आजचं माझं हे तिसरं ट्विट मला अतीव वेदना होत आहेत : चित्रा वाघ
मुंबई : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस घडतच आहेत. 'शक्ती' कायद्याला मान्यता दिल्यानंतरही गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढतच चालले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याबद्दल राज्य सरकारकडे संताप व्यक्त केला आहे. मुख्य म्हणजे दि. ३० डिसेंबर २०२० या एका दिवशी त्यांनी तीन बलात्काराच्या घटनांबद्दल संताप व्यक्त केला. तिसरे ट्विट करत असताना मला अतीव वेदना होत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रीया दिली. ६० वर्षांच्या आजीपासून तीन वर्षांच्या छकुलीपर्यंत अत्याचार सत्र सुरूच आहे, असे म्हणत सरकारच्या महिला सुरक्षेच्या मोठ्या बाता पोकळ वासा निघाल्या आहेत, अशी टीका केली.
६० वर्षांच्या पीडितेची आत्महत्या
लातूरच्या अहमदपूर येथे ६० वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना घडली आहे. या धक्क्यामुळे पीडित महिलेने नदीत उडी घेत आत्महत्या केली व स्वतःचे जीवन संपवले. राज्यात बलात्काऱ्यांना 'शक्ती' देण्याचे काम सरकार करत आहे. यामुळे विकृतांचे मनोबल वाढले आहे. एखाद्या आरोपीविरोधात तक्रार आल्यावर लगेच मुसक्या आवळल्या पाहिजेत कि तपास व चौकशीच्या नावाखाली अभय, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
रायगडमध्ये तीन वर्षीय छकुलीचा बलात्कार व हत्या
दुसऱ्या घटनेत रायगडच्या पेण येथील तीन वर्षीय छकुलीचा बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित आरोपी जामिनावर बाहेर आलेला याआधीही पॉक्सोच्या केसमध्ये जेलमध्ये होता. "विकृती फोफावतीये पण तिला जेरबंद करायला शासन कमी पडत आहे हे नक्की", अशी संतापजनक प्रतिक्रीया चित्रा वाघ यांनी या घटनेवर दिली. कायदे लागू केले जात आहेत. मात्र, ते प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरत आहेत. विकृतांना पाठीशी घालण्यासाठी शासनाची भुमिका आहे का, असा परखड सवाल त्यांनी विचारला आहे.
पुण्यात सामुहिक बलात्कार
पुण्यातील जुन्नर भागात अल्पवयीन मुलीवर सामुहीक बलात्काराची घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. यातील आरोपी अद्याप फरार आहे.
"आजचे माझं हे ३ रं ट्वीट जे टाईप करतांनाही मला अतीव वेदना होता आहेत. ६० वर्ष आजीपासून ३वर्षाची छकुलीपर्यंत अत्याचार सत्र सुरूच असून सरकारच्या महिलासुरक्षेच्या मोठ्या बाता पोकळ वासा चं निघाल्या आहेत." - चित्रा वाघ, भाजप नेत्या