नाशिकमध्ये कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण

    दिनांक  31-Dec-2020 11:51:23
|

nashik _1  H xनाशिक :
कोरोनाविरोधातील लसीकरणास कधी सुरूवात होईल ते निश्चित नसले तरी पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील प्राधान्यक्रमाची यादी तयार करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २४ हजार जणांना ही लस मिळणार आहे. इतर जिल्ह्यांप्रमाणे नाशिकमध्ये चाचणी होणार नाही. लसीकरणाची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

शहर तसेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा निम्म्याने कमी झाला आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणार्‍या रुग्णांचा आकडा कितीतरी अधिक आहे. एकीकडे कोरोना नियंत्रणात येत असताना देशात कोरोना लस उपलब्ध होताच, जानेवारीपासून लसीकरणास सुरूवात होणार आहे. यासाठी सर्वाधिक प्राधान्य कोरोनाशी दोन हात करणारे आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याची सर्वत्र तयारी सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना लस देण्यासाठी प्राधान्यक्रमाची यादी तयार झाली आहे. शासकीय रूग्णालये आणि कोरोना उपचार करणारी खासगी रूग्णालये यांमधील वैद्यकीय अधिकारी, सर्व कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. सरकारी रूग्णालयांमध्ये जिल्हा रूग्णालय, मालेगाव सामान्य रूग्णालय, महिला रूग्णालय, पाच उपजिल्हा रूग्णालये, २३ ग्रामीण रूग्णालये, १०८ प्राथमिक आरोग्य केंद्रे यामध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सहभाग असणार आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रूग्णांवर उपचार करणार्‍या रूग्णालयांतील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांचा सामावेश आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १०० टक्के शासकीय रूग्णालयातील कर्मचारी आणि नंतर इतर अशा १८ हजार जणांना लस दिली जाणार आहे. या लसींची साठवणूक, वाहतूक आणि वितरण याबाबत आरोग्य कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. प्रत्येक केंद्रात शीतपेटींची व्यवस्था करण्यात आली असून या पेट्या विविध ठिकाणी पोहोचविण्यासाठी ‘आयसोलेटेड व्हॅन’ची व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रशासनाने सांगितले.


शहरासह जिल्ह्यात शिक्षकांच्या ‘कोरोना’ चाचणीस सुरुवात


कोरोना काहीसा नियंत्रणात आल्याचे सध्या दिसून येत असल्याने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा प्रशासनाचानिर्णय यापूर्वीच झाला आहे. परंतु, यातही शिक्षकांच्या कोरोना चाचण्यांच्या अहवालानंतरच शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निश्चिती होणार आहे. दरम्यान, शिक्षकांच्या कोरोना चाचण्यांना सोमवारपासून शहरासह ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.