तोवर जीवाला स्वस्थता नाही. हा त्यांच्या कार्याचा मूलमंत्र आहे. त्यांच्यासोबत काम करणार्यांची अनेकदा दमछाक होते, हे जाणवत राहते, इतका जबरदस्त वेग त्यांच्या कार्याला आहे. सहकार क्षेत्रातील सर्व कायदे, नियम यांचा विश्वकोष म्हणजे सीताराम राणे होय!
समाजहित जपताना पदरमोड झाली, तरी मागे न हटणारे सीताराम राणे हे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व. पहिल्याच भेटीत एखाद्याला वाटेल की, राणेसाहेब एकदम कडक बोलतात, पण जसजसा परिचय वाढत जाईल, तसे जीवाला जीव देणारे राणे त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यासह भावतात. शहाळ्यातील गोड पाण्याला आणि आतील मलईदार खोबर्याला आपण कोणतीच उपमा देऊ शकत नाही, त्याप्रमाणे राणेंच्या स्वभावाचे आहे.
एखाद्याला जीव लावला तर टोकाचे प्रेम करणार, सर्व गुणदोषांसह स्वीकारणार. सर्वांवर मायेची पाखर घालणार्या त्यांच्या आईचा स्वभाव त्यांच्यात उतरला आहे. हाती घेतलेले सामाजिक काम पूर्ण होईपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत. गेल्या 20 वर्षांत जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा ‘पॉझिटिव्ह एनर्जी’ घेऊनच बाहेर पडलो आहे. गृहनिर्माण संस्थांसाठीच्या नव्या योजना, विविध उपक्रम, नवी आव्हाने हेच विषय सतत त्यांच्या बोलण्यात असतात. सतत विधायक कार्य करीत राहणे कसे जमते राणेसाहेबांना? विरोधकांना आपल्या विधायक कार्यातून उत्तर देणारे राणेसाहेब म्हणजे सर्व गृहनिर्माण संस्थांचे आणि ठाणेकरांचेही आशास्थान आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सीताराम राणे हे अतिशय उत्सवप्रिय आहेत. गेली अनेक वर्षे ‘मालवणी महोत्सवा’तून हे आपण अनुभवतो आहोत. काव्य, नाट्य, संगीत या क्षेत्रात रमणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सीताराम राणे! कविवर्य मंगेश पाडगावकर, नाटककार गंगाराम गव्हाणकर, माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, समाजसेविका सिंधुताई सपकाळ आदी रथी-महारथींच्या गोतावळ्यात रमणारे राणे स्वतःमधील रसिकतेला अधिक घट्ट धरून ठेवतात. ’पिंगा ग बाई पिंगा’ फेम वैशाली भैसणे-माडे या गायिकेच्या मुलाखतीचा कार्यक्रम ‘मालवणी महोत्सवा’त व्हावा, यासाठी राणे यांनी जे जे शक्य आहे ते ते सर्व केले आणि अतिशय दिमाखदार मुलाखतीचा कार्यक्रम घडवून आणला.
‘मालवणी महोत्सवा’त झालेल्या अनेक चांगल्या कार्यक्रमाचे साक्षीदार अनेक ठाणेकर आहेत. लेखक सुरेश खरे यांच्या ’कुणीतरी आहे तिथे’ या नाटकाचे 100 प्रयोग सादर करून रसिकांची दाद मिळविली. ‘जे पोटात आहे तेच ओठांवर असेल’ असे बिनदिक्कतपणे ज्यांच्याबद्दल बोलावे, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे सीताराम राणे! चुकले तर समजावून सांगणारे, आईच्या मायेने प्रेम करणारे असे व्यक्तिमत्त्व राजकारणात दुर्मीळच आहे. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘सहकार’ हा स्वतंत्र विषय असावा, यासाठी गेली अनेकवर्षं ते प्रयत्नशील आहेत. सहकार क्षेत्रात विद्यार्थ्यांना एमबीए, पीएचडी करता यावी, यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी त्यांचा पत्रव्यवहार सुरू आहे.
‘ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन’ आणि ‘महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष सीताराम राणे हे उत्तम संघटक व अभ्यासू वक्ते आहेत. त्याचबरोबर चांगले कलावंत व लेखकही आहेत. कोकणची सर्वांगसुंदर माहिती देणारी काही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. गेल्या काही वर्षांपासून सहकारी गृहनिर्माण चळवळीच्या क्षेत्रात व्यस्त असल्याने पुस्तके लिहिणे, नाटकांतून विविध भूमिका करणे या छंदापासून ते अलिप्त राहिले. गेल्या काही वर्षांत त्यांनी ‘ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन’ हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील पहिल्या क्रमांकाचे ‘हाऊसिंग फेडरेशन’ केले आहे. आजवर त्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांसमोरील अनेक प्रश्न सोडविले असल्याने ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचा फायदा झाला आहे.
गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार कायद्यात स्वतंत्र प्रकरण असावे यासाठी, 2008 साली सीताराम राणे ‘ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष झाल्यापासून पाठपुरावा करीत आहेत. त्याला आता यश येत असून महाराष्ट्र शासनाने गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र कायद्याचा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजात सुलभता आली आहे. त्याचे श्रेय सीताराम राणे यांनाच द्यावे लागेल. सहकारी गृहनिर्माण संस्थांना जाचक ठरणारे कायदे, नियम यांबद्दल राणे यांना खंत आहे. ते कायदे, उपविधी बदलून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्यांविषयी अभ्यासपूर्ण लेख नामवंत दैनिकांतून ते लिहीत असतात. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समस्यांवर, ‘डीम्ड कनव्हेअन्स’वर त्यांच्या दूरदर्शनवर अनेक मुलाखती प्रक्षेपित झाल्या आहेत.
ठाणे महानगरपालिकेने भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली लागू केल्याने मालमत्ताधारकांचे कंबरडेच मोडले असते. या करप्रणालीविरुद्ध राणेंनी दंड थोपटले. ‘ठाणे हाऊसिंग फेडरेशन’ आणि ‘सिटीझन फोरम’च्या माध्यमातून त्यांनी ठाणे शहरात अनेक मेळावे आयोजित केले. ठाणे महापालिकेतही सभा आयोजित करून जनजागृती केली. या करप्रणाली विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ‘सिटीजन फोरम’च्या संयुक्त विद्यमाने अभिरुप महासभेचे आयोजन करून जनजागृती केल्यामुळे तत्कालीन आयुक्तांनी करप्रणाली रद्द केली.
दुसरे उदाहरण म्हणजे, ठाणे महापालिकेने सुरु केलेली सदनिकांच्या क्षेत्रफळावर आधारित पाणीपट्टी भरण्याच्या आदेशाविरुद्ध त्यांनी उघडलेली आघाडी याविरुद्धसुद्धा त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पाणीपट्टी प्रत्यक्ष वाटप केलेल्या पाण्यावर आकारली पाहिजे, लाईटच्या मीटरप्रमाणे पाण्याचा मीटर असावा, जितके वापरु तितकेच बिल असावे, हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उच्च न्यायालयात मांडला आहे.
सहकारी चळवळीतील आणि विशेषतः सहकारी गृहनिर्माण चळवळीतील त्यांचे प्रशंसनीय योगदान आहेच, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षातसुद्धा ते सक्रिय काम करीत आहेत. पक्षाच्यावतीने वेगवेगळे भव्यदिव्य कार्यक्रम ते आपल्या विभागात नेहमीच करत असतात, हे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांची भाजपच्या राष्ट्रीय परिषद समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना अल्पावधीत मिळालेले उच्चस्थान म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा मानाचा तुरा होय. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाप्रमाणे मनाची विशालता हा राणेसाहेबांचा स्वभावविशेष सर्वांनाच भावतो. अखंड परिश्रम, चिकाटी, जिद्द आणि एकदा जे ठरवले ते परिपूर्ण करण्यासाठी वाटेल तेवढी मेहनत करायला ते मागेपुढे पाहत नाहीत.
जे करायचे ते भव्यदिव्यच आणि शिस्तबद्ध व्हावे, हा राणेसाहेबांचा स्वभाव अनेकांना ज्ञात आहे. सहकार तत्त्वानुसार सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सीताराम राणे! ’जीआयसी’तील नोकरी सोडल्यानंतर मुलाच्या काळजीने आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण, आठ तासांची नोकरी न करता उद्योगधंदा करून सामाजिक कार्याशी नाळ जोडून घेण्याचा यशस्वी प्रयत्न राणे यांनी केला. या निर्धारामुळेच त्यांचा यशस्वी प्रवास सुरु आहे. सीताराम राणेसाहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या सोबत सर्वांचीच प्रगती व्हायला हवी, हा त्यांचा ध्यास कौतुकास्पद आहे.
कविवर्य विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे की,
देणार्याने देत जावे
घेण्यार्याने घेत जावे
एक दिवस घेता घेता
देणार्याचे हात घ्यावेत
असे दातृत्व साहेबांच्या स्वभावात आहे. त्यांना अधिक सामाजिक सेवा करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, या प्रार्थनेसह सीताराम राणे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रा.संतोष लक्ष्मण राणे