उंबार्ली टेकडीवर धिंगाणा घालणाऱ्यांवर 'वॉच'

31 Dec 2020 17:10:58
umbrali takadi photo_1&nb 




सरत्या वर्षाला निरोप दयायला येणाऱ्या पर्यावरणप्रेमींची करडी नजर



कल्याण : डोंबिवलीनजीक असलेल्या उंबार्ली येथील पक्षी अभयारण्यात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक जण येण्याची शक्यता असल्याने पर्यावरणप्रेमींकडून या टेकडीवर आज पहारा देण्यात येणार आहे. त्यासाठी १५ ते २० पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. नियमांचा भंग केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा ही पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.


ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खबरदारींच्या उपाययोजना म्हणून रात्री ११ ते पहाटे सहा र्पयत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नाईट क्फ्यू ५ जानेवारीपर्यंत असणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकांकडून विविध बेत आखले जात असतात. पण यंदाच्या वर्षा कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल, पिकनिक स्पॉट अशा सर्वच ठिकाणी बंदी असल्याने अनेकांकडून उंबार्ली टेकडीचा पर्याय निवडला जाऊ शकतो. सरत्या वर्षाचे सेलिब्रेशन म्हणजे टेकडीवर येऊन दारूच्या पाटर्या होण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घेतला आहे.



हा पहारा दोन दिवस असणार आहे. कुणालाही सायंकाळी सहा ते सकाळी सहा या टेकडीवर प्रवेश मिळणार नाही. रिजन्सीच्या बाजूने टेकडीवर जाणा:या रस्त्यावर आज एक चौकी पण उभारण्यात आली आहे. दरवर्षी लोक या टेकडीवर येत असतात. पण यंदाच्या वर्षी बाहेर जाण्याची संधी नसल्याने अनेकजण या टेकडीकडे जातील. या टेकडीवर काहीजण मद्यपान करण्यासाठी येत असतात. त्यांना आळा घालण्यासाठी हा पहिलाच प्रयत्न पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे.


सोशल मिडीयाच्या माध्यमातून कुणीही टेकडीकडे येऊ नये असा संदेश दिला आहे. ज्या लोकांर्पयत संदेश पोहोचणार नाही त्यांच्यासाठी हा पहारा असणार आहे. पर्यटकांनी नियमांचे किंवा सूचनांचे उल्लंघन केल्यास भारतीय वन अधिनियम १९२७ आणि भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. हा पहारा देण्यासाठी मंगेश कोयंडे, जितू जयस्वाल, अजय करोडी, देवेश तिवारी, संतोष यादव, सचिन कारीया, गोरखनाथ पाटील, सुशांत पाटील, प्रितेश काटे, ममता परदेशी, अजय पाटील, परेश पाटील, राहूल साटम, समीर पालांडे या स्वयंसेवकांनी वेळेचे नियोजन केले आहे.
 


Powered By Sangraha 9.0